पंकज व्हट्टे
या लेखामध्ये आपण ब्रिटिश राजसत्तेच्या कार्यकाळाचा (१८५८-१९४७) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीकोनातून वेध घेऊ. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग असूनदेखील ‘स्वातंत्र्यलढा’ हा घटक वेगळा नमूद केला आहे. याचाच अर्थ या घटकाचा अभ्यास करताना विशेष तयारी करणे आवश्यक आहे. तसेच या घटकावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात.
भारतातील ब्रिटिश राजसत्तेच्या कार्यकाळाचे दोन भागामध्ये – भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड (१८५८-१८८५) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ (१८८५-१९४७) – विभाजन करता येईल. १८५७ च्या उठावानंतर भारतीय राष्ट्रवादाला गती मिळाली त्यामुळे हा कालखंड भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड मानला जातो. याच काळामध्ये उभरत्या भारतीय राष्ट्रवादाने भारतातील पहिल्या अखिल भारतीय राजकीय संघटनेचे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) रूप धारण केले.
विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या व्हॉईसरॉयच्या (कॅनिंग, लॉरेन्स, मेयो, नॉर्थब्रूक, लिटन आणि रिपन) कालखंडामधील धोरणे, महत्त्वाच्या घटना आणि त्यांना भारतीयांकडून मिळालेला प्रतिसाद यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. आर्थिक विकेंद्रीकरणाचे धोरण (मेयोच्या कार्यकाळात सुरू झाले आणि लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात सुरू राहिले), अफगाण धोरण, दुष्काळ धोरण, स्थानिक स्वयंशासनाचे धोरण या धोरणांचा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करावा. अठराव्या शतकच्या मध्यापासून भारतात दुष्काळ पडण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली, याबाबत प्रश्न २०२२ च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता. हा प्रश्न ब्रिटिश धोरणाशी संबंधित होता.
हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : ‘अग्निबाण’चे यशस्वी प्रक्षेपण अन् आरोग्य विम्यांच्या नियमातील बदल, वाचा सविस्तर…
भारतीय शासन कायदा (१८५८), भारतीय परिषद कायदा (१८६१), भारतीय उच्च न्यायालये कायदा (१८६१), भारतीय सनदी सेवा कायदा (१८६१), भारतीय दंड संहिता (१८६२), आणि भारतीय भाषा वृत्तपत्र (व्हर्नाक्युलर प्रेस) कायदा (१८७८) हे या काळात अंमलात आलेले महत्त्वाचे कायदे होते. अठराव्या शतकाच्या मध्यापासून भारतातील राज्ये आणि प्रदेशाची राजकीय आणि प्रशासकीय पुनर्रचना याबाबत २०२२ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना १८६१ च्या भारतीय परिषद कायद्यापासून उत्तराची सुरुवात करणे अपेक्षित आहे. या कायद्यान्वये बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे कायदेनिर्मितीचे अधिकार पुनर्स्थापित करण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय चळवळीचे तीन मुख्य भाग – मवाळ कालखंड (१८८५-१९०५), जहाल कालखंड (१९०५-१९२०) आणि गांधीयुग (१९२०-१९४७) – पाडले जातात. विद्यार्थ्यांनी या तिन्ही टप्प्यांची – मवाळ, जहाल, गांधीजी – आणि क्रांतिकारी चळवळ (प्रादेशिक क्रांतिकारी संघटना, इंडिया हाउस आणि गदर पार्टी) यांची उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती, राजकीय विचारधारा यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०१७ सालच्या मुख्य परीक्षेत मवाळांची राजकीय विचारधारा आणि ध्येये याबाबत प्रश्न विचारला होता. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी मवाळांचे योगदान, त्यांना मिळालेले यश आणि त्यांच्या धोरणांचे चिकित्सक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>> HPCL recruitment 2024 : ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ अंतर्गत मोठी भरती! पाहा माहिती
मवाळांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या धोरणाची समीक्षा करून मांडलेला संपत्ती वहनाचा सिद्धांत. याचा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करावा. मवाळ कालखंडाने जहाल कालखंडाची पायाभरणी केली आणि जहाल कालखंडाने गांधीयुगाची पायाभरणी केली हे येथे लक्षात घ्यायला हवे. २०२१ सालच्या मुख्य परीक्षेत व्यापक राष्ट्रीय चळवळीची पायाभरणी करण्यामध्ये मवाळांची भूमिका याबाबत प्रश्न विचारला होता.
जहाल कालखंड आणि गांधी युगामध्ये ज्या चळवळी – स्वदेशी, होमरूल, चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह, रौलेट कायद्याविरोधातील सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि चले जाव आंदोलन – झाल्या, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी या चळवळींचे स्वरूप, त्यांची दिशा, या चळवळींना वेगवेगळ्या प्रादेशिक आणि सामाजिक स्तरामधून मिळालेले योगदान यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. तसेच या चळवळींचे योगदान, परिणाम आणि मर्यादा या निकषांवर केलेले मूल्यमापन यांचादेखील अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचे योगदान याबाबत २०१३ आणि २०१६ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. २०२१ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान महात्मा गांधी यांनी राबवलेल्या रचनात्मक कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला होता.
