मागील लेखात आपण काही महत्त्वपूर्ण नीतिनियमविषयक चौकटींचा अभ्यास केला. या लेखात आपण या चौकटींचा आणि विचारसरणींच्या मदतीने काही केस स्टडीजचे विश्लेषण करणार आहोत. त्या आधी आपण या नीतिनियमविषयक चौकटींचा पुन्हा एकदा आढावा घेऊयात –
* उपयुक्ततावादी दृष्टिकोन (The Utilitarian Approach)
* हक्काधिष्ठित दृष्टिकोन (The Rights Approach)
* न्यायाधिष्ठित दृष्टिकोन (The Justice Approach)
* सामायिक कल्याणवादी दृष्टिकोन (The Common Good Approach)
* सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन (The Virtue Approach)
केस स्टडीजचे विश्लेषण करत असताना यापकी एका अथवा एकापेक्षा अधिक दृष्टिकोनांचा वापर करता येऊ शकतो. या दृष्टिकोनांचा एकत्र वापर अधिक प्रभावी पद्धतीने करण्यासाठी सर्वात आधी या प्रत्येक दृष्टिकोनामधील बारकावे समजावून घेणे जास्त परिणामकारक ठरते. या दृष्टिकोनांचा वापर करत असतानाच अशाही काही बाबींचा विचार करावा लागतो, ज्या सर्व दृष्टिकोनांकरिता समान लागू आहेत, जसे की – जो दृष्टिकोन आपण केस स्टडीजचे विश्लेषण करण्याकरिता वापरत असताना त्यामध्ये किमान आंतरिक व नैतिक सुसंगती (Internal and Moral Coherence) असणे अपेक्षित आहे. एखाद्या दृष्टिकोनाचा वापर जरी ठरवीक साच्यामध्ये उपयुक्त असेल, तरीदेखील प्रत्येकच प्रश्नासाठी तो तंतोतंत लागू पडेल याची हमी देता येत नाही. त्यामुळे या दृष्टिकोनांचा खोलात जाऊन विचार करणे क्रमप्राप्त आहे. आज आपण उपयुक्ततावादातील बारकाव्यांचा विचार करणार आहोत. जेरेमी बेन्थम या इंग्लिश तत्त्वज्ञाने उपयुक्ततावादाचा विचार प्रथमत: समोर आणला. जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त सुख (maximum good for maximum people) या तत्त्वप्रणालीचा त्याने पुरस्कार केला. पुढील केस स्टडीजचे विश्लेषण आपल्याला उपयुक्ततावादानुसार करता येते का, हे आपण पाहणार आहोत.
पहिले प्रकरण –
डॉ. अबक हे उच्चविद्याविभूषित व सामाजिक बांधीलकीची उत्तम जाण असणारे डॉक्टर आहेत. जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयातून ते सरकारी दवाखान्यात गेली काही वष्रे कार्यरत आहेत. संपूर्ण आठवडा त्यांनी स्वत:च्या कामास झोकून घेतले आहे. बालकांमधील जन्मत: असणारे शारीरिक व्यंग दूर करण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. अबक पारंगत आहेत. मात्र जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करता यावे याकरिता त्यांना शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीसुद्धा काम करणे आवश्यक झाले आहे. यामुळे त्यांना स्वत:च्या दोन मुलांसोबत वेळ घालवणे शक्य होत नाही. शनिवार व रविवार काम न केल्याने डॉ. अबक यांच्या मिळकतीत फार मोठा फरक पडणार नाही, तसेच त्यांची मुले अधिक आनंदी होतील. मात्र यामुळे शेकडो बालकांना उपचार मिळण्यास विलंब होईल अथवा उपचार मिळणारच नाहीत.
प्रतिसाद (Response)
डॉ. अबक यांनी त्यांना जास्त समाधान कोणत्या प्रकारे वेळ घालवल्यावर मिळते, हे काही प्रमाणात निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कोणत्या निर्णयामुळे किती जणांच्या समाधानात वाढ होते, हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. जर त्यांनी आपल्या कामातून अंग काढून घेतले तर शेकडो मुले सुदृढ शरीरामुळे मिळणाऱ्या समाधानापासून वंचित राहतील. जर त्यांनी आपल्या कामाच्या दिवसांमध्ये अथवा तासांमध्ये वाढ केली तर त्यांची स्वत:ची दोन मुले पित्याच्या सहवासातून मिळणाऱ्या आनंदापासून व समाधानापासून वंचित राहतील. उपयुक्ततावादाच्या मांडणीनुसार डॉ. अबक यांनी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीसुद्धा काम करणे जास्त व्यक्तींच्या आनंदाला कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे व म्हणून त्यांनी तसेच करणे जास्त योग्य आहे.
परंतु या प्रकारच्या मांडणीत काही इतर समस्या आहेत का? आपण निश्चितच अशा गोष्टींचा विचार करू शकतो, ज्यामुळे डॉ. अबक यांना त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात रस वाटेल. यामध्ये केवळ मुलांना हव्या असणाऱ्या जास्त वेळाचा सहभाग नाही तर डॉ. अबक यांना पिता म्हणून वाटणाऱ्या ‘नतिक जबाबदारीचा’देखील सहभाग आहे. मात्र उपयुक्ततावाद त्यांना अशा प्रकारे नतिक जबाबदारीवर आधारित निर्णय घेण्याची मुभा देत नाही. जेरेमी बेन्थम यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, ‘प्रत्येक व्यक्तीचे समाधान हे इतर कोणत्याही व्यक्तीच्या समाधानाइतकेच महत्त्वाचे आहे.’ म्हणूनच उपयुक्ततावाद कोणतीही नतिक जबाबदारी, जी भाऊ, वडील, बहीण या आणि इतर नात्यातून येते, त्यास वेगळे प्राधान्य देत नाही.
उपयुक्ततावादाच्या जरी काही मर्यादा असल्या तरीदेखील उपयुक्ततावादाची चौकट अनेक ठिकाणी उत्तम प्रकारे समस्या सोडवणुकीसाठी वापरता येते. आधुनिक काळातील समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करणारी, प्रत्येक व्यक्तीला एकच दर्जा देणारी अशी ही चौकट आहे. एकंदर समाजाच्या भल्यासाठी आपण जे निर्णय घेतो, ते अनेकदा उपयुक्ततावादावर आधारित असतात. अशाप्रकारे प्रत्येक वैचारिक मांडणीतील बारकावे समजावून घेऊन त्यातील गुंतागुंत उमेदवाराने उलगडून दाखवणे गरजेचे आहे. पुढील लेखामध्ये आपण उपयुक्तवादाबरोबरच हक्काधिष्ठित दृष्टिकोनावर आधारित काही उदाहरणे व त्यांचा सखोल अभ्यास करणार आहे. तसेच एकपेक्षा अधिक विचारसरणींचे एकत्र विश्लेषण करण्याविषयी काही बाबी जाणून घेणार आहे.
admin@theuniqueacademy.com
उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे
मागील लेखात आपण काही महत्त्वपूर्ण नीतिनियमविषयक चौकटींचा अभ्यास केला.
आणखी वाचा
First published on: 07-10-2013 at 07:37 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Utilitarian approach