विक्रांत भोसले
विद्यार्थी मित्रहो, आज आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील निबंध या विषयाच्या तयारीसाठी आवश्यक अशा घटकांची आणि त्यातील काही निबंधांच्या नमुना उत्तराच्या आवश्यक मुद्द्यांची चर्चा करणार आहोत.
निबंधाचा पेपर हा २५० गुणांचा असून अंतिम यादीत येणाऱ्या उमेदवारांच्या यशामध्ये या पेपरमध्ये मिळणाऱ्या गुणांची महत्त्वाची भूमिका असते हे आतापर्यंतच्या निकालांवरून लक्षात आले आहे. साधारणपणे यशस्वी उमेदवारांना विशेषत: पहिल्या १०० मध्ये येणाऱ्या उमेदवारांना सरासरी १३० पेक्षा अधिक गुण मिळालेले आढळून आले आहे. असे जरी असले तरी परीक्षेला बसलेले बहुतांशी उमेदवार या विषयाच्या तयारीला इतर विषयांइतके महत्त्व, वेळ आणि योगदान देत असताना दिसत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे या विषयाला पूर्वनियोजित असा अभ्यासक्रम नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या संदर्भ साहित्याचाही फार असा उपयोग होत नाही. यामुळे या विषयाच्या तयारीसाठी नेमके काय करावे असा संभ्रम बऱ्याच उमेदवारांच्या मनात निर्माण होतो. त्यातील बऱ्याचजणांना असे वाटते की शाळा-कॉलेजमध्ये निबंधाबद्दल जे शिकलो आणि सामान्य अध्ययनातील विषयांच्या अभ्यासाच्या निमित्ताने जी तयारी होते त्यातूनच निबंधाची तयारी होते. परंतु हे असले गैरसमज उमेदवारांना एका चांगल्या आणि जाणीवपूर्वक तयारीपासून परावृत्त करत आले आहेत. यांच्यावर मात करणे ही निबंधाच्या पहिली पायरी आहे.
निबंधाच्या पेपरमध्ये परीक्षकाकडून पहिले जाणारे महत्त्वाचे घटक म्हणजे
१. विषयाचा आवाका आणि मर्यादा
२. विचारप्रक्रिया
३. लेखन आणि विचार यांतील स्पष्टता
४. उमेदवाराचे स्वत:चे विश्लेषण.
या सर्व घटकांचा अंतर्भाव स्वत:च्या लिखाणात करण्यासाठी दर्जेदार साहित्याचे वाचन करणे आणि निरीक्षणाद्वारे तसे लिखाण करण्याचा पुरेसा सराव करणे. तसेच अनुभवी शिक्षकांकडून आपल्या लिखाणाचे मूल्यमापन करणे गरजेचे असते. यामध्ये अवांतर वाचनाची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच आयुष्यात घेतलेले विविधांगी अनुभवदेखील इथे सहाय्यभूत ठरतात. जसे की सिनेमा, कविता, कादंबरी, मुलाखती, समकालीन वा ऐतिहासिक घटना, वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग, जोपासलेले छंद, नातेसंबंधात आलेले अनुभव इ. बऱ्याच गोष्टींमुळे आपल्या अवतीभवतीच्या जगाबद्दल आणि एकंदरीतच मानवी जीवनाबद्दल, मानवी स्वभावाबद्दल निर्माण झालेली समज आणि त्यातून आलेले शहाणपण याचे प्रतिबिंब तुमच्या निबंधात पाहण्याचा प्रयत्न परीक्षक करत असतो.
या सर्व जाणीवेतून केलेले लिखाण फक्त पुस्तकी ज्ञानातून आलेल्या लिखाणापेक्षा कधीही प्रगल्भ आणि सखोल चर्चा करणारे असते. ही सर्व तयारी नियोजनबद्ध पद्धतीने करता येते. यासाठी थोडेसे आत्मपरीक्षण आणि आपल्याला आयुष्यातील अनुभवाच्या शिदोरीचे परीक्षण करणे गरजेचे असते.
