प्रा. रवींद्र कुलकर्णी
नेहमीप्रमाणे सर्व जण जमले. रमेश सर काही म्हणायच्या आतच सुनील सरांनी अधीरतेने त्यांना विचारले, ‘‘सर आज तुम्ही NEP 2020 आणि उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाविषयी सांगणार होतात.’’
रमेश सर हळूवारपणे हसले व म्हणाले, ‘‘हो हो सुनील सर, सांगतो, त्याबद्दलच सांगतो. उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण घडणे आवश्यक आहे. तसे झाले तर, विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये विकसित होत असलेल्या परस्परसंवादाद्वारे विद्यार्थ्यांना फायदा होईल, त्यामुळे सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळेल; आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी आणि संशोधकांची जी देवाणघेवाण होईल त्याद्वारे एक वेगळा जागतिक नागरिक विकसित करण्यात मदत होईल.
मला असे वाटते की, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांनी वैश्विक ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेसाठी स्वत:ला धोरणात्मक स्थितीत ठेवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून विकसित केले पाहिजे. ठएढ च्या NEP १२.८ नुसार किफायतशीर खर्चात दर्जेदार शिक्षण देणारे, जागतिक अभ्यासाचे विश्वसनीय ठिकाण म्हणून भारताचा प्रचार केला जावा की, ज्यामुळे पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून भारताची भूमिका प्रस्थापित करण्यात मदत होईल. उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी भारतीय संस्था आणि जागतिक संस्थांमधील अध्यापन आणि विद्यार्थी देवाणघेवाण, तसेच संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आणि पार पाडण्याची व्यवहार्यता यासाठी उत्तम जागतिक क्रमवारी असलेली परदेशी विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठे/ शैक्षणिक संस्था यांच्यात सहयोग/ संबंध होणे आवश्यक आहे.’’सुशील सरांनी रमेश सरांना मध्येच थांबवले, ‘‘सर, विविध देशांतील अभ्यासक्रमांचे विविध श्रेयांक असतील. मग त्यांचे पदवी प्रदानासाठी कसे समायोजन करणार?’’
रमेश सर म्हणाले, ‘‘चांगला व महत्त्वाचा प्रश्न विचारलाय सर तुम्ही. परदेशी विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठे/ शैक्षणिक संस्था यांच्यात झालेल्या सहयोगातून अधिग्रहित केलेल्या श्रेयाकांना परवानगी दिली जाईल; जेथे योग्य असेल, प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेच्या आवश्यकतेनुसार आणि UGC ने घालून दिलेल्या निर्देशानुसार, दुहेरी/ संयुक्त/ Twinning पदवी प्रदानासाठी त्यांना विचारात घेतले जाईल. पदवी प्रणालीचा अवलंब हा मजबूत शैक्षणिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तसेच, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या आदान-प्रदानासाठी (mobility) केला जाऊ शकतो. जागतिक स्तरावरील परदेशी विद्यापीठांसोबत सहकार्याच्या या मार्गाचा फायदा असा आहे की ते सहयोगी भारतीय विद्यापीठे/संस्थांच्या क्षमता वाढीस प्रोत्साहन देईल. उच्च-गुणवत्तेच्या परदेशी संस्थांसोबत संशोधन, शैक्षणिक सहयोग आणि प्राध्यापक/विद्यार्थी देवाणघेवाण सुलभ करावी लागेल आणि परदेशी विद्यापीठांशी संबंधित परस्पर-सहयोग आणि कार्यात्मक सामंजस्य करार करून अंमलबजावणी करावी लागेल.’’
महेश सरांनी विचारले, ‘‘सर, यात राज्य विद्यापीठे कोणती भूमिका बजावतील आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना हा खर्च कसा झेपणार?’’ रमेश सर म्हणाले, ‘‘NEP 2020 मध्ये या संदर्भात उल्लेख आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जागतिक शिक्षणापर्यंतचा प्रवेश सुकर करण्यासाठी, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि इतर निधी यासाठी विविध यंत्रणांच्या संस्थात्मकीकरणाद्वारे, आर्थिक सहाय्याच्या अतिरिक्त योजना विकसित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने, महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांनी उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि परदेशी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात प्रवेश वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांच्या योग्य पाठिंब्याने सदर विद्यापीठांनी, विकसनशील देशांतील परदेशी विद्यार्थ्यांना आमच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शिष्यवृत्ती आणि फेलोशिप देऊन त्यांना आकर्षित करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार निवासी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांच्यासाठी प्रभावी राहणीमान आणि दर्जेदार शिक्षणाचे वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेने परदेशातून येणार्या विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन आणि सहाय्य यासंबंधी सर्व बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालयाची स्थापना करणे आवश्यक आहे. हे कार्यालय, संपर्काचे एक खिडकी केंद्र (single window system) म्हणून काम करेल. तसेच ते नियामक/वैधानिक संस्थांशी संपर्क साधेल आणि सर्व सहयोगी क्रियाकलाप पार पाडण्यासाठी जबाबदार असेल.’’
