पर्यावरणाचे ज्येष्ठ अध्यापक डेव्हिड ऑर्र यांनी अर्कान्सस् विद्यापीठाच्या एका पदवीदान समारंभाच्या वेळेस केलेल्या भाषणाचा अनुवाद ‘शैक्षणिक संदर्भ’ या द्वैमासिकात प्रसिद्ध झाला आहे. या अनुवादाचा संपादित भाग- मानवाचा क्रूरपणा शिक्षणामुळे का बरं थांबला नाही? आपल्या उच्च शिक्षणात कुठल्या उणिवा राहिल्या, याचा ऊहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.
वास्तव भयंकर आहे. आपला भविष्यकाळ, आरोग्य, समृद्धी सारं काही धोक्यात आहे. कारण मुळामध्ये निसर्गव्यवस्था, तिचं सौंदर्य, वैविध्य, स्थैर्य धोक्यात आलेलं आहे. या सर्व परिस्थितीस माणसाचे अज्ञान नव्हे तर सर्व क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित पदवीधारक, पीएच.डी.धारक यांचेच कर्तृत्व कारणीभूत आहे. हे पूर्वीदेखील घडलेलं आहे. सर्वात जास्त उच्चशिक्षित असलेल्या जर्मनीमध्येच महायुद्धाच्या काळात वंशसंहार केले गेले. मानवाचा क्रूरपणा शिक्षणामुळे का थांबला नाही बरं? त्यांच्या शिक्षणात कोणत्या उणिवा होत्या?
त्यांनी मूल्यांऐवजी सिद्धांतांना महत्त्व दिले. माणसांपेक्षा त्यांना संकल्पना महत्त्वाच्या वाटल्या. जाणिवांपेक्षा तथ्ये, प्रश्नांपेक्षा उत्तरे, सदसद्विवेकबुद्धीपेक्षा विचारसरणी अन् कार्यक्षमतेवरच त्यांचे लक्ष होते.
निसर्गाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीतही हाच दोष आहे. आजतागायत जे लोक या ग्रहावर जास्तीत जास्त टिकाव धरून राहिले, त्यांना लिहिता-वाचता येत नव्हतं, माझं म्हणणं एवढंच आहे की शिक्षणामुळे सुसंस्कृतपणा, दूरदर्शीपणा किंवा शहाणपणा मिळतोच असं नाही, उलट त्या विशिष्ट प्रकारच्या शिक्षणामुळे आपल्या विविध समस्या वाढतात. शिक्षणाच्या उपयुक्ततेचे मापन हे खरी मानवी वागणूक आणि मानवाच्या टिकाऊ अस्तित्वावरून करायला हवे. आता आपल्यासमोर काही प्रश्न एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उभे राहिले आहेत की फक्त शिक्षण नव्हे तर ‘विशिष्ट जाणिवांचे शिक्षण’च आपल्याला तारू शकेल.
निर्दोष मार्ग, पण मूर्ख ध्येये
समकालीन संस्कृती व शिक्षण यांचा ताळमेळ कुठे चुकला, या विषयीची दृष्टी साहित्यात काही प्रमाणात मिळते-ख्रिस्टोफर मालरेचा ‘फाऊस्ट’ – ज्याने ज्ञान आणि सत्तेच्या बदल्यात स्वत:चा आत्मा देऊन टाकला, मेरी शेलीचा ‘डॉ. फ्रँकेन्स्टाइन’ – ज्याने स्वनिर्मितीची जबाबदारी नाकारली, हर्मन मेल्वीलचा कॅप्टन अहाब जो म्हणतो- ‘माझे सर्व मार्ग निर्दोष आहेत, परंतु माझे हेतू व उद्देश मूर्ख आहेत.’ या सर्व पात्रांमधून आपल्याला जाणवते ती निसर्गावर वर्चस्व गाजवण्याची आधुनिक वृत्ती! आधुनिक शिक्षणाची पायाभूत तत्त्वे म्हणून अशाच काही गोष्टी डोळे झाकून स्वीकारल्या जातात, त्यापैकी सहा गोष्टींचा उल्लेख मी इथे करणार आहे.
