विद्यार्थी मित्रहो, आज आपण प्रकरण अभ्यास (केस स्टडीज) या घटकावर आलेल्या प्रश्नांच्या उत्तर लेखनासाठी काय तयारी करावी लागते आणि उत्तर लिहिताना काय लक्षात ठेवून उत्तर लिहावे लागते, याची चर्चा करणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रकरण अभ्यास या घटकाची तयारी जोपर्यंत अभ्यासक्रमातील संकल्पना, विचारवंतांचे सिद्धांत आणि इतर घटक यांचा सखोल अभ्यास होत नाही तोपर्यंत करू नये. कारण हा सर्व अभ्यास प्रकरण अभ्यासाच्या तयारीसाठी पाया म्हणून काम करतो. या अभ्यासामुळे दिलेल्या प्रकरणांकडे कोणत्या नैतिक दृष्टिकोनातून कसे पाहायचे हे कळते. तसेच सामाजिक मानसशास्त्राच्या उपयोजनांचा विचार समस्या सोडवण्यासाठी कसा करायचा हे कळते. लोक प्रशासनातील नैतिकतेच्या अभ्यासामुळे प्रशासकीय व्यवस्थांमधील कोणत्या गोष्टी नैतिक वा अनैतिक असतात या लक्षात आल्यामुळे व्यवस्थेतील नेमक्या कोणत्या दोषांमुळे समस्या निर्माण झाली असेल हे ओळखता येऊन व्यवस्थात्मक उपाय सुचवता येतात. या सर्वांचा परिपाक म्हणजे प्रकरण अभ्यासावरील प्रश्नांची उत्तरे ही फक्त सामान्य आकलनावर (common sensical understanding) अवलंबून न राहता त्यांना नीतिशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र आणि लोक प्रशासनातील नैतिकता यांच्या विविध सिद्धांतांचे अधिष्ठान लाभते. आणि मग दर्जेदार उत्तर लिहिणे शक्य होते.
हेही वाचा >>>बारावी नंतरची लॉ सीईटी
ढोबळमानाने प्रकरण अभ्यासावरील प्रश्नांचे दोन प्रकार पडतात. एकीकडे परिस्थितीवर आधारित प्रश्न विचारले जातात तर दुसरीकडे समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्हीही प्रकारांवर काही प्रश्न एकत्रितरित्या विचारले गेले आहेत. अशावेळी प्रश्नातील तुमची नेमकी भूमिका समजून योग्य उत्तर लिहिणे आवश्यक असते. यामुळे तुमचे अधिकार पद आणि त्या अनुषंगाने असलेल्या मर्यादा लक्षात घेता येतात. तसेच जिथे शक्य असेल तिथे व्यापक मुद्दा आणि नैतिक द्विधा काय आहेत, हे विचारले नसले तरी थोडक्यात अधोरेखित करावे. तुम्ही जो पर्याय वा कृती नैतिक समजत आहात तिचे मूल्यमापन नैतिक सिद्धांतांच्या कसोटीवर करावे. वृत्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता याची समज कुठे दाखवणे गरजेचे आहे हे देखील ओळखावे आणि तसे उपाय सुचवावेत. शेवटी तुम्ही निवडलेल्या कृतीचे ठामपणे आणि सर्व बाजूंचा विचार करून नैतिक मुद्दे लिहून समर्थन करावे.
आता हे सर्व कसे करायचे हे आपण २०२३ मध्ये आलेला एक प्रश्न घेऊन पाहूयात.
प्र. तुम्ही राष्ट्रीयीकृत बँकेत अनेक वर्षे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहात. एके दिवशी तुमची जवळची एक सहकारी तुम्हाला सांगते की तिचे वडील हृदयविकाराने त्रस्त आहेत आणि त्यांना शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. ती तुम्हाला सांगते की, तिच्याकडे कोणताही विमा नाही आणि ऑपरेशनसाठी सुमारे १० लाख रुपये खर्च येऊ शकतो. तुम्हाला याची कल्पना आहे की, तिच्या पतीचे यापूर्वी निधन झालेले आहे, शिवाय ती कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. तिच्या परिस्थितीबद्दल तुम्ही सहानुभूती दर्शवता. परंतु, सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे तुमच्याजवळ तिला आर्थिक मदत देण्यासाठी संसाधने नाहीत.
