स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान अशा अनेक विषयांना आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. आजच्या विशेष लेखामध्ये पुराणशास्त्र आणि संस्कृती या विषयामधले तज्ज्ञ देवदत्त पट्टनायक दिल्लीच्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी उलगडणार आहेत.
Delhi history: आज आपण दिल्लीचा विचार करतो, त्यावेळेस भारताची राजधानी आणि राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून या शहराकडे पाहतो. परंतु ही परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. दिल्लीची ओळख महाभारतातील पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थशी जोडली जाते. तरीही शहराच्या नेमक्या स्थानाबद्दल आणि विस्ताराबद्दल सांगणारे पुरातत्त्वीय पुरावे तुलनेने कमीच उपलब्ध आहेत. स्थानिक श्रद्धेनुसार पुराना किल्ल्यातील काल भैरवाचे मंदिर भीमाने बांधल्याचे मानले जाते. येथे दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या पेंटेड ग्रे वेअर मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. या मृदभांड्यांचे अवशेष ऋग्वेदिक कालखंडाच्या अंतिम कालखंडात झालेल्या आर्थिक उलाढालींची माहिती देतात.
शतकानुशतके दिल्लीवर मौर्य आणि गुप्त साम्राज्यांनी राज्य केले. ११ व्या शतकात दिल्लीच्या आरंभिक शासकांपैकी एक तोमर राजवंशाने लाल कोट नावाचे एक तटबंदीयुक्त शहर वसवले. जे पुढे दिल्लीच्या विकासाचा प्रारंभ बिंदू ठरले. नंतर, चौहान राजवंशाने, पृथ्वीराज चौहानाच्या नेतृत्वाखाली या प्रदेशात आपला प्रभाव निर्माण केला. ११९२ मध्ये, हरियाणामधील तारणच्या दुसऱ्या लढाईत मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानाचा पराभव केला.
दिल्ली सल्तनत
पृथ्वीराज चौहानाचा पराभव केल्यानंतर मोहम्मद घोरीने घुरीद वंशाची स्थापना केली आणि बंगालपर्यंतच्या भारतीय स्थानिक राज्यांवर आक्रमण केले. १२०६ साली पूर्वी गुलाम असलेला कुतुबुद्दीन ऐबक नंतर मोहम्मद घोरीचा सेनापती झाला. याच्या नेतृत्वाखाली दिल्ली सल्तनत उदयास आली, त्याने दिल्लीतील मुस्लिम राजवटीची सुरुवात केली. दिल्लीची स्थानिक भाषा हिंदवी कालांतराने दख्खन प्रदेशात वापरली जाऊ लागली. ज्यातून दख्खनी भाषेचा आणि नंतर उर्दूचा उदय झाला. उर्दू ही भाषा दिल्ली सल्तनतीतील सैनिकांद्वारे वापरली जात असे. दिल्ली सल्तनत ही अनेक राजवंशांची मालिका होती, ज्यात मामलुक, खिलजी, तुघलक, सैय्यद आणि शेवटी लोधी राजवंशांचा समावेश आहे. येथेच आपण ‘इंडो-इस्लामिक’ वास्तुकलेचा विकास पाहू लागतो. याच शैलीत कुतुबमिनार आणि सिरी किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती झाली.
कुतुबमिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकच्या कारकिर्दीत सुरू झाले आणि इल्तुतमिशच्या कारकिर्दीत पूर्ण झाले, तर सिरी किल्ला अलाउद्दीन खिलजीने बांधला होता. हा किल्ला मंगोलांच्या आक्रमणात अफगाणिस्तानातून पळून आलेल्या लोकांना आसरा देण्यासाठी होता. तुघलकांनी देखील तुघलकाबाद, जहाँपना आणि फिरोजाबाद यांसारखी अनेक शहरे उभारली.
त्यानंतर आले त्यांनी १५ व्या शतकात लोधी गार्डन्स बांधले, येथे लोधी राजवंशाचे थडगे आहेत; हे ठिकाण आजही सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र आहे. १३९८ साली मध्य आशियातील तैमूरने दिल्लीवर आक्रमण केले, हे आक्रमण ‘दिल्लीची लूट’ म्हणून ओळखले जाते. कारण या आक्रमणात मोठ्या प्रमाणावर विध्वंस आणि जनसंहार झाला होता. यानंतर मुघलांचे आगमन होईपर्यत दिल्लीचे वैभव कमी झाले. मुघलांनी स्वतःला मंगोल आणि तैमूरचे वंशज मानले.