पहिली समजूत आहे- अज्ञान ही दूर करता येण्याजोगी समस्या आहे. खरं तर अज्ञान ही समस्या पूर्णपणे सोडवता येणं शक्यच नाही. तो मानवी विश्वाचा, परिस्थितीचा अविभाज्य घटक आहे.
जसजशी ज्ञानाची पातळी वाढत जाते तसतशी अज्ञानाची देखील पातळी बदलत जाते, पण ते नष्ट होत नाही. एक उदाहरण पाहूया. १९३० पर्यंत सीएफसी म्हणजे क्लोरोफ्लुरोकार्बनचा शोध लागलेला नव्हता. १९७० पर्यंत ही चीज कशाशी खातात असं कुणी विचारत देखील नसे. पण १९९० च्या सुमारास कळून चुकलं की जगभरातील वातावरणातला ओझोन स्तर या सीएफसीमुळे पातळ होत गेला आहे. सीएफसीच्या शोधाबरोबर ज्ञानाचा विस्तार तर झाला, पण त्याच्याच हातात हात घालून एकूण अज्ञानही विस्तारलं.
दुसरी समजूत अशी आहे की, पुरेशी माहिती व तंत्रज्ञान असेल तर संपूर्ण विश्वाचे व्यवस्थापन आपण करू शकतो. यात डिजिटल माहिती, संगणक, बटणं व तबकडय़ा याविषयी आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणालाही आवाहन असते. पण पृथ्वी आणि तिच्यावरील जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे की त्याचं व्यवस्थापन मानवाला खऱ्या अर्थानं कधीही करता येणार नाही.
आपण कोणत्या गोष्टीचं व्यवस्थापन करू शकतो- तर मानवी आकांक्षा, अर्थकारण, राजकारण व समाजकारण. पण राजकारण, नैतिकता, सदाचार, साधी अक्कलदेखील जे मार्ग सुचवते त्यातले गैरसोयीचे मार्ग टाळण्याकडेच आपलं लक्ष असतं. पृथ्वीवर जी मर्यादित साधनसंपत्ती आहे त्यातूनच आपल्या सर्व गरजा भागतील असं पाहणं सोपं आहे. ते सोडून आपल्या इच्छा अमर्याद वाढू द्यायच्या आणि त्यासाठी ‘विश्वव्यवस्थापन’ करायला पाहायचं! हा तर मूर्खपणा आहे!
तिसरी समजूत अशी आहे की, ज्ञानाची वृद्धी होत आहे आणि ओघानेच मानवाचा चांगुलपणा वाढत आहे.
माहितीचा विस्फोट घडत आहे म्हणजेच वाढीव नोंदी, वाढीव शब्द आणि वाढीव पृष्ठे. पण हा विस्फोट म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांची वाढ नव्हे! याचे मोजमाप होऊच शकत नाही. खरंतर असं म्हणता येईल की, काही ज्ञान अर्जित होत आहे. त्याचबरोबर काही वेगळ्या पद्धतीचे ज्ञान नष्टही होत आहे.
आता प्रणाली विज्ञान, वर्गीकरण विज्ञान, पक्षीविज्ञान या विषयातले तज्ज्ञ विद्यापीठातसुद्धा नेमले जात नाहीत. आता आण्विक जीवशास्त्र, अनुवंशशास्त्र यांची चलती आहे. हे दोन विषय आकर्षक असले तरी त्यांना जास्त महत्त्वाची संशोधन क्षेत्रे असं काही म्हणता येणार नाही. जमिनीच्या आरोग्याविषयी देखील आपल्याला फार कमी आस्था आहे.
काही विशिष्ट क्षेत्रातील ज्ञानच नव्हे तर आपण स्थानिक ज्ञान विसरत चाललो आहोत. बॅरी लोपेझच्या शब्दात ‘मला अशी जाणीव होऊ लागली आहे की काहीतरी अनाकलनीयच नव्हे तर धोकादायक घडत आहे. दरवर्षी परिसराची माहिती असणाऱ्या लोकांची संख्या रोडावत चालली आहे. ग्रामीण लोक शहराकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे वैयक्तिक आणि स्थानिक ज्ञान- ज्यातून स्थानिक भूगोल तयार होतो, ज्या ज्ञानावर एखादा देश उभा राहातो, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि हे फार भयावह आणि अस्थिरतेची भावना आणणारे आहे.’
