Vipin Sharma : आमिर खान याच्या करिअरमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘तारे जमीन पर’. या चित्रपटाने पालक आणि मुलांविषयीच्या अशा गोष्टी दाखवल्या, ज्याविषयी यापूर्वी कोणीही विचार केला नव्हता. मनोरंजक पद्धतीने या चित्रपटाने पालकाची भूमिका, मुलांवर अभ्यासाचा दबाव व मुलांना जाणवत असलेला एकटेपणा समजून घेण्यास मदत केली.

अमोल गुप्ते आणि आमिर खानने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय दिला. आमिर खान, दर्शिल सफारी, टिस्का चोप्रा व विपीन शर्मा हे प्रमुख भूमिकांत होते. विपीन शर्माने या चित्रपटात ईशानच्या कठोर वडिलांची भूमिका साकारली. ही भूमिका या चित्रपटातील प्रमुख पात्रांपैकी एक होती. विपीनचे आयुष्य नेहमी संघर्षमय राहिले. आज जरी तो एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जात असला तरी त्यासाठी त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला.

तरुणपणी बंडखोर होता

लल्लनटॉपच्या यूट्यूब चॅनलवरील एका मुलाखतीत विपीनने ‘तारे जमीन पर’मध्ये भूमिका साकारण्यापूर्वीच्या त्याच्या प्रवासाविषयी सांगितले. त्याने कॅनडाला जाण्याचा विचार केला होता; पण त्याच्या लक्षात आले की, अभिनय हाच त्याचा खरा व्यवसाय आहे. विपीन सांगतो की, तरुणपणी तो खूप असमाधानी व बंडखोर होता. तो अनेकदा वाद घालत असे आणि अडचणीत येत असे. एकदा ट्रेनमध्ये स्लीपर बर्थसाठी दहा रुपये तिकिट देणे परवडत नसल्यामुळे त्याने इमर्जन्सी चेन ओढली आणि रात्रीच्या वेळी अचानक कुठल्या तरी स्टेशनला त्याला उतरावे लागले. तो झोपडपट्टीत वाढल्यामुळे आणि त्याच्या सभोवतालही त्याने खूप जास्त भ्रष्टाचार पाहिल्यामुळे त्याच्या मनात समाजाविषयी राग आणि निराशा होती.

पोटापाण्यासाठी विपीनने अनेक नोकऱ्या केल्या

त्याने आयुष्यात पोटापाण्यासाठी अनेक नोकऱ्या केल्या. त्यापैकी एक म्हणजे रेस्टॉरंटमध्ये असिस्टंट शेफ म्हणून काम केले. तो शाकाहारी असूनही त्याला कच्चे मांस कापून स्वच्छ करावे लागायचे, ज्यामुळे त्याला खूप अस्वस्थता जाणवत असे. अनेकदा तो स्वत:ला असहाय समजत असे. तो देवाजवळ प्रार्थना करायचा आणि त्याला प्रश्न विचारायचा. एकदा अशीच देवाची प्रार्थना केल्यानंतर त्याला कॅनडातील टोरंटोमध्ये एका प्रमुख टेलिव्हिजन चॅनेलचा संपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.

अभिनयात वापसीनंतर, विपीनने अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मंकी मॅन, गँग्स ऑफ वासेपूर व हॉटेल मुंबई. २०२० च्या ‘पाताल लोक’ या सीरिजमध्ये त्याचा अभिनय सर्वांत उल्लेखनीय भूमिकांपैकी एक आहे. अलीकडेत तो साकिब सलीम, राजेश तैलंग आणि राहुल भट यांच्याबरोबर क्राइम बीट या टीव्ही सीरियलमध्ये दिसला होता.