दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टींचं एआयच्या मदतीनं आपण स्वयंचलन (ऑटोमेशन) करू शकतो. सर्वसामान्यपणे या गोष्टांसाठी माणसाला काहीतरी कृती करावी लागते. एआयमुळे मात्र याची गरज उरत नाही. स्वाभाविकपणे यामुळे अनेक गोष्टींमध्ये आपला विनाकारण वाया जात असलेला वेळ कमी होऊ शकतो. अर्थातच हे स्वयंचलन फक्त दैनंदिन आणि सोप्या कामांच्या बाबतीतच लागू पडतं, असं नाही. क्लिष्ट प्रकारच्या कामांचं स्वयंचलन करण्यासाठीसुद्धा एआयचं तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरू शकतं.
सुरुवातीला यासाठी एआयला आपल्याला प्रशिक्षित करावं लागतं. अर्थातच त्यासाठी माहितीचे साठे आपल्याला बनवावे लागतील आणि त्यांचा वापर एआयला शिक्षण देण्यासाठी करावा लागेल. यामुळे संगणकाला माहितीच्या आधारे निर्णय घेणं शक्य होतं. त्यानंतर एआयचं तंत्रज्ञान माणसानं करायची कामं स्वत: करू शकतं. खास करून तोचतोचपणा, कंटाळा, क्लिष्टता अशा गोष्टी यामुळे टळू शकतात. याखेरीज ज्या कामांमध्ये आपल्याला पटकन प्रतिसादाची किंवा कृतीची गरज असते तिथेसुद्धा हे तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरू शकतं.
एआयच्या मदतीनं केल्या जाणाऱ्या स्वयंचलनाचं अगदी सर्रास वापरलं जाणारं आणि दृश्य स्वरूपातलं उदाहरण म्हणजे आपला चेहरा ओळखून आपला स्मार्टफोन अनलॉक होणं. यासाठी आपला चेहरा आपण आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेरासमोर धरताच आपल्या चेहऱ्याची काही वैशिष्टयं तपासली जातात. ही वैशिष्टयं आपल्या फोनमध्ये आधी साठवलेल्या वैशिष्टयांशी मिळतीजुळती आहेत का, याचा अभ्यास केला जातो. यासाठी चेहरा ओळखण्यासाठीचं ‘फेशियल रेकग्निशन’ हे तंत्रज्ञान वापरलं जातं. यात आधी वर्णन केलेल्या डीप लर्निंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. यात मशीन लर्निंगचाही वापर होतो.
अपुरा किंवा वेगळ्या प्रकारचा प्रकाश, काही कारणांमुळे चेहऱ्याच्या ठेवणीत झालेले बदल या सगळ्या गोष्टींचाही यात विचार केला जातो. या सगळ्यातून आपला आत्ता दिसत असलेला चेहरा हाच या फोनच्या मालकाचा चेहरा आहे का, हे एआयचं तंत्रज्ञान ठरवतं.
आपल्या फोनमधल्या छायाचित्रांमधले लोक, ठिकाणं, वस्तू वगैरे ओळखून त्यानुसार त्या छायाचित्रांची वर्गवारी करण्याचं काम हे तंत्रज्ञान करू शकतं. आपल्याला आलेल्या इमेलचं वर्गीकरण करणं, त्यामधल्या कुठल्या इमेल कामाच्या आहेत आणि कुठल्या इमेल कचरा (‘स्पॅम’) प्रकारच्या आहेत हे ओळखून त्यानुसार त्यांना विभागणं, आपण आधी विकत घेतलेल्या वस्तूंनुसार आपल्याला आता कुठल्या वस्तू विकत घ्याव्यात याविषयी सुचवणं अशा अनेक गोष्टी या स्वयंचलनामुळे शक्य होतात. हा सगळा डोलारा एआयच्या तंत्रज्ञानावर आधारलेला असल्यामुळे अर्थातच त्याचा आधारस्तंभ म्हणजे चांगल्या प्रकारचा ‘डेटा’ हाच असतो. साहजिकच जसजशी या ‘डेटा’च्या दर्जात आणि प्रमाणात वाढ होत जाईल तसतसं स्वयंचलनाच्या तंत्रज्ञानाचं कामकाजसुद्धा सुधारत जातं. त्यामधली अचूकता वाढत जाते आणि त्याच्या कामात आणखी नेमकेपणा येतो.
आरोग्य क्षेत्रात स्वयंचलनाची संकल्पना खूप उपयुक्त ठरू शकेल. याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसाची प्रकृती, शारीरिक तसंच मानसिक स्थिती यानुसार त्या माणसाला आजारपणाच्या काळात काहीशा वेगवेगळ्या गोष्टी उपचार म्हणून उपयुक्त ठरू शकतात. एकच एक असा सरसकट उपाय दर वेळी सगळ्यांनाच लागू पडेल, असं ठामपणे सांगता येत नाही. अशा वेळी स्वयंचलनाच्या संकल्पनेमुळे कुठल्या माणसासाठी कोणते उपचार जास्त योग्य ठरतील याचा विचार केला जाऊ शकतो. त्यानुसार निरनिराळ्या माणसांच्या उपचारपद्धतीत किंवा अगदी औषध-गोळ्यांमध्येही फरक असू शकतो. हाच मुद्दा आर्थिक आरोग्याच्या बाबतीतही लागू पडतो.
प्रत्येक माणसाची सद्यापरिस्थिती, जोखीम अंगावर घेण्याची ताकद, गुंतवणुकीचा कालावधी, उद्दिष्टं हे सगळं वेगवेगळं असू शकतं. अशा वेळी स्वयंचलनामुळे त्या-त्या माणसाच्या दृष्टीनं कोणती गुंतवणूक योग्य राहील, हे ठरवता येऊ शकतं. साहजिकच अगदी वैयक्तिक पातळीवरच्या उपाययोजनांसाठी स्वयंचलनाची संकल्पना उपयुक्त ठरते.
भविष्यात ‘स्मार्ट होम’ संकल्पना लोकप्रिय होईल, असं मानलं जातं. यात घराची सुरक्षितता, वातानुकूल यंत्रणा, स्वच्छता अशा अनेक गोष्टींची काळजी आपोआप घेण्याची क्षमता या स्वयंचलन यंत्रणेत असेल. ग्राहकसेवेचं काम करत असताना ग्राहकांना दिल्या जात असलेल्या प्रतिसादांचा किंवा त्यांच्या शंकांना दिल्या जात असलेल्या उत्तरांचा दर्जा आणखी वाढत जाईल. कामाच्या ठिकाणी सर्वसाधारण प्रकारच्या कामांमध्ये कर्मचारी लोक आपला वेळ वाया न घालवता अशा प्रकारची कामं स्वयंचलन यंत्रणांकडून करून घेतील.
अर्थातच स्वयंचलन या वरदानाचा फटका अगदी नेहमीची कामं करून आपलं पोट भरत असलेल्या लोकांना बसू शकेल याचा उल्लेखही केला पाहिजे!
akahate@gmail.com