माहितीलाच ज्ञान समजण्याच्या गोंधळात एक मोठी गल्लत अशी आहे की, ‘शिक्षण माणसाला चांगलं बनवतं’ असं समजणं. पण माणसाचं शिकणं हे कधी संपत नाही. आणि नुसतं शिकत गेलं म्हणून कोणी नीतिवान बनत नाही. आपल्या अति विकासामुळे सर्वात जास्त धोका सदसद्विवेकालाच उत्पन्न झालाय. मर्त्य लोकावर चांगलं टिकून राहण्यासाठी जे ज्ञान हवं आहे त्याच्याच बाबतीत आपण उदासीन होत चाललो आहोत.
चौथी गैरसमजूत ‘आपण इथे ज्याची मोडतोड केली आहे ते सर्व पुन्हा सहज दुरुस्त होईल’- ही समजूत आपल्याला उच्च शिक्षणाने दिली आहे.
आधुनिक अभ्यासक्रमात आपण जगभराच्या ज्ञानाचे विषय व उपविषयांमध्ये तुकडे केले आहेत. परिणामत: १२, १६ किंवा २० वर्षांच्या शैक्षणिक कालावधीनंतरही विद्यार्थ्यांना या जगाच्या एकात्मिक स्वरूपाचे व्यापक दृष्टीने आकलन झालेले नसतेच. त्याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर व जागतिक स्तरावर खूप मोठा परिणाम होतो. उदा. दरवर्षी जे अर्थशास्त्रज्ञ शिकून बाहेर पडतात, त्यांना पर्यावरणाचे मूलभूत ज्ञानही नसते. त्यामुळे राष्ट्रीय वार्षिक ताळेबंदामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नामधून त्यावर्षी झालेले जीवावरणाचे नुकसान- मातीची झीज, पाण्यात व हवेत मिसळलेले विषारी पदार्थ- यामुळे होणारी वजावट केली जात नाही. त्यामुळे मणभर गव्हाची राष्ट्रीय संपत्तीत भर पडते, पण गव्हाच्या उत्पन्नामुळे तीन मण माती नष्ट झाल्याचा हिशोब आपल्याकडे नसतो. या अपूर्ण शिक्षणामुळे आपण स्वत:चीच फसगत करतो आणि ‘आपण कितीतरी श्रीमंत आहोत,’ अशी समजूत करून घेतो.
पाचवी समजूत अशी आहे की, उच्चशिक्षण म्हणजे सतत वरवर जाण्याचे आणि यश मिळवण्याचे साधन.
‘अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेली कृत्रिम कोडी सोडविण्याखेरीज ज्यांना काहीही येत नाही अशा लोकांची पैदास’ असे उच्चशिक्षणाबद्दल म्हटले गेले आहे.
तथाकथित ‘यशस्वी’ होऊन काहीही साधत नाही, त्यापेक्षा या जगात वेगळ्या लोकांची गरज आहे. इथे शांतता प्रस्थापित करायला हवी आहे, लोकांचं आरोग्य सुधारायला हवं आहे, लोकांना कथा सांगणारे, त्यांची उद्ध्वस्त आयुष्य रुळावर आणणारे, त्यांच्यावर स्नेह करणारे लोक हवे आहेत. जागोजागी चांगलं आयुष्य जगून दाखविणारे; माणुसकी जपणारे, जग जरा अधिक चांगलं- राहण्याजोगं बनविणारे धैर्यवान, नीतिवान लोक हवे आहेत. आपल्याकडे ज्याला ‘यश’ म्हणतात, त्याचा या सगळ्याशी काही संबंध नाही!
आणि शेवटी, सहावी समजूत आहे की आपली संस्कृती म्हणजे मानवी सामर्थ्यांचे अत्युच्च शिखर आहे. फक्त आपणच अत्याधुनिक तंत्रज्ञानी आणि प्रगतिशील आहोत. ही सांस्कृतिक मगरुरी दाखवते की, आपण इतिहास व मानवशास्त्र नीटसं शिकलोच नाही. सध्या असं मानलं जातं की, आपण शीतयुद्ध जिंकलो; अर्थात भांडवलशाहीनं साम्यवादावर विजय मिळविला. कमी उत्पादन व चढय़ा किमतीमुळे साम्यवाद अयशस्वी झाला. मी म्हणतो, भांडवलशाहीसुद्धा अपयशी ठरली आहे. कारण उत्पादन जास्त होऊनही मोजक्यांना वाटप झाले आहे. शिवाय त्याची प्रचंड किंमत आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना भरायला लागणार आहे.
