JEE Main Result : संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२४ मध्ये विक्रमी ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये सान्वी जैन (कर्नाटक) आणि शायना सिन्हा (दिल्ली) या विद्यार्थिनींचाही समावेश आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने बुधवारी रात्री जानेवारी आणि एप्रिल सत्राच्या पेपर १(BE/Tech)चे एकत्रित निकाल जाहीर केले.
सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या यागीत १५ विद्यार्थ्यांसह राज्यानुसार तेलंगणा सलग तिसऱ्या वर्षी आघाडीवर आहे. तर, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी सात उमेदवारांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून दिल्लीतील सहा विद्यार्थी आहेत. १४.१ लाख विद्यार्थ्यांनी यंदा जेईई मेनसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यंदा नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सुमारे २४ हजार जागा आहेत.
यंदा ११ लाख ७९ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी जेईई मेनसाठी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १० लाख ६७ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २ लाख २९ हजार ६०० विद्यार्थिंनींचा समावेश होता तर, उर्वरित पुरूष विद्यार्ती होती. तसंच, ८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही ही परीक्षा दिली.
जेईई मेनच्या जानेवारी सत्रात २३ उमेदवारांनी १०० टक्के तर एप्रिल सत्रांतील ३३ जणांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. ५६ टॉपर्समधील ४० जण खुल्या प्रवर्गातील, १० जण ओबीसी आणि सहा विद्यार्थी ईडब्ल्यूएसमधील आहेत. जेईई अॅडवान्ससाठी पात्र होण्याकरता जेईई मेनमधील पात्रता टक्केवारीने सर्व श्रेणींमध्ये पाच वर्षांनी उच्चांक नोंदवला आहे. जेईई मेन २०२३ मधील २ लाख ५१ हजार ६७३ उमेदवार जेईई अॅडवान्ससाठी पात्र ठरले आहेत. यावर्षी २ लाख ५० हजार २८४ उमेदवार जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक यशस्वी उमेदवार ठरले आहेत. जेईई अॅडवान्ससाठी १७ एप्रिलपासून नोंदणी सुरू होईल. तर, संपूर्ण आयआयटीमध्ये सुमारे १७ हजार ३८५ जागा उपलब्ध आहेत.
परदेशातही होते परीक्षेचे केंद्र
ही परीक्षा १३ भाषांमध्ये म्हणजेच आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये पार पडली. तर, दोहा, दुबई, मनामा, ओस्लो, सिंगापूर, क्वालांलपूर, लागोस, अबुजा, जकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को आणि वॉशिंग्ट डीसी आदी भारताबाहेरील केंद्रामध्येही ही परीक्षा घेण्यात आली होती.
या राज्यातील विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण…
तेलंगणा: १५ विद्यार्थी
महाराष्ट्र: ७ विद्यार्थी
आंध्र प्रदेश : ७ विद्यार्थी
राजस्थान : ५ विद्यार्थी
दिल्ली (NCT): ६ विद्यार्थी
कर्नाटक : ३ विद्यार्थी
तामिळनाडू: २ विद्यार्थी
पंजाब: २ विद्यार्थी
हरियाणा: २ विद्यार्थी
गुजरात: २ विद्यार्थी
उत्तर प्रदेश: १ विद्यार्थी
इतर: १ विद्यार्थी
झारखंड: १ विद्यार्थी
चंदिगड: १ विद्यार्थी
बिहार: १ विद्यार्थी