UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, मिथकशास्त्रात पारंगत असलेले प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक वैदिक काव्य, वैदिक गद्य आणि वैदिक तत्त्वज्ञान स्पष्ट करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या वेळी आपण वेदांबद्दल चर्चा करतो, त्यावेळी आपल्याला वैदिक काव्य (ऋचा), वैदिक गद्य आणि वैदिक तत्त्वज्ञानात फरक करता आला पाहिजे. वैदिक ऋचा हा वेदांमधील सर्वात जुना भाग आहे. हा भाग ३००० वर्ष जुना आहे. वैदिक गद्य हे नंतर आले आणि त्यानंतर वैदिक तत्त्वज्ञानाचा समावेश झाला. वेदांचे ज्ञान ब्राह्मण कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिले आणि साधारण २००० किंवा त्याहीपेक्षा कमी वर्षांपूर्वी ते लिखित स्वरूपात अस्तित्त्वात आले.

वैदिक ऋचा किंवा मंत्र हे समूहाच्या स्वरूपात एकत्र किंवा संहितेच्या स्वरूपात अस्तित्त्वात आले. जवळपास १००० ऋचा / मंत्र हे १० पुस्तकांमध्ये किंवा मंडलांमध्ये विभागले गेले आहेत. नव्वद टक्के मंत्रांमध्ये आकाशात राहणाऱ्या देवाचे स्तवन करण्यात आले आहे. या स्तवनात देवतेला भोजनासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्याबदल्यात यजमान अपत्यप्राप्ती, आरोग्य, युद्धात यश यांसारख्या सांसारिक सुखासाठी मागणी करतो. तर उर्वरित दहा टक्के मंत्र हे विविध प्रकारचे तत्त्वज्ञान आणि जगाविषयी असणाऱ्या अनुमानाविषयी संबंधित आहेत.

वेद आणि विधी

ऋग्वेदिक ऋचा या सामवेदाचा भाग झाल्या. जिथे ऋग्वेदिक शब्दांना सूर प्राप्त झाले. या सुरांचे दोन भाग आहेत. पहिले जे लोकवस्तीत गायले जाते, त्यांना ग्रामगाण असे म्हणतात. तर दुसरा प्रकार हा अरण्यात गायला जात असे, त्यास काव्य किंवा मंत्र यजुस् म्हटले जाते. या मंत्राचा वापर विशिष्ट विधींच्या वेळी केला जातो.

अधिक वाचा:  देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  

“ऋग्वेद हे गीत, सामवेद हे संगीत आणि यजुर्वेद हे निर्देश, या तिघांनाही त्रयी किंवा प्राथमिक वेद असे म्हणता येईल.”

अनेक स्मृतिकार या तिघांचा उल्लेख वेद म्हणून करतात. हे सार्वजनिक विधींचा भाग होते. अथर्ववेद हा देखील काव्याचा एक संच आहे, परंतु यात आढळणाऱ्या मंत्रांचा वापर हा प्रामुख्याने आरोग्य, सौभाग्य आणि दुष्ट आत्मे आणि लोकांच्या मत्सर तसेच रागापासून बचाव करण्यासाठी केला जात असे. अथर्ववेदात काही काल्पनिक मंत्र देखील आहेत, परंतु सामान्यतः अथर्ववेद हे प्राथमिक वैदिक सिद्धांताचा भाग म्हणून पाहिले जात नव्हते, ते सार्वजनिक विधींचा भाग नव्हते.

ब्राह्मण आणि आरण्यक

ऋग्वेदाची निर्मिती ही हरियाणामध्ये झाली. इतर वेद गंडक नदीच्या पूर्वेला गंगा- यमुनेच्या खोऱ्यात रचले गेले. ऋग्वेदात भटक्या खेडूत लोकांचा संदर्भ आहे, तर यजुर्वेदात पूर्वेकडे जाणाऱ्या आणि स्थायिक जीवन जगणाऱ्या लोकांचा उल्लेख आहे. कालांतराने गद्य लिहिले जाऊ लागले. जे ब्राह्मण आणि आरण्यक म्हणून ओळखले जात होते, यांचा संबंध राजाशी संबंधित मोठ्या सामूहिक विधींशी होता. आरण्यक (वनग्रंथ) हे गावाबाहेर केल्या जाणाऱ्या विधींसाठी होते. ब्राह्मण हे कर्मकांडाचे गद्य ग्रंथ आहेत.

हे विधी पंधरवड्याने पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी केले जायचे किंवा ते दर चार महिन्यांनी मान्सूनपूर्व कालावधी, पावसाळा आणि मान्सूननंतरचा कालावधी संपला म्हणून केले गेले. ते राजाचा राज्याभिषेक आणि राजाची शक्ती वाढवण्यासाठी वार्षिक विधींशीदेखील संबंधित होते. यांचा संग्रह शुल्ब सूत्रांच्या रुपात एकत्र करण्यात आला. परंतु, इसवी सनपूर्व पाचव्या शतकात पूर्वेकडे बौद्ध धर्माच्या उदयानंतर त्यांनी आपले महत्त्व गमावले. त्यानंतर घरगुती स्वरूपातील वैदिक विधी महत्त्वाचे ठरले. हे विधी आपल्याला गृह्यसूत्रांमध्ये आढळतात. याच सुमारास आणखी एक गद्याचा संच उदयास आला, हा संच शास्त्र साहित्य म्हणून ओळखला गेला. धर्मशास्त्र हे त्याचंच उदाहरण आहे.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे

परंतु आज ज्यावेळेस वेदांबद्दल चर्चा केली जाते, त्यावेळेस वैदिक तत्त्वज्ञान किंवा वेदांताचा संदर्भ दिला जातो. मूलतः वैदिक तत्त्वज्ञान किंवा वेदांगे ही इसवी सन पाचव्या शतकानंतर लोकप्रिय झाली. याचे श्रेय आदी शंकराचार्य आणि त्यांच्या अनुयायांकडे जाते. वैदिक तत्त्वज्ञानात कर्मकांडे कमी करण्यात आली. आत्मा आणि मानवी शरीर त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालच्या जगाशी त्याचा संबंध यासारख्या तात्विक कल्पनांना अधिक महत्त्व देण्यात आले. यात मोक्ष किंवा मुक्तीसारख्या संकल्पना आहेत.

विधी किंवा मीमांसा या कालांतराने मंदिराच्या पद्धतींमध्ये विलीन झाल्या. आजही, जेव्हा लोक वेद या शब्दाचा संदर्भ घेतात, तेव्हा ते खरोखरच वैदिक तत्त्वज्ञानाचा संदर्भ घेतात आणि वैदिक काव्य, वैदिक जप आणि वैदिक कर्मकांडे यांचा फार कमी उल्लेख करतात.

प्रश्न

वेदांचे सार या विषयावर चर्चा करा?
वैदिक काळातील ठळक वैशिष्ट्ये कोणती?
हिंदू धर्मातील वैदिक कर्मकांडाचे महत्त्व यावर भाष्य करा.
वेद आणि वैदिक तत्वज्ञान यात काय फरक आहे?

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art and culture with devdutt pattanaik the significance of vedas and their rituals svs