श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकांची माहिती असणे आवश्यक असते. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकांसंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.
२०१३ ते २०२१ दरम्यान या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न व त्यांचे स्वरूप :
२०२१ मध्ये भारताला उपखंड का मानले जाते? विस्तृतपणे उत्तर द्या. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न समजून घेताना खंड आणि उपखंड निर्धारित करण्यासाठी कोणती वैशिष्टय़े ग्राह्य धरली जातात याची माहिती असावी आणि ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारताला उपखंड का मानले जाते याची विस्तृतपणे मांडणी करणे गरजेचे आहे.
२०२० मध्ये ‘वाळवंटीकरण प्रक्रियेस हवामानाच्या सीमा नसतात. उदारणासह समर्थन करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यातील ‘वाळवंटीकरण यावरील प्रश्न हा सर्वसाधारणपणे जगाच्या भूगोलाच्या संदर्भात विचारण्यात आलेला आहे, पण ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना यामध्ये भारतातील वाळवंटीकरणाचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच, वाळवंटीकरण प्रक्रियेस हवामानाच्या सीमा नसतात हे सहउदाहरण दाखवून द्यावे लागते.
२०१९ मध्ये जागतिक तपमानवाढीमुळे प्रवाळ जीवन पद्धतीवर (coral life system) होणाऱ्या परिणामांचे उदाहरणासह मूल्यांकन करा. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नामध्ये सर्वप्रथम प्रवाळ जीवन पद्धती म्हणजे काय आहे आणि याची असणारी उपयुक्तता हे माहिती असणे गरजेचे आहे. याचबरोबर जागतिक तपमानवाढ काय आहे? आणि याचा नेमका कोणता परिणाम प्रवाळ जीवन पद्धतीवर पडत आहे, हे उदाहरणासह दाखवून मूल्यांकन करावे लागते.
२०१८ मध्ये समुद्री पारिस्थितिकीवर आणि मृत क्षेत्रे, तसेच आच्छादन (mantle plume) याची व्याख्या आणि आच्छादन याची प्लेट टेक्टोनिकमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते.
२०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.
२०१६ मध्ये या घटकातील हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
२०१५ मध्ये ‘‘आक्र्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात.’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आक्र्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आक्र्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्व माहिती हवे. सद्यस्थितीमध्ये जगातील विविध देशांची उर्जेची गरज भागवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो आणि आक्र्टिक समुद्रावर अधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ आणि ह्या खनिज तेलाचे उत्पादन करताना ह्या समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम, अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.
२०१४ मध्ये ‘‘हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तपमानवाढीच्या लक्षणाचा संबंध उघड करा.’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत, याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तपमानवाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तपमानवाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.
२०१३ मध्ये ‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ह्या प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, या सिद्धांताची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पैलूंचा विचार करून ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीचा विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो.
थोडक्यात, अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी व अभ्यासाची दिशा निर्धारीत करावी. ह्या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात तसेच स्वत:च्या अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे, हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे यातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो व चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता महत्त्वाच्या मुद्यांचा अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Story img Loader