साम्यवादाची विरक्त नैतिकता माणसांना झेपली नाही, पण भांडवलवादाने तर नैतिकता मारूनच टाकली आहे. अविचारी जाहिरातदार व नेते वर्णन करतात, तसं हे जग आनंदी नव्हे. काही थोडक्या विलासी श्रीमंतांसाठी भरपूर संपत्ती व उरलेल्या वाढत्या दीनदुबळ्या गरिबांसाठी अतोनात दारिद्रय़ असं जग आपण तयार केलं आहे. सर्वात वाईट म्हणजे रस्त्यावर विक्षिप्त, बेभान हिंसाचार, भयानक विषमता आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती अशा एका ढासळणाऱ्या संस्कृतीत आपण जगत आहोत. ‘हॉलिस्टिक रिव्ह्य़ू’चे संपादक रॉन मिलर यांच्या शब्दात सांगायचे तर-
‘आपली संस्कृती उदात्त व उत्तम मानवी संवेदनांना उत्तेजन देत नाही. दूरदृष्टी, कल्पनाशक्ती, खरे सौंदर्य आणि आध्यात्मिक संवेदनशीलता, हळुवारपणा, दानत, करुणा या कोणत्याही भावनांना आपण प्रोत्साहन देत नाही. विसाव्या शतकात जग आर्थिक, तांत्रिक व सांख्यिक दृष्टीने, प्रेमळ व जीवनदायी अशा मानवी आत्म्याचा राक्षसी नाश करीत आहे.’
शिक्षण कशासाठी हवे?
मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवर टिकून राहावे, या एकाच हेतूने मी शिक्षणासंदर्भात सहा सूत्रे सूचित करतो-
१. प्रथमत: सर्व शिक्षण हे पर्यावरण शिक्षणच आहे. अर्थात जे विषय घेतले जातात, त्यातून हे सूचित होत असतं की, आपण कशाचा भाग आहोत किंवा जे विषय बाजूला टाकले जातात, त्यातून सांगितलं जातं की, कोणता भाग आपल्या विश्वातच धरू नये. उदा. अर्थशास्त्र शिकवताना औष्णिक गतिशास्त्राचा (ळँी१े ८िल्लं्रेू२) किंवा परिस्थिती विज्ञानाचा (ीू’ॠ८) संदर्भ न घेता शिकवणे म्हणजे ‘अर्थशास्त्राचा या दोन्हीशी काहीतरी संबंध नाही, ही दोन्ही शास्त्रे वेगळी आहेत’ असेच शिकविणे आहे. हे संपूर्णत: चुकीचे आहे, पण ही चूक सर्व अभ्यासक्रमातून दिसून येते.
२. शिक्षणाचे ध्येय विषयवस्तूमधील नैपुण्य नसून, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर, आकांक्षेवर ताबा मिळवणे असे आहे. विषयवस्तू फक्त माध्यम आहे. ज्याप्रमाणे पाषाणातून शिल्पनिर्मिती करताना छिन्नी व हातोडय़ाचा उपयोग केला जातो, तसेच स्वत:ला घडविण्यासाठी संकल्पना व ज्ञानाचा उपयोग करायला हवा, पण काय साधन आहे आणि काय साध्य या गोंधळात शिक्षणाचं ध्येय हरवतं. फक्त तंत्रज्ञान, माहिती, तथ्ये, पद्धती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबल्या जातात. त्याचा उपयोग काय, हा विचारच आपण करीत नाही.