रमेश सर पुढे म्हणाले, ‘‘याशिवाय महाराष्ट्रातील विविध राज्य विद्यापीठांसाठी आता मोठी संधी उभी राहणार आहे. त्यांनी आता महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रितसर परवानग्या घेऊन, परदेशात स्वत:चे कॅम्पस स्थापन करण्याचे वेगवेगळे पर्याय शोधायला हवेत. यातून अभ्यासक्रमांना मिळणारी आंतरराष्ट्रीय परिमाणे, विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रमांमध्ये उपलब्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संधी, आपल्या अध्यापकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्षमता इत्यादी गोष्टी आमच्या संस्थांना उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाकडे प्रवृत्त करतील. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM: Science, Technology, Engineering, Maths), संगणक विज्ञान, गेमिंग यासारख्या भारतातील सामाथ्र्यशाली क्षेत्रांना परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षुता आणि प्रशिक्षुता (internship and apprenticeship) यांच्याशी जोडले जावे. योग/ तत्वज्ञान/ आयुर्वेद/ आरोग्य आणि संस्कृतमधील आमच्या मुख्य क्षमतांबद्दल जागतिक समज निर्माण करण्यासाठी तसेच परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अल्प-मुदतीचे पदवी अभ्यासक्रम तयार केले जाऊ शकतात.’’
महेश सरांनी विचारले, ‘‘सर, यामुळे राज्य विद्यापीठांचा नेमका कोणता फायदा होईल ते सांगाल का?’’
रमेश सरांनी उत्तर दिले, ‘‘महेश सर, यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये राज्य विद्यापीठे सहजपणे पोहोचू शकतील व त्यांचा पल्ला व दर्जा वाढेल. याचबरोबर त्यांच्या आंतरराष्ट्रीयीकरण निर्देशकांनुसार असलेल्या जागतिक क्रमवारीत सुधारणा होईल. भारतातील उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, विद्यापीठ अनुदान आयोगाने NEP-2020 च्या चौकटीत, उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी जुलै २०२१ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनी उच्च शिक्षण संस्थांसाठी एक विस्तृत पथदर्शी आराखडा प्रदान केला आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीयीकरणाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, भारतीय आणि परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक सहकार्यातून ट्विनिंग, संयुक्त आणि दुहेरी पदवी कार्यक्रम ऑफर करण्यासाठी UGC नियम (२०२२) द्वारे किमान मानके ठरवले आहेत. मित्रहो, एक महत्त्वाची बाब मला तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे संयुक्त, दुहेरी किंवा ट्विनिंग पदवीसाठी अर्ज करत असलेली भारतीय उच्च शिक्षण संस्था ही अर्ज करतेवेळी NAAC ने किमान ३.०१ असे गुणांकन दिलेली किंवा टाईम्स हायर एज्युकेशन/ क्यू.एस्. आंतरराष्ट्रीय विद्यापीठे मानांकनाने निर्देशित केलेल्या सर्वोत्तम एक हजार संस्थांपैकी एक असलेली किंवा एन.आय.आर.एफ.ने मानांकित केलेली विद्यापीठ गटातील राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम १०० पैकी एक उच्च शिक्षण संस्था असायला हवी व तिला ज्या आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्थेसमवेत करार करायचा असेल टाईम्स हायर एज्युकेशन/ क्यू.एस. आंतरराष्ट्रीय विद्यापीठे मानांकनाने निर्देशित केलेल्या सर्वोत्तम एक हजार संस्थांपैकी एक उच्च शिक्षण संस्था असायला हवी.’’
रमेश सरांनी काही क्षण विश्रांती घेतली व म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी आपण आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्थासमवेत तयार होत असलेल्या संयुक्त, दुहेरी आणि ट्विनिंग पदवी अभ्यासक्रमांविषयी बोलू या.’’
अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर