सुबोध कुलकर्णी या लेखक होऊ पाहणाऱ्या मुलाचा प्रवास अखेर कंटेन्ट रायटरपर्यंत जाऊन सुफळ संपूर्ण झाला खरा… पण हा प्रवास म्हणावा तितका सोपा नक्कीच नव्हता. त्याविषयी सांगत आहे त्याची आई.
माझा सुबोध हा एकुलता एक मुलगा. नवऱ्याच्या बदल्यांमुळे त्याच्या शिक्षणाची हेळसांड झाली असे माझे मत. ते माझ्या नवऱ्याला अजिबात मान्य नव्हते. बदलत्या गावी नवीन शाळेत सुबोधने जुळवून घेतलेच पाहिजे आणि चांगला अभ्यास करून सर्वोच्च स्पर्धा परीक्षेत यश मिळवून केंद्रीय सरकारच्या सेवेत जावे हे त्याचे स्वप्न. मुलाला मुंबईत फोटमधल्या कॉलेजमध्ये घातले म्हणजे तो यूपीएससी नक्की क्लियर करणार आणि बडा साहेब बनणार हे त्याच्या डोक्यात पक्के बसलेले.
शाळेमध्ये बऱ्यापैकी मार्क मिळवणारा सुबोध माझ्याबरोबर मराठी पुस्तकांच्या वाचनात मनापासून रमत असे. ज्या शाळेत तो शिकला तिथे मराठी विषय नसला तरी उत्तम मराठी कसे असते, मराठीतील चांगली पुस्तके, गाजलेले लेखक याची चौकसपणे वाचत असल्याने त्याला जाण होती. दरवर्षी आजोळी महिनाभर मुक्काम असल्यामुळे त्याला नागपूरचे मराठी वाक्प्रचार म्हणींसकट माहिती होते. मराठीत लिहिण्याचा वेग मात्र खूपच कमी असला तरी तो लिहायचा प्रयत्न करत असे. मला त्याचे कौतुक एका बाबतीत वाटत आले ते म्हणजे दोन्हीकडच्या आजी-आजोबांना तो दर महिन्याला मराठीतून पत्र लिही.
माझे वडील मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी मला शिकत असल्यापासून एक सवय लावून दिली होती. प्रत्येक सणासुदीला एक नवीन पुस्तक विकत आणायचे, वाचायचे आणि त्यावर त्यांच्याशी गप्पा मारायच्या. मुंबईच्या कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच वर्षी सुबोधला एक हजार रुपयांचे बक्षीस निबंध लेखनासाठी मिळाले. त्याचा मला मनापासून आनंद झाला. मात्र ज्यावेळी तो निबंध माझ्या वाचनात आला, तो वाचून झाल्यावर मात्र माझा हिरमोड झाला होता. मुंबईसारख्या ठिकाणी नामवंत महाविद्यालयाच्या साहित्य मंडळांने अशा सामान्य निबंधाला एक हजार रुपये द्यावेत हे माझ्या वडिलांच्या पचनी पडणे शक्य नव्हते त्यामुळे सुबोधचा हट्ट असला तरी मी तो निबंध वडिलांना दाखवला नाही. मिळालेले बक्षीस मात्र सुबोधच्या डोक्यात नको त्या पद्धतीत शिरले असल्यामुळे पदवीचा अभ्यास का मराठीतील लेखन या द्वंद्वामध्ये त्याचा अभ्यास मागे पडत गेला. आमच्यापासून तो दूर मुंबईत असल्यामुळे वर्षातून दोनदा सुबोधची गाठ पडत असे.
एकदा समोर भेटला असताना त्याने मराठी साहित्य विश्वातील सर्वांना भरपूर लाखोली वाहिली होती. ती ऐकून मी जरा चकित झाले होते. कारण विचारता ते ऐकून माझ्या मनात भीतीची छोटी लाट आली होती. मी एवढे चांगले चांगले लेख, कथा लिहितो त्या कोणाला पसंतच पडत नाहीत. मी केलेल्या कविता कोणाला कळत नाहीत. कोणीच त्या छापायला तयार नाही यावरून झालेला संताप त्याने लाखोलीतून व्यक्त केला होता. शेवटी व्हायचं तेच झालं. बीए इंग्लिश हायर सेकंड क्लास घेऊन सुबोध पास झाला. अशा कमी मार्काच्या मुलांनी यूपीएससी देणं योग्य नाही असं त्याला स्पर्धा परीक्षांच्या क्लासमधूनही सांगितले गेले. मुळात त्याची या रस्त्याला जाण्याची अजिबात इच्छाही नव्हती. वडिलांची नाराजी असली तरी सुबोधला मनातून आनंद झालेला होता. पण पुढे काय करणार याबद्दल त्याच्या समोर अंधारच पसरलेला मला समजत होता. फक्त लेखक म्हणून सहसा कोणीही पोट भरू शकत नाही याची जाणीव माझ्या वडिलांना व मला पूर्णपणे होती. पण हे बोलणे म्हणजे बदलत्या काळात मुलांना चिडवणे किंवा त्यांचा पाय मागे खेचणे अशी माझ्या समकालीनांमध्ये चर्चा होत असे. त्यामुळे मी काही न बोलता तो काय करतो ते फक्त पहात होते.
पदवी इंग्रजीतली तर लेखक बनायची इच्छा मराठीतली हा एक आणखीनच मोठा तिढा मला दिसत होता. मात्र याच वेळेला नागपूरची बोली, शाळेतले हिंदी पदवीच्या इंग्लिशच्या जोडीला मदतीला आले. इंग्रजी व हिंदी भाषिक मंडळींनी हिंग्लिश नावाचा प्रकार रूढ करून दहा वर्षे झाली होती आणि मराठी मंडळी मिंग्लिशचा वापर करायला सुरुवात होत होती. विविध पद्धतीची फ्रीलान्स कामे व नोकरीच्या शोधात सुबोधचे एक वर्ष निराशेत गेले. आणि अचानक कॉस्मापॉलिटन कॉलेजच्या प्रवेशाचा फायदा त्याच्यासमोर चालत आला. एक पंजाबी, दुसरा दिल्लीवाला तर तिसरा बंगाली अशा त्रिकूटाने मराठी कंटेन्टसाठी सुबोधला संधी दिली. सोशल मीडिया हा शब्द जरी नसला तरी कंटेन्ट क्रिएशन मात्र सुरू झालेले होते. त्यामध्ये सुबोधला त्या तिघांमुळे शिरकाव करून घेता आला. पाहता पाहता सुबोधची प्रगतीची घोडदौड सुरू झाली. त्या अर्थाने मुंबईने त्याला सामावून घेतले. मात्र मुलाचे वार्षिक उत्पन्न किती याचे नेमके उत्तर मला कधीच देता न आल्यामुळे मुलाकरता सांगून आलेल्या कोणत्याही मुलीने पुन्हा तोंड दाखवले नाही. आम्ही दोघे आता निवृत्तीनंतर नागपूरला असतो तर सुबोध वरळीला कामात गढलेला असतो. शॉर्ट फिल्म, जाहिरातीसाठी बनवलेले व्हिडिओ अशा विविध कामात तो व्यग्र असतो. अलीकडे त्याने लिहिलेल्या फिल्मस् माझा नवरा आवडीने पाहतो व मित्रांनाही पाठवतो. हेही नसे थोडके. (क्रमश:)