३. जगात ज्ञान योग्य तऱ्हेने वापरण्याची जबाबदारी ही त्या त्या माणसाचीच असते. समकालीन संशोधनाचे राक्षसी कर्तृत्व मेरी शेलीच्या ‘फाऊस्ट’मधून आधीच दाखवून दिलं गेलेलं आहे. तंत्रज्ञान व त्याच्या वापरामुळे होणाऱ्या राक्षसी परिणामांची जबाबदारी कोणीही घेत नाही, तशी अपेक्षाही केली जात नाही! चेर्नोबिलची दुर्घटना, ओझोनचा थर नष्ट होणे, समुद्रात झालेले तेल उत्सर्जन या सर्व दुर्घटना केवळ अशा बेजबाबदार वापरामुळेच झाल्या. शेवटी असं वाटतं की, ज्ञानालाही मर्यादा हवी. अवाढव्य आणि धोकादायक घटना घडविण्याचं ज्ञान आपल्याकडे आहे; परंतु त्यांचे दुष्परिणाम टाळण्याची जबाबदारी आपल्याला घेता येत नाही.
४. ज्या ज्ञानाचा परिणाम प्रत्यक्ष लोकांसाठी आणि समाजासाठी होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. यंग्सटाऊन, ओहायो येथील समाजाचे फार मोठे नुकसान आर्थिक निर्गुतवणुकीमुळे झाले. या घटनेत फायद्याची खरेदी, कर सवलती, फिरते भांडवल या नावाखाली, एखादी आक्रमक सेना करू शकणार नाही, एवढे नुकसान झाले. एका अमेरिकन शहराचा नायनाट झाला. त्याबद्दल हे निर्गुतवणुकीचे निर्णय घेणाऱ्या उच्चशिक्षितांना काहीही शिक्षा होणार नव्हती. केवळ एका तळटीपेच्या जोरावर (अटी लागू!) त्यांची सुटका झाली.
पण समाजाच्या पातळीवर अशी नुसती तळटीप देऊन भागत नाही. इतर समस्यांचाही विचार करावा लागतो. उदा. बेरोजगारी, गुन्हेगारी, घटस्फोटांचे वाढते प्रमाण, दारूसारखी व्यसने, बालकांवर अत्याचार, गमावलेली गुंतवणूक आणि बरबाद झालेली आयुष्ये! यांचाही विचार समाजाला या तळटीपेबरोबर करावा लागतो. यावरून कळतं की, व्यवस्थापनशास्त्र व अर्थशास्त्र विभागात चांगल्या सामाजिक व्यवस्थेचं मूल्यं शिकवलं जात नाही. तिथला कोता विध्वंसक, आर्थिक शहाणपणा शेवटी उपयुक्त ठरत नाही. जिथे फक्त कार्यक्षमता आणि सार काढणं किंवा सामान्य नियम बनवणं महत्त्वाचं मानलं; त्याची मानवी किंमत किती द्यायला लागते ते तिथं शिकवलं जात नाही.
५. हे मुलांच्या डोळ्यापुढे आदर्श उदाहरणं ठेवण्याबद्दलचं आहे. चांगल्या शिक्षणासाठी आज अत्यावश्यक झालेली गोष्ट म्हणजे डोळ्यापुढे आदर्श म्हणून ठेवता येतील, असे प्राध्यापक- शिक्षक; जे विचारी आणि प्रामाणिक आहेत, ज्यांच्याकडून सचोटी, आस्था शिकून घ्यावी, असे शिक्षक. शिवाय ज्या संस्थांमध्ये मुलं शिकणार, त्या संस्थादेखील त्यांच्या संपूर्ण कामामध्ये आदर्श तत्त्वांचं पालन करणाऱ्या हव्यात. आज जेव्हा संस्था एका बाजूला जागतिक जबाबदारीविषयी बोलतात आणि दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये अत्यंत बेजबाबदारपणे गुंतवणूक करतात, तेव्हा त्यातून प्रत्यक्षात पोकळ दिखाव्याचे, ढोंगीपणाचे धडे मिळतात; शेवटी मुलांच्या पदरात निराशाच येते.
६. सरतेशेवटी मी असे नमूद करतो की, शिक्षणाची प्रक्रिया एखाद्या विशिष्ट विषयामधील आशयाइतकीच महत्त्वाची आहे. व्याख्यानाच्या रूपात शिकवलेले विषय निष्क्रियता आणतात. शिक्षण हे चार भिंतींच्या आत, वास्तव जगापासून वेगळं घडतं असा आभास निर्माण होतो. जीवशास्त्राच्या वर्गात बेडूक कापताना निसर्गाविषयी शिकता येतं असं कोणी म्हणणारही नाही. विद्यापीठाच्या चौकटीतील शिक्षण निष्क्रियता, एकांगी विचार, कृत्रिमता, स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित करणं अशा गोष्टींना बळकटी देतं. मला एवढंच म्हणायचं आहे की, मुलं अभ्यासक्रमापलीकडच्या विविध गोष्टी सूक्ष्म निरीक्षणातून शिकत असतात.
