श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण ‘आधुनिक भारत’ या अंतर्गत येणाऱ्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाविषयाची पूर्व परीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०२१ मध्ये एकूण ६४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि तिच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, राष्ट्रीय चळवळीचे तीन टप्पे, (मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२०-१९४७))तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र चळवळीमधील इतर प्रवाह ज्यामध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादींचा समावेश होतो. त्यासोबतच स्वराज पार्टी, आझाद हिंद सेना, भारतीय स्वातंत्र चळवळीमधील महिलांचे योगदान, जमातवादाचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानांमधील प्रजेच्या चळवळी, खालच्या जातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७ च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे (१८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ सालचे कायदे) ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्प्स मिशन, वेव्हल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

मागील वर्षीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न –

  • २०२१ मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड १९१९ आणि १९३५ चा भारत सरकार कायदा, भारत छोडो आंदोलन, इंडियन नॅशनल आर्मी इत्यादीवर थेट प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०२० मध्ये गांधी-आयर्विन करार, १८८४ चा रखमाबाई खटला, २० व्या शतकाच्या सुरुवातीला नीळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट का झालेली होती, आणि ‘देशेर कथा’ हे पुस्तक कोणी लिहिले यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१९ मध्ये स्वदेशी आंदोलन, विविध संघटना, व्यक्ती तसेच गांधीजींच्या कार्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१८ मध्ये १९३५ चा भारत सरकार कायदा, हिंद मजदूर सभा, कोणत्या संघटनेचे नाव बदलून स्वराज्य सभा ठेवण्यात आलेले होते? इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१७ मध्ये बट्लर समिती, १९२९ चा ट्रेड डिस्प्युट कायदा, १८८१ चा फॅक्टरी कायदा, तसेच द्विदलशासन पद्धती (Dyarchy) इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१६ मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता? हा प्रश्न विचारला होता.
  • २०१५ मध्ये खालीलपैकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला? हा प्रश्न विचारला होता.
  • २०१४ मध्ये १९२९ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्व पूर्ण मानले जाते? हा प्रश्न विचारला होता.
  • २०१३ मध्ये इलबर्ट बिल कशाशी संबंधित होते? हा प्रश्न विचारला होता.
  • २०१२ मध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते आणि यासाठी ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आर्थिक पिळवणूक उघड केली, प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला आणि काही करण्यापूर्वी सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गरजेवर भर दिला असे तीन विधाने देण्यात आलेली होती. यापैकी योग्य विधान/ विधाने कोणती हे निवडायचे होते.
  • २०११ मध्ये १९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही आणि यासाठी ही एक हिंसक चळवळ होती, याचे नेतृत्व महात्मा गांधीजीने केले होते, ही एक उत्स्फूर्त  चळवळ होती आणि कामगारांना आकर्षित करून घेता आले नाही, असे चार पर्याय दिलेले होते, यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या विषयावर विचारण्यात आलेले आहेत. या विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्ती विशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी इत्यादी पैलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गरजेचे आहे, हा विषय आपणाला पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयार करावा लागत असल्यामुळे या विषयाच्या सखोल आणि व्यापक पैलूंचा विचार करून तयारी करावी लागते. या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे आणि त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपीन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फार इंडिपेंडस’, बी. एल ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, सुमित सरकार लिखित ‘आधुनिक भारत’ इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत आणि या संदर्भग्रंथांवर आधारित स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात जेणेकरून हा विषय कमीतकमी वेळेमध्ये अभ्यासता येईल.