सगळीकडे एआयचा बोलबाला असल्यामुळे जवळपास प्रत्येक महाविद्यालयामध्ये एआयमध्ये बीई, बीटेक, बीएससी, एमसीए, एमएससी अशा पदवी निघालेल्या आहेत. यामुळे आधीच गांगरून गेलेला पालकवर्ग अजूनच संभ्रमात पडतो. विद्यार्थी जे कानांवर पडतं त्यावरून आणि नेहमीप्रमाणे आपल्या मित्रमैत्रिणींच्या निर्णयामुळे प्रभावित होऊन पालकांकडे एआयचीच पदवी घेण्यासंबंधीचा हट्ट धरतात. अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये संगणकशास्त्रासाठीच्या जागांची मागणी प्रचंड वेगानं वाढत गेल्यावर पुरेशा जागा उपलब्ध नसल्याच्या अडचणीवर शिक्षण उद्योगानं एक भन्नाट युक्ती योजली. तोपर्यंत संगणकशास्त्राच्या पदवीसाठी फक्त ‘कम्प्युटर सायन्स (सीएस)’ नावाची एक शाखा उपलब्ध असायची, त्यासोबतच आता ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)’ अशी नवी शाखा यातून जन्माला आली. अनेक वर्षं विद्यार्थी आणि पालक या दोघांचाही या दोन शाखांमधल्या फरकांबद्दल विलक्षण गोंधळ असायचा. खुद्द महाविद्यालयांमधल्या व्यवस्थापन तसंच शिक्षक या दोन्ही वर्गांना या बाबतीमधलं सुस्पष्ट असा खुलासा देता येत नसे. याचं कारण म्हणजे हे निव्वळ आर्थिक निकषांवर केलेलं असल्याची निखळ कबुली देण्याची जोखीम कुणालाच पत्करायची नसायची. त्यामुळे ‘सीएस’मध्ये जास्त संकल्पनात्मक विषय असतात, तर ‘आयटी’मध्ये जास्त प्रात्यक्षिकांचे विषय असतात असं काहीसं गुळमुळीत बोलून प्रश्न निकालात काढला जात असे.

आता संगणकशास्त्र हीच मुळात एक मूळ शाखा बनलेली असून तिच्या उपशाखा जन्माला येताना दिसतात. उदाहरणार्थ माहितीच्या सुरक्षिततेसाठी ‘सायबर सिक्युरिटी’, सॉफ्टवेअरनिर्मितीसाठी ‘सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’, क्लाऊड तंत्रज्ञानासाठी ‘क्लाऊड कम्प्युटिंग’ असं करत करत एआयसाठी स्वतंत्र उपशाखा निर्माण होणं अगदी स्वाभाविकच आहे. याची साधारण दोन मुख्य प्रारुपं दिसतात: एक तर नेहमीसारखीच संगणकशास्त्राची पदवी घ्यायची; पण एआयमध्ये विशेष प्रावीण्य (‘स्पेशलायझेशन’) मिळवायचं, किंवा मूळ पदवीच ‘एआय अभियंता’ अशी घ्यायची. सगळीकडे एआयचा बोलबाला असल्यामुळे जवळपास प्रत्येक महाविद्यालयामध्ये एआयमध्ये बीई, बीटेक, बीएससी, एमसीए, एमएससी अशा पदवी निघालेल्या आहेत. यामुळे आधीच गांगरून गेलेला पालकवर्ग अजूनच संभ्रमात पडतो. विद्यार्थी जे कानांवर पडतं त्यावरून आणि नेहमीप्रमाणे आपल्या मित्रमैत्रिणींच्या निर्णयामुळे प्रभावित होऊन पालकांकडे एआयचीच पदवी घेण्यासंबंधीचा हटट् धरतात. अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे?

अर्थातच वर उल्लेख केलेल्या प्रश्नाचं अगदी सर्वसमावेशक आणि सगळ्यांना लागू पडेल असं उत्तर देणं अशक्य असलं तरी किमान काही मूलभूत गोष्टींचा उल्लेख तरी केलाच पाहिजे. मुळात एआय ही संगणकशास्त्राची उपशाखा आहे, हे अजिबात विसरू नये. म्हणजेच कुणीही कधीच थेट ‘एआय’ असं काही शिकूच शकत नाही, हे लक्षात घ्यावं. साहजिकच पदवी एआयची असली तरी या अभ्यासक्रमाची पहिली काही सत्रं संगणकशास्त्रामधले मूळ विषय शिकवण्यातच घालवली जातात. ते अत्यंत गरजेचंही आहे. अन्यथा ‘पुढचं पाठ आणि मागचं सपाट’ ही म्हण शब्दश: खरी होईल. नंतरच्या काही सत्रांमध्ये हळूहळू एआयचे विषय यायला लागतात आणि अगदी शेवटच्या सत्रांमध्ये कदाचित सगळे विषय एआयशी संबंधित असू शकतात. म्हणजेच एआयमधली पदवी ही संगणकशास्त्रामधल्या पदवीचं ‘रिब्रँडिंग’ करून तयार केलेली पदवी आहे, हे आपल्या लक्षात येईल. आर्थिक तसंच कालसुसंगततेच्या गरजांमुळे विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना हे करणं भाग असलं तरी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र या पदव्यांच्या गोंडस नावांमागे धावण्यापूर्वी याचा नीट विचार केला पाहिजे. संगणकशास्त्रामधली मूळ पदवी घेऊन एआयचे विषय स्वतंत्रपणे शिकणं म्हणूनच अनेकदा जास्त योग्य ठरू शकतं.

याखेरीज छापील अभ्यासक्रमामध्ये असंख्य अत्याधुनिक गोष्टी ठासून भरलेल्या असतील तरी प्रत्यक्षात यामधले किती विषय किती सखोल शिकवले जातात, हा तर संशोधनाचाच विषय आहे. काही मोजके अपवाद वगळता या विषयांचा गंधसुद्धा अभ्यासक्रम ठरवत असलेल्या लोकांपासून ते शिकवू पाहत असलेल्यांपर्यंत बव्हंशी लोकांना नसतो. साहजिकच पाठ्यपुस्तकी संकल्पना जशाच्या तशा विद्यार्थ्यांच्या गळी उतरवणं आणि त्यामधल्याही विद्यार्थ्यांपर्यंत निम्म्याच पोहोचणं अशी दारुण परिस्थिती ठिकठिकाणी बघायला मिळते.

एआयच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एआय म्हणजे काय हेसुद्धा धड सांगता येत नाही, असं चित्र अपवादानं नव्हे तर हटकून बघायला मिळतं. साहजिकच आता पदवी मिळवणं आणि शिकणं या दोन भिन्न गोष्टी असल्याचं जवळपास सगळ्यांनीच स्वीकारलेलं असल्याचं चित्र अगदी खुलेपणानं बघायला मिळतं. निदान संगणकशास्त्रामधले अनेक विषय तसे जुने असल्यामुळे ते शिकवत असलेल्यांना याची थोडीफार तरी जाण असते; पण अत्याधुनिक आणि तेही बदलत राहणारे विषय शिकवणंही त्यांच्या दृष्टीनं जवळपास अशक्यप्रायच असतं. हे सगळं पालकांनी काही अंशी तरी समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे.

अशी काहीशी उदासवाणी परिस्थिती असेल तर मग एआय नेमकं शिकायचं तरी कसं आणि कुठून? त्याविषयी पुढच्या वेळी.

akahate@gmail.com