श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उत्सव या मुद्दय़ाचीं चर्चा करणार आहोत. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे काही वेळा विशिष्ट माहितीला गृहीत धरून विचारले जातात, म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहिती अचूकपणे अभ्यासावी लागते. गतवर्षीय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न व या प्रश्नांची उकल करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन याचा चर्चात्मक आढावा घेऊया.
भक्ती साहित्याच्या स्वरूपाचे मूल्यांकन करा आणि याचे भारतीय संस्कृतीमधील योगदान निर्धारित करा. (२०२१) – या प्रश्नाची योग्य उकल करण्यासाठी भक्ती साहित्य याचा उगम, तसेच याची निर्मिती ही धार्मिक प्रभावातून करण्यात आलेली आहे, याची थोडक्यात माहिती देऊन याचे स्वरूप स्पष्ट करावे लागते आणि भक्ती साहित्य याचे उदाहरणसह भारतीय संस्कृतीमधील योगदान याची माहिती नमूद करावी लागते. मध्ययुगीन भारतातील फारसी साहित्यिक स्तोत्र तत्कालीन युग आत्म्याचे (the spirit of the age) प्रतिबिंब आहेत. भाष्य करा. – या प्रश्नाची योग्य उकल करण्यासाठी फारसी स्तोत्र माहिती असणे गरजेचे आहे आणि याद्वारे तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाच्या महत्त्वपूर्ण माहितीचा संक्षिप्त आढावा उत्तरामध्ये देऊन मध्ययुगीन भारतातील फारसी साहित्यिक स्तोत्र तत्कालीन युग आत्म्याचे प्रतिबिंब आहेत, हे भाष्यात्मक पद्धतीने विश्लेषण करणे गरजेचे आहे.
भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चायनिज आणि अरब प्रवासी यांच्या वृत्तांताचे महत्त्व याचे मूल्यांकन करा. – हा प्रश्न भारतीय इतिहासाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित आहे. प्राचीन भारतात म्हणजेच गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड फाहीयान, ह्यू-एनत्संग, इ-त्सिंग या चायनिज प्रवाशांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या. तसेच तत्कालीन भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर त्यांनी भाष्य केलेले होते आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत. मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीच्या काळात भारतात अरबांची आक्रमणे सुरू झालेली होती. यामुळे अरब प्रवाशांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या. यामध्ये अल्बेरुनी, अल मसुदी इत्यादी प्रसिद्ध अरब प्रवासी होते. यांनी तत्कालीन भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य केलेले होते आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये चायनीज आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अरब प्रवासी यांची यादी देऊन त्यांनी केलेल्या नोंदी, भाष्य व त्यांची पुस्तके याची उदाहरणे देऊन भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चायनीज आणि अरब प्रवासी यांच्या वृतांताचे महत्त्व अधोरेखित करून मूल्यांकन करणे गरजेचे आहे.
‘गुप्त काळातील नाणीशास्त्र कलामधील उत्कृष्टतेची पातळी नंतरच्या काळात मुळीच लक्षणीय नाही. तुम्ही या मताला कशाप्रकारे योग्य सिद्ध कराल?’ – भारतात नाणीशास्त्रामध्ये जी प्रगती झालेली होती याचे महत्त्वाचे कारण, गुप्त काळाच्या अगोदरपासूनच भारताचे युरोपमधील ग्रीक व रोमन साम्राज्यासोबत संबंध प्रस्थापित झालेले होते व युरोपमधील नाणीशास्त्र हे भारताच्या तुलनेत अधिक विकसित होते आणि याचा प्रसार भारतातही झाला आणि येथील सत्तेनेही या नाणीशास्त्राचे अनुकरण केले. गुप्त कालखंडाच्या शेवटी भारताचा रोमन साम्राज्यासोबत व्यापार संपुष्टात आलेला होता आणि भारतात गुप्तनंतरच्या काळात भारतीय सरंजामशाहीचा उदय झालेला होता. ज्यामुळे नंतरच्या काळात गुप्त काळातील नाणीशास्त्र कलामधील उत्कृष्टतेची पातळी पाहावयास मिळत नाही, असे मानले जाते. अशा पद्धतीने संकीर्ण माहितीचा आधार देऊन उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
‘आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्यावेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवीत नसून त्यामधील सुरेख सौंदर्यसुद्धा दर्शविते, या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा.’ – या प्रश्नाचे व्यवस्थित आकलन केल्यास लक्षात येईल की, मध्याश्म युगातील कलेचा सर्वात आधी आढावा घ्यावा लागतो. या काळातील मानवाने नैसर्गिक गुहांमध्ये चित्रकला केलेली आहे आणि या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन जीवनाचे रेखाटन केलेले आहे आणि याचे सद्यस्थितीतील पुरावे भारतात भीमबेटका येथे उपलब्ध आहेत. या चित्रकलेची वैशिष्टय़े व यातील सौंदर्य आणि याची तुलना आधुनिक चित्रकलेशी करून आधुनिक चित्रकलेची वैशिष्टय़ेसुद्धा नमूद करावी लागतात. तसेच या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून मूल्यमापन करावे लागते. अर्थात यामध्ये यातील समानता आणि भिन्नता अशा अनुषंगाने चिकित्सा करणे अपेक्षित आहे.
‘सुरुवातीच्या भारतीय शिलालेखांमध्ये नोंद करण्यात आलेल्या ‘तांडव’ नृत्याची चर्चा करा.’ – हा प्रश्न संकीर्ण माहितीबरोबरच तांडव नृत्याची माहिती या दोन बाबी लक्षात घेऊन विचारण्यात आलेला आहे, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. या कलेची माहिती शिलालेखामध्ये तर मिळतेच पण लेणी, मंदिरे तसेच साहित्यात पण माहिती उपलब्ध आहे. या प्रश्नामध्ये शिलालेख यामधील माहितीच्या आधारे चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच या शिलालेखाची माहिती म्हणजे कोणत्या कालखंडातील शिलालेख, त्याचे नाव इत्यादी विशिष्ट माहिती देऊनच चर्चा करावी लागते.
उपरोक्त विश्लेषणावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उकल करण्यासाठी नेमक्या कोणत्या पैलूंचा विचार करावा लागतो, याची एक स्पष्ट समज येते. या विषयाचा आवाका मोठा आहे आणि बहुतांश प्रश्नांना संकीर्ण माहितीचा आधार द्यावा लागतो म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहितीचाही अभ्यास आवश्यक आहे. या घटकाची मुलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता अकरावीचे An Introduction to Indian Art Part– I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच बारावीचे Themes in Indian History part- I आणि II, जुन्या एनसीईआरटीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. या विषयावर बाजारामध्ये अनेक गाइडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत, ज्याद्वारे सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.