काही आठवड्यांनंतर, तुम्ही तिच्याकडे तिच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल विचारणा करता. तेव्हा ती तुम्हाला त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल आणि ते बरे होत असल्याची माहिती देते. ती तुम्हाला गोपनीयपणे सांगते की, बँक मॅनेजरने गोपनीयता बाळगण्याच्या व लवकरतात लवकर पैसे परत करण्याच्या अटीवर ऑपरेशनसाठी मदत व्हावी म्हणून बॅंकेतील एका निष्क्रिय खात्यातून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तिने ते रुपये परत करणे सुरू केले आहे, तसेच ती सर्व रक्कम हळूहळू जमा करत राहिल.
(अ) यात कोणत्या नैतिक समस्या समाविष्ट आहेत?
(ब) नैतिक दृष्टिकोनातून बॅंक व्यवस्थापकाच्या व्यवहाराचे मूल्यमापन करा.
(क) या परिस्थितीवर तुमची काय प्रतिक्रिया असेल? २०२३ (२०/२५०)
उत्तरासाठीच्या सूचना – सर्व प्रथम तुम्ही या प्रश्नामध्ये कोणत्या भूमिकेतून उत्तर लिहिणार आहात हे ओळखावे. जसे की इथे तुम्ही राष्ट्रीयीकृत बँकेत अनेक वर्षे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहात. या पदानुसार जे अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत त्यानुसारच तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे व्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करूनच तुम्ही निर्णय घेऊ शकता. व्यवस्थेच्या बाहेर जाऊन संस्था आणि व्यवस्था याच्या हिताच्या विरुद्ध जाणारे कार्य शक्यतो टाळावे.
दुसरी बाब म्हणजे व्यापक मुद्दा. यामध्ये या प्रकरणात निर्माण होणाऱ्या नैतिक समस्यांना व्यवस्थादेखील कारणीभूत आहे का याची दाखल घ्यावी. जसे की वरील प्रकरणात निष्क्रिय खात्यातील पैसे परस्पर वापरले जाऊ शकतात यावरून असे लक्षात येते की एकतर व्यवस्थेमध्ये पुरेशी पारदर्शकता नाही आणि दुसरीकडे बँक व्यवस्थापकाच्या निर्णयांवर लक्ष ठेवणारी आणि त्यांना तपासणारी व्यवस्था आहे असे दिसून येत नाही. कारण ती जर असती तर परस्परपणे आणि मनमानीपणे निष्क्रिय खात्यातून पैसे काढून ते वापरणे शक्य झाले नसते.
तिसरी बाब म्हणजे नैतिक द्विधा. यामध्ये कोणत्या दोन मूल्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो याचा विचार करावा. जसे की या प्रश्नात समस्यांनी घेरलेल्या सहकाऱ्याबद्दल सहानुभूती एकीकडे तर संस्थेच्या नियमांबद्दल बांधिलकी दुसरीकडे. म्हणजेच सहानुभूती विरुद्ध सचोटी.
चौथी बाब म्हणजे निर्माण होणाऱ्या विविध नैतिक समस्या. यामध्ये उपयुक्ततावादी, कर्तव्यवादी तसेच सद्गुणांवर आधारित नीतीशास्त्रीय दृष्टिकोनांचा विचार करावा. साध्य आणि साधन (Ends and Means debate) यांचा संघर्ष येतो आहे का, हे पाहावे. तसेच कायदा आणि नीतिशास्त्र यांच्यामध्ये काही मतभेद येऊ शकतात का, ते तपासून पाहावे.
एकदा का नैतिक समस्या व्यवस्थित मांडता आल्या की बँक व्यवस्थापकाच्या व्यवहाराचे मूल्यमापन करणे सोपे होते. परंतु हे करत असताना आपण कोणत्या मूल्यांना आदर्श मानून करत आहोत याचे भान ठेवावे. आणि शेवटी तुम्ही दिलेली प्रतिक्रिया ही विवेकी, योग्य वृत्ती दर्शवणारी आणि भावनिक बुद्धिमत्ता दाखवणारी असावी.
पुढील लेखामध्ये आपण या प्रश्नाच्या आणि अजून एका प्रश्नाच्या उत्तराची चर्चा करणार आहोत.