गेल्या काही वर्षांतील पेपरमधील आलेलेल विषय पहिले तर असे लक्षात येते की आयोगाचा तत्त्वज्ञानात्मक विषय निवडण्याकडे कल वाढलेला आहे. आणि विषयांची तयारी करताना आणि या विषयांवरील निबंध लिहिताना उमेदवारांचा गोंधळ उडालेला दिसून येतो. बरेच उमेदवार तत्त्वज्ञानात्मक निबंध हे फक्त सामान्य अध्ययनातील विषयाच्या ज्ञानाचाच वापर करून लिहिताना दिसतात. आणि यामुळे मग ज्या कारणासाठी असे विषय दिले जातात तो उद्देशच पूर्णपणे विफल झालेला दिसून येतो. तत्त्वज्ञानात्मक निबंधाचे दोन प्रकार होतात. एक म्हणजे रूपकांचा वापर करून दिलेले विषय आणि दुसरे म्हणजे तत्त्वज्ञानात्मक चौकटीवर वा विचारधारांवर आधारित निबंध.
रूपकांचा वापर केला जातो तेव्हा त्यांचा नेमका अर्थ लावणे जमायला हवे. जसे की अ ship in harbour is safe, but that is not what ship is for. इथे ship म्हणजे जहाज हे रूपक आहे. तसेच इथे Teleology या विचारधारेचा संबंध असलेला दिसून येतो. काही निबंधांमध्ये रूपकांचा वापर न करता थेट तत्त्वज्ञानातील विचारधारेला हात घातलेला दिसून येतो जसे की The real is rational and the rational is real. या विषयामध्ये कोणतेही रूपक वापरलेले नाही. इथे Realism आणि Idealism या विचारधारांमधील आंतरसंबंधाचे ज्ञान असायला हवे. परंतु चर्चा करताना एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे ती म्हणजे की चर्चा फक्त तत्त्वज्ञानात्मक करू नये तर त्याला सामान्यज्ञानाची जोड द्यावी. अथवा लिखाण फारच अमूर्त ( abstract) व्हायला लागते.
आज आपण एक विषय घेऊन त्यात काय महत्त्वाचे मुद्दे असायला पाहिजेत याची चर्चा करूयात.
Topic 1 – Thinking is like a game, it does not begin unless there is an opposite team.
विषय १ – विचार हा खेळासारखा आहे, विरोधक संघ असल्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही.
अर्थस्पष्टीकरण (Interpretation):
• माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. पण त्याचा विचार एकांतात तयार होत नाही. त्याच्या विचारांचे साचे हे बहुतेकदा समाजनिर्मित असतात.
• जर एखादा माणूस अशा समाजात राहणे मान्य करत असेल की जो कोणत्याही अटीवर त्याच्या नियमांचे पालन करण्यावर भर देतो आणि त्यापेक्षा वेगळ्या वर्तनाची निंदा करतो वा शिक्षा करतो, तर त्या माणसाची विचारप्रक्रिया ही सामाजिक रूढी, मूल्ये आणि श्रद्धा यांचे केवळ अंधानुकरणच बनून राहते.
• अशावेळी खऱ्या अर्थाने, जाणीवपूर्वक विचार करणे घडत नाही. हे फक्त मागील काळातील जगण्याच्या पद्धतींचे वा परंपरांचे नकल करणे असते.
• जर ते मानवाच्या वाढीस आणि विकासास हातभार लावू शकत असेल तर ते वाईट नाही. तथापि, विशेषत: जेव्हा बदल अपरिहार्य असतो तेव्हा असेच घडेल याची खात्री नसते.
• अशा प्रकारे, वास्तविक विचार करणे तेव्हाच घडते जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था प्रचलित जाणिवांना आव्हान देते. त्यामुळे मानवी समाजजीवनाच्या आत आणि बाहेर एक प्रकारचे मंथन सुरू होते.
• आणि हा खेळाच्या सुरुवातीसारखा विचार करण्याचा खरा प्रारंभ बिंदू बनतो. या पुढील लेखामध्ये या विषयाचे मुख्य मुद्दे आणि निष्कर्ष यांची चर्चा करूयात. तसेच आणखी एका विषयाची अशीच चर्चा करूयात.