सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक (श्रेणी १)/ मुद्रांक निरीक्षक या पदांसाठीची गट ब सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा सप्टेंबर मध्ये प्रस्तावित आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, आणि दुय्यम निबंधक (श्रेणी १)/ मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी केवळ फक्त लेखी परीक्षेचा एकच टप्पा असेल तर पोलीस निरीक्षाकपदासाठी मुलाखत आणि शारीरिक चाचणीचे अजून दोन टप्पे असतील.
मुख्य परीक्षा पेपर एकमध्ये मराठी आणि इंग्रजी हे भाषा विषय तर पेपर दोनमध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी हे घटक समाविष्ट आहेत. दोन्ही पेपर हे प्रत्येकी १०० प्रश्नसंख्येचे २०० गुणांचे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचे आहेत. यातील पेपर एक भाषा विषयाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
या घटकाच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी वाक्प्रचार आणि आकलन असे ढोबळमानाने तीन भाग दिसून येतात. अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे. नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.
हेही वाचा >>> चौकट मोडताना : शोध पत्रकारितेत अजूनही स्त्रियांचा दबदबा कमीच
व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. भाषा विषयामध्ये स्कोअर करण्यासाठी शब्दप्रभुत्व कमी असल्यामुळे येणाऱ्या मर्यादा येथे कमी प्रमाणात जाणवतील. आणि त्यामुळे चांगला स्कोअर करता येईल. अर्थात पदवी परीक्षेची काठीण्य पातळी आहे म्हटल्यावर व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागणार नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येईल. एकूणच वस्तुनिष्ठ भाषा म्हटले तरी भाषेतील वेगवेगळ्या अर्थछटा माहीत करून घेतल्या तर हा घटक कमी वेळेमध्ये यशस्वीपणे सोडविता येईल.
व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे टेबल, सामासिक शब्दांची उकल महत्त्वाचे तत्सम तद्भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. यामुळे अनोळखी शब्द विचारला गेल्यास कॉमन सेन्स वापरत प्रश्न सोडविता येईल. इंग्रजीमधील काल व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल, तसेच प्रथम द्वितीय व तृतीय पुरुषांसाठीचा टेबल आणि महत्त्वाच्या क्रियापदांची past participle, past perfect participle यांचे टेबल पाठच असायला हवेत. शब्द रचनेचे मराठीतील नियमही माहीत असणे आवश्यक आहे. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रुपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात.
कोणत्याही भाषेला समृद्ध करणारा म्हणी व वाक्प्रचार हा खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन सेन्स यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे नजरेखालून जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा इतर प्रसंगांशी संबंध जोडता येणे कॉमन सेन्समुळे शक्य होते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा प्रिंट आऊट सोबत बाळगायला हवे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार Randomly वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील संधी
समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा, मराठीतील शब्दांच्या हस्व दीर्घ वेलांटी/ उकारांमधील बदलामुळे तसेच काना/ मात्रा/ वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा, पाणि (हात) पाणी (जल),
इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे/ स्पेलिंगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द Tricky ठरतात. उदा. Expect आणि except या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
उताऱ्यावरील प्रश्न सोडवताना परीक्षा हॉलमध्ये आपल्याला उताऱ्याचा अभ्यास करायचा नाही तर प्रश्नांची उत्तरे देऊन गुण मिळवायचे आहेत हे लक्षात ठेवावे. आपल्याला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित सापडत असेल तर उतारा संपूर्णपणे कळला नसेल तरी हरकत नसते. अर्थात कोणताही उतारा प्रश्न वाचून त्यांची उत्तरे शोधली आणि काम झाले असा सहज सोपा नसतो. तो ढोबळमानाने तरी समजलाच पाहिजे. एखादा उतारा नाही समजला आणि त्यावर तथ्यात्मक माहिती विचारली असेल तर तो बोनस घ्यायलाच हवा.
आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com