‘यूपीएससी झाल्यावर नोकरी करता करता समाजसेवा करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. माझा जन्म सरकारी रुग्णालयात झाला. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत मी शिकलो. आजारपणात सरकारी रुग्णालयात गेलो. सरकारी योजनेमुळंच शाळेची फी देखील मला माफ झाली. माझ्या आयुष्यावर तोपर्यंत सरकारचं आणि समाजाचं बरंच ऋण साचलं होतं. प्रशासकीय सेवेतून हे ऋण देखील मी फेडू शकलो असतो. मी यूपीएससी द्यायचं ठरवलं,’ …असं सांगताहेत अंदमान निकोबारचे अतिरिक्त आयुक्त वसंत प्रसाद दाभोळकर.

मी मूळचा कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्याजवळच्या एका लहानशा गावातला. गावातल्याच ‘जिल्हापरिषदे’च्या मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. मी कधीच ‘पुस्तकी किडा’ नव्हतो. अभ्यासाव्यतिरिक्त मला अनेक अवांतर गोष्टींची आवड होती. ‘दशावतारी’ नाटकांत भाग घ्यायचो. त्यांत मी कधी ‘कृष्ण’ व्हायचो तर कधी ‘राजा’. दशावतारी नाटकांत मी अगदी गाणी म्हटल्याचंही मला आठवतयं. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, समूह नाट्यस्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. बक्षिसं मिळवायचो. परीक्षा जवळ आली की मात्र मी खूप झटून अभ्यासाला लागायचो. नव्वद टक्क्यांच्यावर मार्क मिळवायचो. दहावीला मला ९४ टक्के मार्क पडले. मी ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ होण्याचं ठरवलं. JEE ची परीक्षा दिली. त्यांत चांगला स्कोर आला. कोकणातल्या एका लहानशा खेड्यातला मी मुलगा. वडील ‘एस.टी. महामंडळा’त नोकरीला. आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं कठीण होतं. त्यावेळी सरकारच्या TFWS ( Tuition Fee Waiver Scheme ) विषयी समजलं. या योजनेद्वारे इंजिनिअरिंगची फी ब-यापैकी माफ होते. मला ‘ ळाहर’ मिळाली. रत्नागिरीच्या ‘फिनोलेक्स कॉलेजा’त मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मी प्रवेश घेतला. ‘एक नोकरी मिळवणं आणि समाजाची सेवा करणं’ एवढंच त्यावळचं माझं स्वप्न होतं.

सरकारचं आणिसमाजाचं ऋण

२०१९ मध्ये कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘युट्यूब’वर मला ‘यूपीएससी’ परीक्षेची माहिती मिळाली. अशी देखील परीक्षा असते की जिच्याद्वारे ‘कलेक्टर’ वगैरे निवडले जातात हे मला समजलं. या काळात मला ‘कॅम्पस’मध्ये नोकरी लागली होती. नोकरी करावी की ‘यूपीएससी’ची तयारी करावी, हा प्रश्न होता. यूपीएससी झाल्यावर नोकरी करता करता समाजसेवा करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. माझा जन्म सरकारी रुग्णालयात झाला. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत मी शिकलो. आजारपणात सरकारी रुग्णालयात गेलो. सरकारी योजनेमुळंच शाळेची फी देखील मला माफ झाली. माझ्या आयुष्यावर तोपर्यंत सरकारचं आणि समाजाचं बरंच ऋण साचलं होतं. प्रशासकीय सेवेतून हे ऋण देखील मी फेडू शकलो असतो. मी यूपीएससी द्यायचं ठरवलं.

हेही वाचा >>>UPSC ची तयारी : २०२४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे अव लोकन (भाग २)

