कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे विविध मार्ग आधुनिक विज्ञानाने दिले, पण सॅनिटरी पॅडच्या विघटनाची समस्या सुटू शकलेली नव्हती. एका सॅनिटरी पॅडचे विघटन होण्यासाठी ७०० ते ८०० वर्षे लागतात. म्हणजे १८०० साली तयार झालेला जगातला पहिला सॅनिटरी पॅड अजूनही विघटित झालेला नाही. या समस्येवर यशस्वी तोडगा काढला तो अजिंक्य धारिया या तरुणाने. या विषयी जाणून घेऊ त्याच्याच शब्दांत…
मी मूळचा कोकणातील. श्रीवर्धनजवळील म्हसळा गावात माझे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. माझी आई सामाजिक क्षेत्रात काम करायची. विविध महिलांसाठी काम करायची. तिच्या कामाचा प्रभाव माझ्यावर होता. अकरावी, बारावीचे शिक्षण मुंबईत झाले. तेथून मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण नांदेडमध्ये श्री गुरु गोविंदसिंग महाविद्यालयातून घेतले. शिकता शिकता मी यंत्र, गाडी, एनर्जी मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंटसंदर्भात वेगळ्या पद्धतीने काही बनवता येते का याची चाचपणी मी करू लागलो. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा हीच माझी पूर्वीपासून इच्छा होती. ते करण्यापूर्वी कोणतातरी अनुभव घ्यावा या दृष्टीने मी ग्राइंड मास्टर या कंपनीत नोकरी करू लागलो. ही कंपनी नॅनो एक्स हे तंत्रज्ञान बनवत होती. तिथे मी आर अँड डी इंजिनीअर होतो. माझं काम तंत्रज्ञान विकासाचं होतं आणि तिथे मी एकटाच कर्मचारी होतो. ग्राइंड मास्टर, इस्राो आणि आयआयटी दिल्ली यांचा हा संयुक्त प्रकल्प होता. दिवसभर मी हे काम करायचो. पण मनात रुखरुख होती की आपण काहीतरी वेगळं करायला हवं. हा जॉब करत असताना एकदा मी पुण्याला गेलो होतो. तेथे कचरा वेचक महिलांसोबत बोलताना मला सॅनिटरी पॅडच्या विघटनाच्या, विल्हेवाटीच्या समस्येची जाणीव झाली.
देशभरात वार्षिक बाराशे कोटी सॅनिटरी पॅड निर्माण होतात. मासिक पाळीवेळी वापरलेल्या पॅडपैकी ९८ टक्के कचरा हा डंपिंग ग्राऊंड आणि पाण्याचे प्रवाह आदी ठिकाणी जातो. कारण हा कचरा एक ठिकाणी गोळा होत नाही. एका सॅनिटरी पॅडचे विघटन होण्यासाठी ७०० ते ८०० वर्षे लागतात. जगातला पहिला सॅनिटरी पॅड इ.स. १८०० मध्ये तयार झाला. म्हणजे त्याचेही अजून विघटन झालेले नाही. सॅनिटरी पॅडचे विघटन होत नाही, या समस्येपेक्षाही मोठी समस्या होती ती म्हणजे या पॅड्सचे संकलन आणि त्याची विल्हेवाट लावणे. सॅनिटरी पॅड वापरणाऱ्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही एक समस्या होती. या समस्येवर काम करता येईल असा विचार मनात आला. मी कामास सुरुवात केली आणि माझ्या संकल्पनेवर मला राज्य सरकारचा १५ लाखांचा निधी मिळाला. मग मी माझी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ याच तंत्रज्ञानावर काम करू लागलो. समस्या समजल्यावर पहिल्या टप्प्यावर केवळ आपण वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सची हायजीन राखत विल्हेवाट कशी करू शकतो याबद्दलचाच विचार होता. त्यांच्या रिसायकलचा विचार हा खूप दूरचा टप्पा होता.
त्यासाठी मी वेगवेगळ्या महिलांशी बोललो. पुण्यात जवळजवळ एक हजार महिलांशी बोलून प्राथमिक, द्वितीय टप्प्यावर संशोधन केले. त्यातून हे समजलं की महिलांचे हायजिन, प्रायव्हसी सांभाळून सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावता यायला हवी. सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीची प्रक्रिया अशा पद्धतीने हवी की ते पुन्हा कचऱ्यात जायला नको तर त्याचे व्यवस्थापन व्हायला हवे. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया विकसित होत गेली. आधी एक लहान मॉडेल बनवले, ते अयशस्वी झाले, मग दुसरे मॉडेल विकसित केले. हळूहळू हे मॉडेल विकसित झाले.
आम्ही ‘पॅडकेअर बिन’ महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये बसवतो. हे डबे आम्ही मोफत बसवतो. या बिन्सचे वैशिष्टय असे की त्यात ३० दिवस सॅनिटरी पॅड कोणत्याही दुर्गंधीशिवाय आणि निर्जंतुक राहतात. शाळा, कॉलेज, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये हे पॅडकेअर डबे ठेवतो. तेथून पॅडचे संकलन होते आणि पुणे येथे असलेल्या पुनर्प्रक्रिया केंद्रात ते येतात. देशभरातील २४ शहरांमधून हे पॅड संकलित होतात. १०० हून अधिक लोकांची टीम आहे. २० हजारांहून अधिक पॅडकेअर बिन्स लागले आहेत. पॅडचे सर्वात आधी निर्जंतुकीकरण होते. त्यानंतर अन्य प्रक्रिया होऊन पल्प आणि प्लास्टिक हे आऊटपुट येतं आणि ते विविध उद्याोगांत वापरले जाते. पल्प टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. पॅकेजिंग उद्याोग, प्लास्टिकचे प्लान्ट पॉट्स (कुंड्या) बनवल्या जातात.
पॅड संकलन सेवा आणि पॅडचा पुनर्वापर करून त्यापासून विविध वस्तू बनवून त्याचे उत्पादन करणे या दोन टप्प्यांवर आमचा उद्याोग सुरू आहे. सुरुवातीला खूप समस्या आल्या. महिला बोलण्यास, त्यांचे अनुभव सांगण्यास धजावत नसत. मला काही सरकारी अधिकाऱ्यांनी असाही सल्ला दिला की हे काय करतोयस, यापेक्षा परदेशात शिक्षण घे. पण केंद्र आणि राज्य सरकारकडून याला चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे. साडेतीन ते चार कोटी रुपयांचा निधी सरकारकडून हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मिळाला. या उद्योगाची दखल देश तसेच जागतिक पातळीवरही घेतली गेली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा पुरस्कार मिळाला. भारतातही अनेक पुरस्कार मिळाले. या तंत्रज्ञानाचे पेटंटही घेतले आहेत.
२०१८ मध्ये या स्टार्टअपच्या कामाला सुरुवात झाली, प्रत्यक्षात २०२१ ला ‘पॅडकेअर लॅब्स’ ही कंपनी सुरू झाली. एका टनात सुमारे ५० हजार सॅनिटरी पॅड्स येतात. आतापर्यंत साडेतीनशे मेट्रिक टन सॅनिटरी पॅडची कंपनीने विल्हेवाट झाली आहे. एका स्टार्टअपच्या माध्यमातून समाजासाठी, महिलांसाठी काही करता येत आहे याचे मला खूप समाधान आहे.
(शब्दांकन : मनीषा देवणे)