१२ वीनंतर विविध क्षेत्रांतील तरुण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तयारी करतात. ही भरती वाटते तितकी सोप्पी नसते, कारण १० हजार रिक्त पदांसाठी एकाच वेळी लाखो उमेदवार मैदानात उतरतात. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल भरतीचे नेमके निकष काय असतात जाणून घेऊ…
अनेक तरुणांना १२ वीनंतर पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक तरुणांना पोलीस खात्यात नोकरी करायची इच्छा असते, पण त्यांना योग्य माहिती, मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्णच राहते. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी कशी तयारी करायची, त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय किती असायला हवे याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊ…
पोलीस कॉन्स्टेबलला हिंदीमध्ये शिपाई किंवा आरक्षी या नावाने ओळखले जाते. पोलीस खात्यातील हे सर्वात प्राथमिक पद आहे. पोलीस ठाण्यात त्यांच्यावर वरिष्ठ हवालदार, त्यानंतर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असतात.
शैक्षणिक पात्रता
पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे १२ वी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पण भरतीसाठी १२ वीची किमान पात्रता ठेवण्यात आलेली नाही.
वयोमर्यादा
पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. पण यात एससी, एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते.
पात्रता
पुरुष उमेदवाराची उंची १६८ से .मी. आणि महिला उमेदवाराची उंची १५० से. मी. असावी. तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात असावे. यात तुम्हाला मधुमेह, हृदयविकार किंवा इतर कोणतेही गंभीर आजार नसावेत, याशिवाय विवाहित उमेदवारांना दोनपेक्षा जास्त मुले नसावीत.
तीन टप्प्यात केली जाते निवड!
तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तीन टप्पे पार करावे लागतात. प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर शारीरिक तपासणी आणि शेवटी वैद्यकीय परीक्षा घेणे आवश्यक आहे. हे तीन टप्पे पार झाल्यानंतर तुमची निवड होते.
शारीरिक चाचणी
लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. यावेळी धावण्याची शर्यत घेतली जाते, ज्यात उमेदवाराला ५ कि. मी. धावायचे असते. पुरुष उमेदवारांना २५ मिनिटांत आणि महिला उमेदवारांना ३५ मिनिटांत धावण्याची शर्यत पूर्ण करावी लागते. यासोबतच उमेदवारांच्या छातीची लांबी आणि रुंदी मोजली जाते. छाती न फुलवता ८३ से. मी. आणि फुलवल्यानंतर ८७ से. मी. असावी. या अटीतून राखीव प्रवर्गाला सूट मिळते.
वैद्यकीय चाचणीमध्ये उमेदवारांच्या आरोग्याची आणि शरीराच्या सर्व अवयवांची तपासणी केली जाते. उमेदवारांच्या डोळ्यांची दृश्यमानता 6/6-6/6 असणे आवश्यक आहे. हे टप्पे पार केल्यानंतरच उमेदवारांना शारीरिक चाचणीत पात्र असे घोषित केले जाते.
कागदपत्रांची पडताळणी
वरील दोन्ही टप्प्यांत यशस्वी उमेदवारांना तिसऱ्या फेरीसाठी बोलावले जाते. यामध्ये अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते, सर्व कागदपत्रे बरोबर आढळल्यानंतरच उमेदवाराला पात्र घोषित केले जाते.
पोलीस कॉन्स्टेबलला पगार किती असतो?
एका पोलीस कॉन्स्टेबलचा महिन्याचा पगार २०,१९० ते २४,००० हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच सरकारी निवास, पीएफ, पेन्शन आणि कुटुंबातील सदस्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचीही तरतूद आहे.