गट ब सेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्याोगधंदे इत्यादी’

गट ब सेवा आणि अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२३ अशा मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसलेल्या पुढील मुद्द्यांवर प्रश्न विचारलेले दिसून येतात:

‘आर्थिक भूगोलातील नैसर्गिक साधनसंपत्ती – खनिजे, ऊर्जा स्त्रोत, पायाभूत सुविधा, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि राजकीय भूगोल’

त्यामुळे तयारी करताना मूळ अभ्यासक्रमाबरोबरच हे मुद्देही अभ्यासामध्ये समाविष्ट करावे लागतील. मुद्देनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.

पृथ्वी, अक्षांश-रेखांश, जगातील विभाग यांचा अभ्यास एकत्रितपणे करायला हवा. पृथ्वीची रचना, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, अक्षांश, रेखांश, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती (संपात दिन, आयन दिन), वातावरण, हवामानाचे घटक, मान्सूनची निर्मिती, मान्सूनवर परिणाम करणारे घटक, वा-यांची निर्मिती, भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

या संकल्पना समजून घेतानाच जगातील त्या त्या उदाहरणांचा आढावा टेबलमध्ये घ्यायला हवा.

या घटकांचा दिलेल्या क्रमाने समजून घेत अभ्यास करणे फायद्याचे ठरेल. या संकल्पना समजल्या की त्यावरील विश्लेषणात्मक, बहुविधानी प्रश्न तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न सोडविणे सोपे होते.

ज्वालामुखी, सागरी प्रवाह, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारे निर्मित भूरुपे यांचा आढावा घेऊन त्यांची देश व राज्यातील उदाहरणे लक्षात ठेवावीत.

जगातील हवामान विभाग, त्यांबाबतचे सिद्धांत यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा.

देशातील नदीप्रणाली, पर्वतप्रणाली यांचा उत्तर- दक्षिण व पूर्व- पश्चिम क्रम लक्षात ठेवावा. विशेषत: महाराष्ट्रातील नदी खोरी व पर्वतरांगा यांचा एकत्रित अभ्यास करावा.

महत्त्वाच्या नदी खोऱ्यांचा अभ्यास महत्त्वाच्या उपनद्या, त्यांचा लांबी व मुख्य नदीस येऊन मिळण्याच्या दृष्टीने क्रम, महत्त्वाचे सिंचन / जलविद्याुत प्रकल्प या मुद्द्यांच्या आधारे आढावा घ्यावा.

महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांचा क्रम, घाटांचा क्रम लक्षात ठेवावा. पशिमवाहिनी नद्यांच्या महत्त्वाच्या खाड्यांची नावे माहित असायला हवीत.

भारतातील व महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान म्हणजेच भारतीय मान्सून आणि भारताचा प्राकृतिक भूगोल यांचा अभ्यास एकत्रित करायला हवा. यातील भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, हवामान प्रदेश, वनांचे प्रकार, खडकांचे व मृदेचे प्रकार यांचा आढावा नकाशाच्या आधारे घ्यायला हवा.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

मृदा, हवामान, वने, बंदरे, स्थानिक वारे, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे या घटकांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा. त्यामुळे फोटोग्राफीक मेमरीचा वापर होऊन तो व्यवस्थित लक्षात राहतो. या बाबींच्या ठळक उदाहरणांच्या टेबलमध्ये नोट्स काढणे शक्य आणि तयारीच्या दृष्टीने व्यवहार्य आहे.

महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल. या विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास केल्यास हवामान, पर्जन्यमान, पिके आणि जमिनीचे प्रकार यांचा एकत्रित अभ्यास होईल आणि समजून घेणे व पर्यायाने लक्षात राहणे सोपे होईल. प्रत्येक हवामान विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामानाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात.

पशुधन, कृषीचे प्रकार, मासेमारी, वने, प्रमुख पिके – नगदी व अन्नधान्य – त्यांचे वितरण, कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या याचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरीही त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचा पिक हवामान प्रदेशानुसार आढावा घेणे आवश्यक आहे.

पायाभूत सुविधांचा आढावा घेताना महत्त्वाचे महामार्ग, विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, लोहमार्ग, जलविद्याुत तसेच मोठे सिंचन प्रकल्प यांचा आढावा घ्यायला हवा. यामध्ये भारतातील ठळक महत्वाची व महाराष्ट्रातील स्थाने माहित असायला हवीत.

आर्थिक भूगोलामध्ये महत्त्वाची खनिजे व त्यांचे स्त्रोत खडक आणि मुख्य उत्पादक जिल्हे / राज्ये, महत्त्वाची पर्यटन स्थळे, धबधबे, धार्मिक स्थळे, जिल्ह्याची मुख्य केंद्रे, उद्याोगांची मुख्य स्थाने, महत्त्वाच्या शहरांची वैशिष्ट्ये व त्यांची टोपण नावे, ती नदीकिनारी असल्यास संबंधित नद्या यांच्या टेबलमधील नोट्सचा जोड्या जुळवा प्रकारातील प्रश्न सोडविताना खूप फायदा होतो.

महाराष्ट्राचा राजकीय भूगोल अभ्यासताना प्रशासकीय विभागांतील जिल्हे, जिल्ह्यांची मुख्यालये, जिल्ह्यांचे आकार, किनारी जिल्हे, शेजारी राज्यांच्या सीमारेषेवरील जिल्हे, महत्वाचे तालुके यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा.

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्यूदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर, अनूसूचित जाती व जमातींची लोकसंख्या/प्रमाण यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११ च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

महाराष्ट्रातील आदीम जमाती, देशातील महत्वाच्या आदीम जमाती व त्यांचे भूप्रदेश, त्यांच्या शेतीचे प्रकार, चर्चेत असल्यास त्यांच्याबाबतचे महत्त्वपूर्ण मुद्दे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

steelframe. india@gmail.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi zws 70