विषयांनुसार वेळेची विभागणी

‘यूपीएससी’चा अभ्यास मी सुरू केला. लहानपणापासूनच मला आदिम काळापासून मानवी समाज कसा कसा विकसित होत गेला हे समजून घेण्याची आवड होती. त्या आवडीतूनच मी ‘वैकल्पिक’ विषय म्हणून ‘मानववंशशास्त्रा’ची निवड केली. माझा सुरुवातीचा अभ्यास अगदी दिशाहीन होता. एक पुस्तक वाचायला मला तीन-चार दिवस लागायचे. तीन-चार महिने उलटल्यावर आपला अभ्यास नीट होत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी पुन्हा ‘युट्यूब’ सर्च केलं. ‘युट्यूब’वर बघून मी ‘ Vertical Timetable’ तयार केलं. मग त्या वेळापत्रकानुसार अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासाच्या सर्व दिवसांमध्ये, मी पहाटे पावणे-चारला उठायचो आणि रात्री नऊला झोपायचो. पहाटे चार ते साडे-चार मी सूर्यनमस्कार आणि दंडबैठका घालायचो. पहाटेच्या व्यायामामुळं मेंदूला चांगला रक्तपुरवठा व्हायचा. साडे-चार ते पाच ही वेळ मी अंघोळ आणि ध्यानाला दिली होती. सुरुवातीला पाच मिनिटंच असणारी ‘ध्याना’ची वेळ वाढवत हळूहळू मी पंधरा मिनिटांवर नेली होती. ध्यानामुळं यूपीएससी ‘क्रॅक’ करू शकेन असा माझ्यात आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झाली. पहाटे पाच ते सकाळी आठ, सकाळी साडे आठ ते दुपारी एक, दुपारी दीड ते संध्याकाळी साडेपाच आणि संध्याकाळी सहा ते संध्याकाळी साडेआठ असे, मी विषयानुसार अभ्यासासाठी वेळेचे चार भाग पाडले होते. त्यामुळं एकाच विषयाचा सतत अभ्यास केल्यामुळं येणारा कंटाळा टळायचा. नविन विषयाच्या अभ्यासाला हुरूप यायचा.

आई-वडिलांचं पाठबळ

‘यूपीएससी’च्या अभ्यासा दरम्यान जेवणाकडं देखील माझं नीट लक्ष होतं. माझी आई माझ्या जेवणात कडधान्यांचा, भरड धान्यांचा मुक्त हस्ते वापर करायची. स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थानं जर पौष्टिक आहार घेतला तर त्याचा अभ्यास जास्त चांगला होतो. विद्यार्थ्यांनी जेवणात गोडा-धोडाचे, जड पदार्थ खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. नाहीतर नेमकी अभ्यासाच्या वेळीच सुस्ती येऊ शकते. ‘यूपीएससी’ची तयारी करत असताना, माझ्या आई-वडिलांनी मला पूर्ण सहकार्य केलं. माझ्या सोयीनुसार त्यांनी त्यांच्या दिनचर्येत बदल केले. ‘यूपीएससी’ सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कोणाचा तरी भक्कम मानसिक आधार लागतो. तो त्यांनी मला दिला. घरची परिस्थिती फारशी चांगली नसतानाही- ‘‘तुला किती पुस्तकं लागतील ती घे. पैशांची काळजी करू नकोस ’’ असा दिलासाही दिला. ‘यूपीएससी’साठी प्रयत्न करत असताना मी काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या. मी ‘यूपीएससी’चा अभ्यास सुरू केला त्यावेळी ‘लॉकडाऊन’ लागलं होतं. त्यामुळं मी पूर्णवेळ घरूनच ‘यूपीएससी’चा अभ्यास केला. मात्र मी ‘यूपीएससी’ देतोय हे माझ्या जवळच्या नातेवाईकांनाही सांगितलं नव्हतं. -‘‘ तू यूपीएससी कधी होणार ? ’’ असा माझ्यामागं कोणाचाचं ससेमिरा नसल्यामुळं, मी माझा अभ्यास अधिक एकाग्रतेनं करू शकलो.