विद्यापीठांसाठी उपक्रम
पृथ्वीतलावर मानवाचं अस्तित्व टिकण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार केला, तर त्याचे मूल्यमापन कसं करता येईल, याविषयी मला चार सूचना द्याव्याशा वाटतात-
१) जसं शिक्षक म्हणून व्याख्यानं देता, तसंच महाविद्यालयाच्या परिसरात संवाद, चर्चासत्रं सुरू करा- ‘महाविद्यालयातील चार वर्षांचे पदवी शिक्षण त्यांना या ग्रहावरील चांगले रहिवासी बनविते की, भटके विध्वंसक व्यावसायिक? हे महाविद्यालय टिकाऊ प्रादेशिक अर्थव्यवस्था वाढविण्यास हातभार लावते की, कार्यक्षमतेच्या नावाने सर्वनाशाची पद्धत शिकविते?’ असे विषय चर्चेला घेऊ शकता.
२) येथे कोणत्या संसाधनांची वाढ होते? अन्न, ऊर्जा, पाणी, वस्तू की कचरा? शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विहिरी, खाणी, शेते, कुरणे व जंगले, जी परिसराला पुरवठा करतात त्यांचा अभ्यास करावा. कचऱ्याची विल्हेवाट कुठे, कशी लावली जाते त्याचीही तपासणी करावी. अर्थात एक अशी प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, की संस्थेच्या क्रयशक्तीचा उपयोग पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी करता येईल. कार्बनडायऑक्साइडचे कमी उत्सर्जन, विषारी वस्तूंचा कमी वापर, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जेचा वापर, टिकाऊ स्थानिक अर्थव्यवस्था उभी करणे, दीर्घकालीन खर्चावर मर्यादा इत्यादी. अशा योजनांद्वारे इतर संस्थांसाठी एक आदर्श उभा राहील. या अभ्यासाचे निकष नेहमीच्या अभ्यासक्रमात गुंफायला हवेत. सभा, व्याख्याने, संशोधनातून, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमधून वापरायला हवेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांना विविध संसाधनांचे स्रोत, त्यांचा योग्य वापर, योग्य विल्हेवाट याबद्दल माहीत होत नाही आणि वास्तवातल्या खऱ्या समस्यांवर खरे उपाय शोधून काढता येत नाहीत, तोपर्यंत त्यांना पदवी मिळू नये.
३) केलेल्या गुंतवणुकीची पुनर्तपासणी व्हायला हवी. गुंतवणुकीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठीच होतो का? त्या कंपन्या जागतिक पातळीवर उपयुक्त ठरणारी कामे, जबाबदार पद्धतीने करतात का? यातील काही भाग स्थानिक ऊर्जास्रोत वाढविण्यासाठी उपयोगात आणता येईल का? संपूर्ण प्रदेशात टिकाऊ व्यवस्थेचा विस्तार यामुळे होऊ शकेल का?
४) सरते शेवटी मी असे मांडतो की, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण साक्षरतेचे ध्येय ठरवा. कोणत्याही विद्यार्थ्यांला पायाभूत पर्यावरणाची माहिती असल्याशिवाय (या किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून) त्याला पदवी मिळणार नाही.
संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेच्या चक्राचे आपण फक्त दाते (ूॠ२) आहोत. पर्यावरणीय चक्राच्या गतीला साथ दिली तर आपले मानसिक व भौतिक धन अपरिमित काळापर्यंत वाढत राहील, पण जर आपण पर्यावरणाच्या गतीचा अंदाज घेतला नाही, त्यांचा नाश केला, तर शेवटी आपण धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर शिक्षणाने आपल्याला एवढेही समजले नाही, तर शिक्षण हवे कशासाठी?
अनुवाद : मीना आगटे
meena_agate@yahoo.com
(शैक्षणिक संदर्भ वेबसाईट : sandarbhsociety.org
ईमेल : sandarbh.marathi@gmail.com)