शाहजहानाबाद ते लुटियन्स दिल्ली
१६ व्या शतकात आलेल्या मुघलांनी सुरुवातीला दिल्लीपेक्षा आग्र्यालाअधिक पसंती दिली. ते दिल्लीच्या सुलतानांप्रमाणे नव्हते. परंतु, १६ व्या शतकाच्या मध्यात शेर शहा सुरीने हुमायूनचा पराभव करून मुघल राजवटीत तात्पुरता खंड पडला आणि त्याच्याच कालखंडात पुराना किल्ल्याचे बांधकाम झाले. १६३८ साली शहाजहानने मुघल राजधानी आग्राहून पुन्हा दिल्लीला हलवली. आज हाच भाग जुनी दिल्ली किंवा शाहजहानाबाद म्हणून ओळखला जातो. येथे लाल किल्ला आणि जामा मशीद यांसारख्या ऐतिहासिक वास्तू उभारल्या गेल्या. तैमूरप्रमाणेच १७३९ साली पर्शियन शासक नादिर शहा याने दिल्लीवर आक्रमण केले आणि त्यात शहराची लूट केली. याच वेळी प्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून लुटला गेला. नादिर शहाच्या लुटलेल्या खजिन्याचा तो एक भाग होता. मुघलांप्रमाणेच, ब्रिटिशांनीही सुरुवातीला दिल्लीला राजधानीचे स्थान दिले नाही; त्याऐवजी त्यांनी कोलकात्याला (त्यावेळचे कलकत्ता) राजधानी म्हणून पसंती दिली. मात्र १९११ साली त्यांनी आपली राजधानी दिल्लीला हलवली. त्यांनी नव्या दिल्ली शहराची रचना करण्यास सुरुवात केली. हे शहर शाहजहानाबादसारखे नव्हते त्यात रुंद आणि मोकळे रस्ते होते. त्यात कलोनियल शैलीतील राष्ट्रपती भावनासारख्या प्रशस्त वास्तू होत्या. शिवाय राजपूत आणि इस्लामी शैलीतील वास्तूंचाही समावेश होता. एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी शहराची रचना केली होती. यालाच आज आपण सामान्य भाषेत ‘लुटियन्स दिल्ली’ म्हणतो. ब्रिटिशांनी १९३१ साली ब्रिटीश भारताची राजधानी म्हणून दिल्लीचे उद्घाटन केले.
अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे
फाळणीनंतरचा दिल्लीतील विकास
फाळणीनंतर दिल्लीतील लोकसंख्येत मोठा बदल झाला, कारण पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांसाठी दिल्ली एक महत्त्वाचे ठिकाण होते. या शहराला तेव्हा निर्वासितांसाठी निवासाची सोय करावी लागली, तसेच शाही विचारांच्या जागी लोकशाही आणि प्रजासत्ताकाच्या संकल्पनांना प्रोत्साहन देणारे कलात्मक कार्य निर्माण करणे आवश्यक झाले. जुने गोलाकार संसद भवन योगिनींच्या गोल मंदिरांच्या स्थापत्यशैलीवर आधारित होते. २१ व्या शतकात बांधलेले नवे संसद भवन त्रिकोणी आहे आणि त्याला गज (हत्ती), अश्व (घोडा), शार्दूल (सिंह), मकर (डॉल्फिन), हंस (राजहंस), आणि गरुड (गरुड) सहा प्रवेशद्वारे आहेत. ज्यांची नावे हिंदू मंदिरांशी संबंधित आहेत.
विषयाशी संबंधित प्रश्न?
१. दिल्लीच्या विकासाच्या ऐतिहासिक टप्प्यांमधून विविध शासकांनी शहराच्या ओळखीत केलेला प्रभाव कसा दिसून येतो?
२. १३९८ साली तैमूरने दिल्लीवर केलेले आक्रमण ‘दिल्लीची लूट’ म्हणून कुप्रसिद्ध आहे. या लुटीनंतर शहराने आपले वैभव गमावले यावर सविस्तर टीप लिहा.
३. दिल्ली सल्तनतीच्या कालखंडात स्थानिक हिंदवी भाषा दख्खनी आणि नंतर उर्दूमध्ये कशी विकसित झाली?
४. पृथ्वीराज चौहानाचा पराभव आणि भारतभर मोहम्मद घोरीच्या पुढील आक्रमणांमुळे दिल्ली सल्तनतीच्या स्थापनेसाठी कशी पायाभरणी झाली?
५. मुघल इतिहासातील शहाजहानच्या राजवटीचे महत्त्व स्पष्ट करा.