खूप पुस्तकं वाचण्याची गरज नाही

‘यूपीएससी’ची तयारी करताना बरेच विद्यार्थी खूप पुस्तकं वाचतात. ‘यूपीएससी’ सारख्या परीक्षेसाठी हे अपेक्षित नाही. ‘यूपीएससी’ सारख्या परीक्षेला ‘खोली’ नाही तर ‘रूंदी’ लागते. ही परीक्षा ‘स्पेशालिस्ट’ नसून ‘जनरलिस्ट’ आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा-परीक्षेला समजून घेऊन पुस्तकं वाचली पाहिजेत. परीक्षेची तयारी करताना उगाचचं भारंभार पुस्तकं वाचण्यात मी वेळ ‘फुकट’ घालवला नाही. त्यामुळं माझ्या अभ्यासाला एक निश्चित ‘दिशा’ मिळाली. बरेचसे विद्यार्थी ‘यूपीएससी’ परीक्षा ‘क्रॅक’ करणं हा ‘जीवन -मरणा’चा प्रश्न बनवून टाकतात. विद्यार्थ्यांनी ‘यूपीएससी’ बाबत उगाचच ‘भावनात्मक’ होणं टाळलं पाहिजे. इतर कुठल्याही ‘परीक्षे’सारखीच ही देखील एक ‘परीक्षा’ आहे, या दृष्टीनंच विद्यार्थ्यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेकडं बघितलं पाहिजे. तिला उगाचंच तुमच्या ‘जीवनापेक्षा मोठं’ करण्याची गरज नाही. परीक्षा एका विशिष्ट वेळेत ‘संपवण्याकडं’ विद्यार्थ्यांचा कल असला पाहिजे. काहीजण पाच-पाच, सहा-सहा वर्षे परीक्षा देतचं रहातात. ‘यूपीएससी’ परीक्षेच्या निकालात दोन-तीन प्रयत्नांनंतर फारशी प्रगती दिसत नसेल, तर विद्यार्थ्यानं दुस-या एखाद्या क्षेत्राचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांन विषयी बोलायचं तर ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्या आर्थिक-सामाजिक दृष्टीनं मागासलेल्या परिस्थितीचा सारखा विचार करताना दिसतात. त्यातच त्यांचा बराच वेळ जातो. परिस्थितीचं ‘रडगाणं’ गात बसण्यापेक्षा परिस्थिती ‘बदलण्या’साठी अभ्यास करणं केव्हाही चांगलं. मी घरीच एकट्यानं अभ्यास केला. एकट्यानं अभ्यास करताना तुमचं लक्ष अभ्यासावर पटकन केंद्रीत होतं. ग्रुपमध्ये अभ्यास करताना अवांतर गप्पांमध्येच वेळ फुकट जाण्याची शक्यता असते. ‘यूपीएससी’ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, ‘मुलाखती’साठी ‘संवाद कौशल्य’ वाढवण्याकरिता तुम्ही एखादया ‘ग्रुप’मध्ये सहभागी झालात तर ठीक आहे. मात्र तोपर्यंतचा अभ्यास शक्यतो आपला आपणंच करावा, असं मला वाटतं.

परीक्षा देण्याचा निर्णय माझ्यासाठी गेम चेंजर

‘यूपीएससी’ काढण्यासाठी मी एकूण तीन प्रयत्न केले. माझा पहिला प्रयत्न २०२० मध्ये म्हणजे ‘कोव्हिड’च्या काळातला होता. पहिल्या वेळी माझी पूर्व परीक्षा चार मार्कांनी राहिली. लगेचच वेळ न घालवता दुस-या प्रयत्नात मी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दुस-या प्रयत्नात मी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘मुलाखती’ पर्यंत पोहोचलो. मुलाखत पार पडली. परंतु अंतिम यादीत माझं नाव नव्हतं. पुन्हा एकदा मी अपयशी झालो होतो. यावेळी मी खूप निराश झालो. तिसऱ्या प्रयत्नाची पूर्व परीक्षा तोंडावर म्हणजे, अगदी पाच-सहा दिवसांवर होती. मी अजूनही माझ्या अपयशाच्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. त्यावेळी माझ्या आई-वडिलांनी मला तिसऱ्या प्रयत्नाची पूर्व परीक्षा देण्यासाठी मानसिक धीर दिला. त्याचा फायदा झाला. मी पूर्व परीक्षा पास झालो. मग परत नेटानं मुख्य परीक्षेचा अभ्यास केला. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो. मुलाखतीत पास झालो. अशा तऱ्हेनं तिसऱ्या प्रयत्नात मी यूपीएससी’ ‘क्रॅक’ केली. संपूर्ण भारतातून ‘यूपीएससी’साठी अंदाजे दहा लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. त्यांतले सहा-सात लाख प्रत्यक्ष परीक्षेला बसतात. ‘यूपीएससी’त माझा ७६ वा क्रमांक आला. दुस-या प्रयत्नाच्या अपयशानंतर, त्या सहा दिवसांमध्ये मी जर पुन्हा परीक्षा दिली नसती तर…? माझा परीक्षा देण्याचा तो निर्णय माझ्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरला.

ज्या तरुण-तरुणींना स्वबळावर स्वत:ची आणि स्वत:बरोबरच समाजाची परिस्थिती बदलण्याची अगदी मनापासून इच्छा असेल अशा सर्व करारी युवक-युवतींसाठी ‘यूपीएससी’ हा करिअरचा योग्य ‘पर्याय’ ठरू शकतो !

● शब्दांकन – दुलारी देशपांडे