अलीकडे बरेचदा पहिला इंटरव्ह्य़ू हा फोनद्वारे घ्यायचा प्रघात आहे. फोनद्वारे मुलाखत घेण्यामागे अनेक उद्देश असतात आणि त्याद्वारे काही गोष्टींची पडताळणीही केली जाते.
० मुलाखत, ऑफिस वेळेच्या आधी/दरम्यान/नंतर कधीही घ्यायचा पर्याय, मुलाखत घेणाऱ्याला व देणाऱ्यालाही उपलब्ध होतो.
० उमेदवाराचा मुलाखतीसाठी जाण्या-येण्याचा वेळ वाचतो.
० मुलाखतीसाठी वेगळे ठिकाण अथवा मीटिंग रूम राखून ठेवायची गरज भासत नाही. मात्र, फोनद्वारे मुलाखत देताना उमेदवार काही अंशी बेफिकीर किंवा गाफील राहण्याची शक्यता असते. याचे कारण मुलाखत घेणारा त्याच्यासमोर उपस्थित नसतो. याच गाफीलपणामुळे फोनवरून इंटरव्ह्य़ू देताना त्याच्या हातून अनेक चुका होण्याचीही शक्यता असते. या चुका होऊ नयेत, यासाठी विशेष सावधानता उमेदवारांनी बाळगायला हवी. दूरध्वनीद्वारे मुलाखत देताना पुढील पथ्ये पाळावीत –
० मुलाखत देताना नेहमी लँडलाइनचा पर्याय निवडावा. मोबाइलवरील संभाषण, रेंजच्या अभावी मध्येच खंडित व्हायची वा त्यात अडथळे येण्याची शक्यता असते.
० प्रत्यक्ष मुलाखत देण्याआधी मित्राला अर्धा तास आधी फोन करावा. आपले लँडलाइनवरचे बोलणे समोरच्याला स्पष्ट ऐकू येते ना, याची खातरजमा करून घ्यावी.
० ऑफिसमधून ऑफिसची लँडलाइन वापरून मुलाखत देणे नीतिमत्तेला अनुसरून नसते, ते धोक्याचेही ठरते. रस्त्यावर चालता-चालता, गाडी चालवताना, कॅन्टीनमध्ये खाताना किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर मुलाखत देऊ नये.
० धूम्रपान करताना, तोंडात च्युईंगम ठेवून, कोिल्ड्रक पीत अथवा खाता खाता मुलाखत देऊ नये, हा तर साधा सरळ नियम आहे.
० घरातून लँडलाइनवर बोलत असताना झोपून, आरामखुर्चीत रेलून मुलाखत देऊ नये. मुलाखत घेणारा समोर बसला आहे, अशी कल्पना करून खुर्चीत ताठ बसून मुलाखतीच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. यामुळे उमेदवाराचा आवाज स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण असतो, तसेच तो विचारलेल्या प्रश्नांची एकाग्रचित्ताने आणि गांभीर्याने उत्तरे देत आहे, हे समोरच्या व्यक्तीला समजते.
० घरात असताना मुलाखत देताना त्या खोलीचा दरवाजा बंद करून घ्यावा, मुलांचे हसणे-खिदळणे, पाळीव प्राण्यांचे आवाज, टीव्हीचा गोंगाट हे त्रासदायक होणार नाही, हे निश्चित करावे.
० येरझाऱ्या घालत कॉर्डलेस फोनवर मुलाखत देऊ नये. चालताना नकळतपणे श्वास/धाप लागते, त्याचा परिणाम आपल्या आवाजावर होतो. यामुळे चित्त विचलित होण्याचीही शक्यता असते.
० मुलाखत देताना आपला रीझ्युम, आपल्याला ज्या गोष्टींवर भर द्यायचा आहे. (उदा. आपली शक्तिस्थळे, आपल्या कामातील गौरवपूर्ण क्षण) हे सर्व सोबत बाळगावे. बोलताना कुठल्या गोष्टींवर भर द्यायचा आहे, याचे मुद्दे लिहून त्यानुसार बोलावे. त्यामुळे बोलण्यात सुसूत्रता येते. तसेच फोनवर बोलताना अडखळणे, उगाचच घ्यावे लागणारे पॉझ हे सर्व टळते आणि मुख्य मुद्दे बोलायचे राहून जात नाही.
० मुलाखतीचा वेळ हा तुम्ही निवडा आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या कामात अडकणार नाही आणि फोनही मोकळा राहील, याची काळजी घ्या. दिनक्रमातील कामाच्या वेळी मुलाखत देण्याचे टाळा. त्यावेळी मुलाखत दिल्यास मन एकाग्र होत नाही आणि कामही नीट उरकले जात नाही, तसेच मुलाखत व्यवस्थित देऊ शकत नाही.
० मुलाखतीची जी वेळ ठरली आहे, त्याच्या अर्धा तास आधीचा व नंतरचा वेळ मोकळा राखून ठेवावा. मुलाखत लांबल्यास असा अधिकचा वेळ कामी येतो. तसेच कधी कधी मुलाखत घेणारा मुद्दामहून १५ मिनिटे आधीच कॉल करून उमेदवाराला गाफील अवस्थेत गाठायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याही स्थितीला सामोरी जाण्याची तयारी उमेदवाराने करायला हवी.
० मुलाखत देताना मुद्देसूद उत्तरे द्यावीत, पाल्हाळ लावू नये.
० मुलाखत देताना पुरेशा मोठय़ा आवाजात, मात्र सावकाश बोलावे. समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच बोलायला सुरुवात करू नये. बोलताना आवाजात बेफिकिरी अथवा उद्दामपणा नसावा.
० मुलाखती दरम्यान घसा खाकरू नये.
० मुलाखत देताना चेहरा शांत आणि हसरा ठेवा. आपला हाच मूड आपल्या आवाजातही नकळतपणे ध्वनित होतो.
० जर संभाषणात काही काळापुरता अडथळा येत असेल तर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण करूनच समोरच्या व्यक्तीकडून अवधी मागून घ्यावा. पुन्हा फोनवर येताच अवधी मागण्याचे खरे कारण सांगावे. उदा. दारावरची बेल वाजत होती किंवा कुरिअर आले होते वगैरे वगैरे. यामुळे तुम्हाला उत्तर येत नव्हते, म्हणून ते शोधण्यासाठी ब्रेक घेतला, असा समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होणार नाही.
० फोनवरील मुलाखत संपल्यावर शक्य असल्यास ई-मेलद्वारे थँक्यू नोट जरूर पाठवून द्यावी. प्रत्यक्ष भेटीद्वारे पुन्हा भेटण्याची संधी मिळेल असा आशावाद दाखवून आपल्याला जॉब ऑफरमध्ये खरेच स्वारस्य आहे, हे स्पष्ट करावे.
हे लक्षात असू द्या की, केवळ फोनवरून नोकरीसाठी कोणाची निवड होत नसते. प्रत्यक्ष मुलाखतीचे आमंत्रण मिळवणे हेच फोनवरून दिल्या गेलेल्या मुलाखतीचा उद्दिष्ट असते. ते साध्य होण्यासाठी फोनवरून मुलाखत देताना प्रयत्न करा.
फोनवरून इंटरव्ह्य़ू देताना..
अलीकडे बरेचदा पहिला इंटरव्ह्य़ू हा फोनद्वारे घ्यायचा प्रघात आहे. फोनद्वारे मुलाखत घेण्यामागे अनेक उद्देश असतात आणि त्याद्वारे काही गोष्टींची पडताळणीही केली जाते.
First published on: 25-03-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While giving interview on phone