प्रवीण चौगले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्व परीक्षेतील महत्त्वाचा घटक असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणती संदर्भ पुस्तके वापरावी, अभ्यासाची रणनीती कशी ठेवावी याबाबत जाणून घेणार आहोत.

आपणास ज्ञात आहे की या परीक्षेची तयारी करत असताना उमेदवारांना आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. यूपीएससी परीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान सारख्या विषयांचा समावेश करून आयोगाने वारंवार हे सिद्ध केले आहे की, जे लोक सर्वोच्च पदासाठी निवडले जातात त्यांचा जवळजवळ प्रत्येक क्षेत्राविषयीचा ‘अवेअरनेस’ (भान) चांगला असतो.

आपल्याला या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही पूर्व परीक्षेतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन केले तर तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे सैद्धांतिक पैलू आणि मूलभूत गोष्टींपासून ते नवीनतम तंत्रज्ञान विषयक घडामोडी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. आयोगाचा सहसा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्रापेक्षा जीवशास्त्रावर अधिक प्रश्न विचारण्याकडे कल असतो, आणि जीवशास्त्रातूनही, वनस्पतीशास्त्रापेक्षा प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र यांवर जास्त प्रश्न येतात. त्यामुळे आनुवंशिकता, सूक्ष्मजीव/ रोग, शरीरविज्ञान इत्यादी विषय चांगले अभ्यासावेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक चालू घडामोडी आणि दैनंदिन जीवनात त्यांचे उपयोग आणि परिणाम या विषयी आपण जागरूक राहणे आवश्यक ठरते. पुढे UPSC पूर्व परीक्षेत मागे विचारण्यात आलेल्या या विषयाशी संबंधित काही प्रश्नांचा आढावा घेऊ.

हेही वाचा >>> NLC Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये होणार ‘या’ पदांवर मोठी भरती! पाहा माहिती

● Q. खालीलपैकी कोणते विधान मानवी शरीरातील B पेशी आणि T पेशींच्या भूमिकेचे योग्य वर्णन करते?

a) ते पर्यावरणातील अॅलर्जींचे संरक्षण करतात.

b) ते शरीरातील वेदना आणि जळजळ कमी करतात.

c) ते शरीरात इम्युनोसप्रेसंट म्हणून काम करतात.

d) ते रोगजनकांमुळे होणाऱ्या रोगांपासून शरीराचे रक्षण करतात.

● Q. खालील विधाने विचारात घ्या

१ 1. मानवाने बनवलेल्या व्यतिरिक्त निसर्गात नॅनोकण अस्तित्वात नाहीत.

२. काही मेटॅलिक ऑक्साईडचे नॅनोकण काही सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये वापरले जातात.

३. काही व्यावसायिक उत्पादनांचे नॅनोकण जे वातावरणात प्रवेश करतात ते मानवांसाठी असुरक्षित असतात.

● वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

a) फक्त १ b) फक्त ३

c) १ आणि २ d) २ आणि ३

बहुतांश प्रश्न विविध वैज्ञानिक शोधांच्या वापराशी संबंधित आहेत. बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅनो-टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, डिफेन्स टेक्नॉलॉजी अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. गेल्या ३-४ वर्षात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सध्या चर्चेत असणाऱ्या तंत्रज्ञानविषयक घडामोडींचा मागोवा घेत राहणे श्रेयस्कर ठरते. उदा. वाय-फाय, आयपीटीव्ही, ३-डी प्रिंटिंग, ब्लू-रे डिस्क इत्यादी बाबी मागील वर्षांमध्ये चर्चेत होत्या व त्यावर प्रश्नदेखील आले होते. बायोटेक्नॉलॉजी आणि स्पेस टेक्नॉलॉजी यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रिलिम्स आणि मेन्ससाठी विशेष उल्लेख केला जातो. या विषयावर विचारण्यात आलेला प्रश्न पाहू या.

● Q. वेब ३.० च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

१. वेब ३.० तंत्रज्ञान लोकांना त्यांचा स्वत:चा डेटा नियंत्रित करण्यास सक्षम करते.

२. वेब ३.० जगात ब्लॉकचेन आधारित सोशल नेटवर्क्स असू शकतात.

३. वेब ३.० कॉर्पोरेशन ऐवजी एकत्रितपणे वापरकर्त्यांद्वारे ऑपरेट केले जाते.

● वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

a) फक्त १ आणि २

b) फक्त २ आणि ३

c) फक्त १ आणि ३

d) १, २ आणि ३

प्रश्नांचे स्वरूप, रचना आणि काठीण्य पातळी याविषयी अचूक माहिती मिळविण्यासाठी मागील वर्षाचे पेपर हे सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत. जर तुम्ही मागील वर्षांच्या पेपर्सचा कल पाहिला तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात येतील: पूर्व परीक्षेत या विषयावरील प्रश्नांची संख्या ८ ते १९ दरम्यान होती. मात्र, गेल्या काही वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातून केवळ ८ ते ९ प्रश्न आले आहेत. प्रश्न प्रामुख्याने तपशीलवार सैद्धांतिक ज्ञानाऐवजी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील चालू घडामोडींवर आधारित होते.

कला शाखेच्या विद्यार्थ्यांना हा विषय थोडा कठीण वाटणे शक्य आहे. मात्र, प्रश्न उपयोजित व मूलभूतबाबींवर विचारले जात असल्याने त्यांनी अजिबात चिंता करू नये. पूर्व व मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये या विषयाला महत्त्वाचे स्थान असल्याने या विषयात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य रणनीती आणि नियोजन आखणे आवश्यक आहे.

या अभ्यासघटकाची तयारी NCERT च्या क्रमिक पुस्तकांपासून करता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेची अडचण असल्यास स्टेट बोर्डाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकांचा वापर करता येईल. ही पुस्तके मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. यासोबत शक्य असल्यास सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ, इ. मासिके व द हिंदू सारखे वृत्तपत्र वाचता येते. याशिवाय ‘द हिंदू सारांश’ (नवीन नाव – युनिक मेन्सपिडिया) या मासिकामधून सर्व मुद्दे कव्हर करता येतील. एखाद्या संकल्पनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करावा. इस्त्रो, डीआरडीओ, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांची संकेतस्थळे नियमितपणे पहावीत. मानवी शरीरासंबंधी माहिती करिता ‘ह्युमन मशीन’ हे एनबीटी प्रकाशनाचे पुस्तक वापरावे. सामान्य विज्ञानातील सर्व घटक एकत्रितरित्या अभ्यासण्यासाठी ‘जनरल सायन्स’ (सोनाली भुसारे) आणि सामान्य विज्ञान (डॉ. घुगे) ही मराठीतील पुस्तके उपयुक्त ठरतील.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. Com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70