महेश शिरापूरकर
विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखांमध्ये आपण यूपीएससी परीक्षेची तोंडओळख आणि स्वरूप याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखात आपण या परीक्षेविषयी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची माहिती जाणून घेऊ या. कारण आपण ही कौशल्ये जाणून घेत नाही तोपर्यंत या परीक्षेच्या अभ्यासाला योग्य दिशा प्राप्त होणार नाही. या परीक्षेसाठी आवश्यक सर्वसाधारण, ढोबळ कौशल्याचा विचार केल्यास पुढील कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे ठरते.
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे यूपीएससी ही परीक्षा एकंदर तीन टप्पे, व्यापक अभ्यासक्रम आणि विविध विषयांचा समावेश असणारी आहे. या परीक्षेचे हे वैशिष्टय़ लक्षात घेता आपल्या उपलब्ध वेळेचे तसेच अभ्यासाचे नियोजन योग्य रीतीने करून त्याची प्रभावी अंमलबजावणी जरुरीची ठरते. परीक्षेच्या कोणत्या टप्प्याने सुरुवात करायची, सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंध या विविध विषयांचा अभ्यास कोणत्या क्रमाने किती काळ करायचा, विविध संदर्भाचे वाचन करण्यासाठी किती वेळ द्यायचा, केलेल्या अभ्यासाची उजळणी केव्हा करायची, सर्व चाचण्या केव्हा लिहायच्या, वर्तमानपत्रे व नियतकालिकांसाठी किती व कोणता वेळ राखीव ठेवायचा अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींचे पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. सुरुवातीला व्यापक, ढोबळ नियोजन करून प्रत्यक्ष अभ्यासप्रक्रियेदरम्यान त्यात आवश्यक तेथे पूरक बदल करावे लागतात आणि ठरवल्याप्रमाणे नियोजित विषय अभ्यासून होत आहेत किंवा नाहीत याचे मूल्यमापन करता येते. आपण केलेल्या नियोजनाकडे सतत बारकाईने चिकित्सकपणे पाहावे लागते. विविध विषय, विविध संदर्भ समांतरपणे एकाच वेळी हाताळावे लागतात. त्या-त्या काळात त्या-त्या टप्प्याचा अभ्यास पूर्ण करणे गरजेचे असते. त्याची उजळणी व त्यावरील सरावही करावा लागतो. थोडक्यात, व्यापक स्वरूपाच्या या परीक्षेत पद्धतशीरपणा आणून ती सुलभ बनवण्यासाठी नियोजनाची हातोटी विकसित करावी लागते.
परीक्षेच्या व्यापक स्वरूपामुळे या परीक्षेसाठी किमान वर्षभर दररोज १० तासांचा अभ्यास अत्यावश्यक ठरतो आणि वर्षभराच्या कालखंडात परीक्षेतील तिन्ही टप्प्यांची त्या-त्या काळात तयारी करावी लागते. स्वाभाविकच एवढा दीर्घकाळ अभ्यासात सातत्य राखणे काहीसे आव्हानात्मक वाटू शकते. तथापि, नियोजित अभ्यास ठरवलेल्या काळात पूर्ण करावाच लागतो. अन्यथा अभ्यासात खंड पडल्यास म्हणजे सातत्याचा अभाव निर्माण झाल्यास आपला अभ्यास वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपला अभ्यास अपूर्ण राहून परीक्षेच्या त्या-त्या टप्प्यास पूर्ण तयारी करून सामोरे जाणे शक्य होणार नाही. थोडक्यात, अभ्यासातील सातत्याची हमी देण्याचे कौशल्य अटळपणे विकसित करावेच लागते.
प्रत्येक विद्यार्थ्यांने आपला अभ्यास, त्याची गती, गुणात्मकता, त्यातील त्रुटी, कमतरता, तयारीत येणाऱ्या अडचणी यांचा सतत विचार करणे अत्यावश्यक असते. आपल्या तयारीचे बारकाईने मूल्यमापन करून त्यातून लक्षात येणाऱ्या त्रुटींवर मात करण्यासाठी लागलीच उपाय करावे लागतात. अन्यथा, मूल्यांकनाच्या अभावी ना कच्चे दुवे लक्षात येतील ना त्यावर वेळीच मात करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध राहील. सातत्यपूर्ण स्वयंमूल्यांकनामुळेच आपल्या तयारीत भरीव सुधारणा व परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. आपल्या तयारीची गुणवत्ता वाढवत नेट पहिल्या प्रयत्नातच अपेक्षित पद मिळवणे शक्य बनते.
केंद्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेसंदर्भात ज्या सूचना नमूद केलेल्या आहेत त्यातून कोणत्या प्रकारचा उमेदवार अपेक्षित आहे अथवा उमेदवाराकडून कोणत्या क्षमतेची अपेक्षा आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार ही परीक्षा विद्यार्थ्यांची चिकित्सकपणे विचार करून विश्लेषण करण्याची क्षमता अपेक्षित आहे. नागरी सेवेतील पूर्व, मुख्य अथवा मुलाखत हा टप्पा असो, त्यातील प्रश्नांचे स्वरूप पाहता विद्यार्थ्यांकडे आवश्यक चिकित्सक विचार क्षमतेचे महत्त्व लक्षात येते. परीक्षेतील प्रश्न हे मुख्यत: विद्यार्थ्यांना विचारप्रवण करणारे, एखाद्या विषयाकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करणारे आणि त्यांचे नेमकेपणे विश्लेषण करावयास सांगणारेच असतात.
त्यातून विद्यार्थी विचार करू शकतो का, स्वत:चे मत बनवू शकतो का, एखाद्या विषयाकडे पुरेशा चिकित्सकपणे पाहून त्याबाबतीत नावीन्यपूर्ण उपाय सुचवू शकतो का, याचीच जणू खातरजमा केली जाते. स्वाभाविकच, पाठांतरावर आधारित तांत्रिकपणे केलेला ‘रोट लर्निग’ प्रकारचा अभ्यास उपयुक्त ठरत नाही. त्याऐवजी प्रत्येक बाब समजून घेणे, विषयातील पायाभूत संकल्पनांचे आकलन करणे; एखादी बाब अशीच का आहे याचा विचार करणे म्हणजे मीमांसा पाहणे; संबंधित विषयांबाबत मांडलेली विविध मतमतांतरे तौलनिकपणे अभ्यासणे; विविध प्रश्न, कळीचे मुद्दे, समस्या व आव्हाने यावर मात करण्यासाठी केलेले प्रयोग आणि अभ्यासकांनी सुचविलेले उपाय लक्षात घेऊन संभाव्य उपाययोजना सुचविणे आणि प्रत्येक मुद्दय़ाबाबत स्वत:ची भूमिका विकसित करणे ही अभ्यासपद्धती उपयुक्त आणि गरजेची असते. पुढील लेखांपासून आपण पूर्वपरीक्षेची तयारी कशी करायची, याबाबत माहिती घेणार आहोत.