Success story of a milk man from Bihar: भारताच्या १४० कोटी लोकसंख्येपैकी किमान ४० कोटी लोक नोकरीच्या शोधात असतात. देशातील अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोक नोकरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. दरम्यान, या सगळ्या धकाधकीच्या जीवनात काही लोक असे आहेत, ज्यांच्याकडे व्यवसाय करण्याची क्षमता असते आणि त्या क्षमतांचा वापर करून ते लाखो रुपये कमवण्यात यशस्वी होतात.

बिहारमधील दूध विक्रेता तीर्थानंद सिंग यांची प्रेरणादायी गोष्टदेखील काही अशीच आहे. तीर्थानंद सिंग यांनी वयाच्या १० व्या वर्षी दूध विकायला सुरुवात केली आणि आजही वयाच्या ७० पेक्षा जास्त वयात ते दूध विकत आहेत. असे असूनही ते दररोज गावापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगंज मुख्यालयाच्या बाजारात विक्रीसाठी जातात. तीर्थानंद सिंग यांनी सांगितले की, ते आजही दररोज ४५-५० लिटर दूध विकण्यासाठी बाजारात जातात.

हेही वाचा… स्वप्नांपुढे सारे फिके! एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा

एका म्हशीपासून सुरू केला व्यवसाय

अररिया जिल्ह्यातील राणीगंज ब्लॉक अंतर्गत बागुलहा पंचायत वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारे तीर्थानंद सिंग सांगतात की, त्यांना लहानपणापासून दूध विकण्याची आवड होती. या छंदाला व्यवसायात रूपांतरित करून त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.

लहानपणी त्यांनी एका म्हशीपासून हे काम सुरू केले आणि हळूहळू पैसे मिळवून अनेक गाई-म्हशी विकत घेतल्या. यातून त्यांना अधिक नफा मिळू लागला. यानंतर पहिली अर्धा एकर जमीन खरेदी केल्यानंतर त्यातून त्यांनी व्यवसाय वाढवला. हळूहळू हे काम करत असताना त्यांनी ८पेक्षा जास्त जमीनी खरेदी केल्या. तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून ट्रॅक्टर, दुचाकी आणि वाहने खरेदी केली आणि अनेक घरं बांधली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींचं धुमधडाक्यात लग्नदेखील लावून दिलं.

हेही वाचा… Flipkartला विकली कंपनी अन्…, आज आहेत भारतातील सर्वात मोठ्या जिमचे संस्थापक; वाचा प्रसिद्ध उद्योजक मुकेश बन्सल यांची यशोगाथा

दूध विकून घेतली आठ एकर जमीन

जर तुम्हाला कोणतेही काम करण्याची योग्य पद्धत माहीत असेल आणि तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दूध विकूनदेखील भरपूर पैसे कमवू शकता, हे तीर्थानंद सिंग यांनी दाखवून दिलं. राणीगंज, अररिया येथे राहणारे तीर्थानंद सिंग यांनी दूध विकून आठ एकर जमीन खरेदी केली आणि तीन वेगवेगळी वाहने खरेदी करून आपला व्यवसाय यशस्वी केला. तीर्थानंद सिंग यांची ही गोष्ट देशातील करोडो लोकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.