Success Story: आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. ज्याने नऊ वेळा अपयश पदरी पडूनही जिंकण्याची जिद्द सोडली नाही. त्या यशस्वी व्यक्तीचे नाव अनिल अग्रवाल, असे असून त्यांनी ‘वेदांता रिसोर्सेस’ची स्थापना केली आणि करोडोंची संपत्ती उभारली.
अनिल अग्रवाल यांचे बालपण
अनिल अग्रवाल यांचा जन्म १९५४ मध्ये बिहारमधील पाटणा येथील मारवाडी कुटुंबात झाला. उच्च शिक्षण घेण्याऐवजी त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांना त्यांच्या छोट्या भंगार धातूच्या व्यवसायात मदत करणे पसंत केले. या निर्णयामुळे त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पण, या प्रवासाता त्यांना एक-दोनदा नाही, तर नऊ वेळा अपयश आले. तरीही हार न मानता ते प्रयत्न करीतच राहिले.
धातू उद्योगाला सुरुवात
१९७० मध्ये त्यांनी स्क्रॅप मेटलसह काम करण्यास सुरुवात केली आणि १९७६ मध्ये ‘शमशेर स्टर्लिंग कॉर्पोरेशन’ विकत घेतले. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर १० वर्षांनी अग्रवाल यांनी ‘स्टरलाइट इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. त्यांनी १९९३ मध्ये देशातील पहिली खासगी तांबे स्मेल्टर आणि रिफायनरी स्थापन करून भारताच्या औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
२००३ मध्ये अनिल अग्रवाल यांनी ‘वेदांत रिसोर्सेस’ची स्थापना केली आणि लंडन स्टॉक एक्स्चेंजवर ते सार्वजनिक केले. १९९२ मध्ये अग्रवाल यांनी ‘वेदांत फाउंडेशन’ची स्थापना केली. बिल गेट्स यांच्या प्रेरणेने त्यांनी आपल्या कुटुंबाच्या संपत्तीपैकी ७५ टक्के रक्कम धर्मादाय कार्यासाठी दान करण्याचे वचन दिले. आज १६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह अग्रवाल यांनी एका लहान भंगार धातूचा व्यापारी ते भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती होण्यापर्यंत केलेला प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.