राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल घटकातील प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये पर्यावरणीय भूगोल व अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन या उपघटकांच्या तयारीबाबत पाहू.
पर्यावरण भूगोल
पर्यावरण भूगोल आणि कृषी घटकातील पेपर चारमधील पर्यावरणीय घटक यांचा एकत्रित अभ्यास केल्यास जास्त उपयोगी ठरतो. विश्लेषणात्मक व उपयोजित प्रश्न सोडविण्यासाठी या घटकातील संकल्पना समजून घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे.
परिसंस्था घटक अभ्यासताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक कोणते व त्यांचे एकमेकांवरील अवलंबित्व व परिसंस्थेतील भूमिका समजून घ्यायला हवी.
ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, अन्न साखळी, अन्न जाळे हे घटक एकत्रितपणे अभ्यासायचे आहेत. परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रवाह, अन्न साखळी/जाळ्यातील विविध घटकांमध्ये होणारे ऊर्जेचे हस्तांतरण आणि त्यातून तयार होणारा ऊर्जेचा पिरॅमिड अशा प्रकारे परस्पर संबंढ लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा.
पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
हेही वाचा >>> आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; महिन्याला पगार एक लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या कसा करायचा अर्ज
जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.
जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना
जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्या म्हणून मानव व वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील ऊष्मावृद्धी केंद्रे (Heat Islands) या अभ्यासक्रमातील घटकांचा विशेष अभ्यास आवश्यक आहे. यांचा अभ्यासही कारणे, स्वरूप, समस्या आवश्यक उपाय योजना या मुद्द्यांच्या आधारे करावा.
पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे अभ्यासताना महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA) व कार्बन क्रेडिटस या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.
हेही वाचा >>> प्रवेशाची पायरी: पदवीनंतर आयआयएममधून एमबीए करण्यासाठी सीईटी
भूगोल व आकाशअवकाशीय/अंतराळ तंत्रज्ञान
आकाश व अवकाश संज्ञा, GIS, GPS आणि दूरसंवेदन यंत्रणा यांमधील तांत्रिक व संकल्पनात्मक मुद्दे समजून घ्यायला हवेत.
संरक्षण, बॅंकिंग व वाहतूक नियोजन, आरोग्य व शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये व अवकाश तंत्रज्ञान आणि टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.
अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या व यापुढे होणाऱ्या अवकाश तंत्रज्ञानाधारीत प्रकल्प व मोहिमांचा तसेच विकसित अवकाशीय उपग्रह संपत्तीचा आढावा उद्देश, कालावधी, उपयोजन, उल्लेखनीय वैशिष्ट्ये, विकास करणारी यंत्रणा, खर्च, यशापयश अशा मुद्द्यांच्या आधारे घ्यावा.
ISRO, DRDO यांची संशोधन व विकासातील भूमिका समजून घेण्यासाठी त्यांचे स्थापनेपासूनचे ठळक कार्य, आव्हाने, यशापयश समजून घ्यावे.
अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा अभ्यासताना स्वरूप, कारणे, परिणाम व प्रतिबंधात्मक उपाय असे मुद्दे पहावेत. यामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूमिका समजून घ्यावी व याबाबतच्या चालू घडामोडींची माहिती असायला हवी.
रीमोट सेन्सिंग
रीमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे/संकल्पना, डेटा व माहिती, रीमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रीमोट सेन्सिंग फायदे व मर्यादा हे मुद्दे ढोबळ वाटत असले तरी त्यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
रीमोट सेन्सिंग व एरियल फोटोग्राफीमधील प्रक्रिया आणि त्यामध्ये समाविष्ट तांत्रिक मुद्दे व संकल्पना यांचा अभ्यास करताना संकल्पनेचे मूलभूत तत्व/तंत्रज्ञान, त्यांमधील घटक, त्यांचे प्रकार व त्यांमधील तुलना, त्यांचा अपेक्षित प्रभाव/परिणाम अणि त्यांचे उपयोजन/अनुप्रयोग/वापर असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग हा मुद्दा अभ्यासताना त्यामधील समाविष्ट सर्व तांत्रिक घटकांमागील मूलभूत तंत्रज्ञान, संबंधित घटकाचे असल्यास प्रकार, त्यामधील संज्ञा व संकल्पना, त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील वापर असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे कार्य अभ्यासताना त्या त्या क्षेत्रातील गरजा समजून घेऊन मग त्यांच्यासाठी जीआयएसच्या वापर कशा प्रकारे करण्यात येतो हे समजून घ्यावे.