या लेखामध्ये भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

संकल्पनात्मक/ प्राकृतिक भूगोल

सगळयात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये समजून घ्यावीत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे तसेच वादळे, विशिष्ट भूरूपे, वाऱ्यांचे प्रकार यांचेसाठी असलेली वेगवेगळी नावे यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील.

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत-

हेही वाचा >>> चौकट मोडताना : खर्चिक तरीही आनंद देणारे शिक्षण

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; विशेषत: एखाद्या जागतिक घटना/ प्रक्रियेचा भारतातील वातावरण, मान्सून यांवर होणारा परिणाम (उदा. अल निनो, जेट प्रवाह); पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया

भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दयांच्या वा टेबलच्या स्वरुपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाच्या अपक्षयामुळे आणि संचयामुळे होणारी भूरुपे अशी विभागणी करता येईल. प्रत्येक भूरुपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.

नैसर्गिक आपत्ती, चक्रिवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ. बाबत प्रामुख्याने प्रश्न विचाले जातात. हा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा.

हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा टेबलमध्ये तुलनात्मक अभ्यास करावा.

पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादी मधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.

हेही वाचा >>> नोकरीची संधी: ‘यूपीएससी’मार्फतसिलेक्शन पद्धतीने भरती

भारतातील महत्त्वाचे हवामान विभाग, मृदा आणि वनांचे प्रकार यांचा नकाशा समोर ठेवून आढ़ावा घ्यावा.

महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामानाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदन या बाबी समजून घ्याव्यात.

जागतिक भूगोलाचा फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ. चा टेबल फॉरमॅटमध्ये factual अभ्यास पुरेसा आहे.

आर्थिक भूगोल

हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. भारताच्या आर्थिक भूगोलावर प्रश्नांची संख्या कमी असली तरी आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाची पिके, खनिजे, उद्याोग यांची देशातील सर्वाधिक उत्पादन, उत्पन्न व निर्यातीमधील वाटा असणारी राज्ये यांची माहिती अद्यायावत करुन घ्यायला हवी.

यामध्ये खनिजे व ऊर्जा स्त्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्याोग, महत्त्वाची धरणे/ प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन स्थळे यांबाबत टेबल फॉरमॅटमध्ये पुढील मुद्दे समाविष्ट करावेत: स्थान, वैशिष्ट्ये, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्ट्ये व महत्त्व आणि आर्थिक महत्व समजून घ्यावे.

महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.

भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने या भागाचा पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यास करावा – खडकांचा प्रकार, निर्मिती, रचना, भौगोलिक, भौतिक व रासायनिक वैशिष्टये, निर्मितीसाठी आवश्यक भौगोलिक/ भूशास्त्रीय घटक, कोठे आढळतो, भौगोलिक व आर्थिक महत्त्व.

धार्मिक, वैद्याकीय, सांस्कृतिक पर्यटन, eco- tourism, राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यास्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी.

सामाजिक भूगोल:

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्ट्ये, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे यांच्या टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्यू दर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यू दर, बाल मृत्यूदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्द्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम.

स्थलांतराचा कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टींने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्यायावत करुन घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com