मी इयत्ता दहावीत शिकत आहे. मला यूपीएससी परिक्षा देऊन आयपीएस अधिकारी बनायचे आहे. तर मी दहावीनंतर कोणती शाखा निवडावी? दहावीचे गुण यूपीएससीसाठी महत्त्वाचे आहेत का? किमान किती गुण आवश्यक आहेत?

– सृष्टीराज कुटे

सृष्टीराज, तुझी इच्छा, तुझे स्वप्न, हे चांगलेच आहे. त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील असा तुझा प्रश्न आहे. तसेच याकरता किती गुण लागतात? म्हणजे हे सर्व मिळेल असाही एक भाबडा प्रश्न तू विचारला आहेस. सध्या दहावीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि बारावी परीक्षेचे दडपण घेऊन ती देणारे तितकेच विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील या दोन्ही परीक्षा देणाऱ्या सुमारे ३२ लाख विद्यार्थ्यांना समोर ठेवून मी तुझ्या निमित्ताने सविस्तर उत्तर देत आहे. खरेतर हे उत्तर करिअर वृत्तांत वाचणाऱ्या अनेक पालकांना उपयोगी पडू शकेल.

प्रत्येकाने आपले इयत्ता नववीचे मार्क पायाभूत समजावेत व त्यात दरवर्षी एक टक्का किमान वाढ करत कोणत्याही शाखेतील पदवी मिळवावी. यामध्ये शाखेला मी अजिबात प्राधान्य देत नाही. ती ज्याने त्याने स्वत:च्या आवडीने निवडावी, पण त्यात बदल करण्याच्या फंदात चुकूनसुद्धा पडू नये. बारावी सायन्स करून नंतर अन्य शाखेकडे वळणारे यांची संख्या महाराष्ट्रात फार मोठी आहे. नेमक्या आकड्यातून बोलायचे झाले तर दोन लाख ७० हजार विद्यार्थी यंदा असे निघतील. ज्याचे ध्येय स्पर्धा परीक्षा आहे त्याने दुसरे कोणते पर्याय चालतील याची माहिती करून घेणे गरजेचे असते. प्रत्येक शाखेतून घेतलेल्या विविध पदवींच्या संदर्भात असे चांगले अनेक पर्याय उपलब्ध असतात. सहसा पदवी हातात आली तरी या पर्यायांची माहिती विद्यार्थी व पालक करून घेत नाहीत ही दुर्दैवाची बाब मुद्दाम नोंदवत आहे.

शालेय जीवनात किंवा पदवी घेत असताना हातात वृत्तपत्र न धरणाऱ्याने स्पर्धा परीक्षा हा शब्दही काढू नये. परिपूर्ण सामान्य ज्ञान गोळा करण्याची क्षमता सातत्याने वाढवत नेणारा विद्यार्थी या रस्त्याला यश मिळवतो. सर्व प्रकारच्या बातम्या,अग्रलेख, करिअर वृत्तांतचे पान याचे वाचन आवश्यक. जोडीला एका इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन फायद्याचे ठरते.

तुम्हाला काय करायचे आहे याची घरच्यांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यांचा आर्थिक पाठिंबा मिळवणे तितकेच महत्त्वाचे. तो नसेल तर स्वत:च्या पायावर प्रथम भक्कमपणे उभे राहणे ही पद मिळवण्याची प्राथमिकता असते.

शेवटी राहिला तुझा महत्त्वाचा प्रश्न. याला गुण किती लागतात? ७० टक्क्यांवरचे सातत्य टिकवणारा विद्यार्थीच या स्पर्धेत कसाबसा टिकतो. याउलट ९० टक्क्यांचा विद्यार्थी चिकाटी व सातत्य नसेल तरी मागे पडतो. कोणत्याही शाखेतील अ शी पदवी मिळेपर्यंत मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत हे वाक्य फक्त मनातच ठेवावे.

careerloksatta@gmail. com

Story img Loader