भारतातील आयआयटीच्या संस्था त्यांच्यामधील दर्जेदार शिक्षणामुळे जगभरात दबदबा राखून आहेत. आयआयटीमध्ये फक्त अभियांत्रिकी शिक्षणाचे अभ्यासक्रम चालवले जातात असा सार्वत्रिक समज आहे; परंतु आयआयटीमध्ये बीएससीनंतर पदव्युत्तर शिक्षणाची ही सोय आहे.
भिलाई, भुवनेश्वर, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, जम्मू, जोधपूर, मंडी, मुंबई, पलक्कड, पाटणा, रुरकी, धनबाद, गांधीनगर, गुवाहाटी, धारवाड, कानपूर, खरगपूर, मद्रास, रोपार, तिरुपती, वाराणसी, बेंगळूरु या तेवीस आयआयटी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बेंगळूरु) अशा सर्व संस्थांमध्ये बीएससी नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी एक ‘जाम’ नावाची सीईटी घेतली जाते. देशांतील शंभर शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत बायो टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जिऑलॉजी, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि फिजिक्स या सात विषयांवर पेपर्स असतात. विद्यार्थी त्यापैकी एक किंवा दोन पेपर्स देऊ शकतील. ही परीक्षा कॉम्प्युटरवर होईल आणि ती तीन तासांची असेल. यामध्ये तीन सेक्शन असतील. पहिल्या सेक्शन मध्ये तीस बहुपर्यायी प्रश्न असतील आणि निगेटिव्ह मार्किंग असेल. दुसऱ्या सेक्शन मध्ये दहा बहुपर्यायी प्रश्न असतील मात्र निगेटिव्ह मार्किंग नसेल. तिसऱ्या सेक्शन मध्ये वीस गणितीय प्रश्न असतील. या परीक्षेचे आधीच्या वर्षीचे पेपर JAM 2025 च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच या संकेतस्थळावर मॉक टेस्टही उपलब्ध होईल. या परीक्षेसाठी ११ ऑक्टोबर पर्यंत https:// jam2025. iitd. ac. in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. या परीक्षेच्या मार्कांवर बावीस आयआयटी मधील तीन हजार जागांवर तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बेंगळूरु), आयसर, एनआयटी सह विविध संस्थांमधील दोन हजार जागांवर प्रवेश मिळतो.
बीएससी नंतर देशातील अग्रगण्य संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.