गांधी युगामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीला अनेक घटकांनी – स्वराज पक्ष, क्रांतिकारी गट (हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन, चितगांव गट), आदिवासी, शेतकरी/शेतमजूर, कामगार चळवळ – यांनी योगदान दिले. या सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. २०१९ साली मुख्य परीक्षेत गांधीयुगामध्ये विविध घटकांनी राष्ट्रीय चळवळीला बळकट आणि समृद्ध केले याबाबत प्रश्न विचारला होता.
१९२० च्या दशकात डाव्या विचारांच्या पक्षाचा प्रभाव जास्त होता. क्रांतिकारक, काँग्रेस, किसान सभा, कामगार युनियन चळवळीवर डाव्या विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांनी अभ्यासणे अपेक्षित आहे. मागील शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टिकोनाला नवी उद्दिष्ट्ये प्राप्त झाली, त्यांचे महत्त्व विशद करा असा वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न २०१७ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. १९२० च्या दशकामध्ये राष्ट्रीय चळवळीने वेगवेगळे वैचारिक आधार स्वीकारले, असा प्रश्न २०२० सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता.
१९२० च्या दशकामध्ये धार्मिकदृष्ट्या कट्टर असणाऱ्या संघटनांच्या प्रभावाच्या वाढीसोबत धार्मिक हिंसाचार वाढीला लागला. ज्याची परिणती शेवटी मुस्लीम लीगद्वारा वेगळ्या राष्ट्राच्या मागणीमध्ये झाली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे १९४७ मध्ये भारतीय उपखंडाची धार्मिक आधारावर फाळणी झाली, विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी सायमन आयोग, सायमन आयोग विरोधी आंदोलन, नेहरू अहवाल, जिन्ना यांचा चौदा कलमी कार्यक्रम यांचा अभ्यास करायला हवा.
१९३० च्या दशकामध्ये सविनय कायदेभंग चळवळीव्यतिरिक्त गोलमेज परिषद, पुणे करार, सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यामागील धोरणात्मक विवाद, प्रांतिक निवडणुकीमधील सहभागावर वाद, १९३५ च्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुकांनंतर भारतीयांनी स्वीकारलेली प्रांतीय मंत्रालये आणि त्यांचे कार्य याचा अभ्यास करायला हवा.
१९४० च्या दशकामधील राजकीय कोंडी आणि ती सोडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या वाटाघाटी – ऑगस्ट ऑफर, क्रिप्सचा प्रस्ताव, त्रिमंत्री योजना, सी.आर. फ्यॉर्मुला, देसाई-लियाकत करार, वेव्हेलची योजना आणि माउंटबॅटन योजना- यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. ब्रिटिशांनी सत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची केली, त्याचे मूल्यमापन करा असा प्रश्न २०१९ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरोधात युद्ध घोषित केले. आझाद हिंद सेनेचे स्वरूप, तिचे महत्त्वाचे नेते, तिचा प्रभाव आणि आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर भारतात चाललेला खटला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. बॉम्बेमधील नाविक दलामध्ये झालेला उठाव हा त्या खटल्याला मिळालेला प्रतिसाद होता. हा उठाव म्हणजे ब्रिटिशांच्या भारतातील वासाहतिक आकांक्षांच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा होता, असा प्रश्न २०१४ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता.
आपण उपरोक्त चर्चा केलेल्या मुद्द्यांशिवाय इतर मुद्द्यांवरदेखील विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे. महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने (सुरत, लाहोर, कराची इ.), महत्त्वाचे नेते (मवाळ, जहाल, गांधी, आंबेडकर, टागोर, अरविंदो, रामास्वामी नायकर इ.) आणि त्यांचे विचार आणि योगदान यांचा अभ्यास करावा.
मौलाना आझाद यांचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान यावर २०१३ सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता. ‘गांधीजींशिवाय भारताचा स्वातंत्र्यलढा’ आणि आंबेडकर आणि गांधीजी यांचे ध्येय समान होते परंतु दृष्टिकोन आणि धोरणे यामध्ये फरक होता, यावर २०१५ सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता. २०१६ सालच्या मुख्य परीक्षेत गांधी आणि बोस यांच्या दृष्टिकोनातील फरकावर प्रश्न विचारला होता. २०१८ सालच्या मुख्य परीक्षेत महात्मा गांधी यांच्या विचारांचे समकाळातील महत्त्व हा प्रश्न विचारला होता. २०२३ सालच्या मुख्य परीक्षेत शिक्षण आणि राष्ट्रवाद याबाबत गांधी आणि टागोर यांच्या दृष्टिकोनातील फरक यावर प्रश्न विचारला होता.
विद्यार्थ्यांनी आवर्जून अभ्यासावा अजून असा एक घटक म्हणजे ब्रिटिशांनी भारतातील प्रशासनासाठी मंजूर केलेले कायदे. या कायद्यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा. तीन परिषद कायदे (१८६१, १८९२, १९०९) आणि भारतीय शासन कायदे (१९१९ आणि १९३५) या कायद्यांमधील तरतुदी आणि त्यामुळे बदललेले प्रशासन यांचा अभ्यास करायला हवा. ब्रिटिशांच्या धोरणामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांनी अभ्यासायला हवेत. इतर वसाहतींमध्ये नेलेल्या कंत्राटी भारतीय मजूरांबाबतचे ब्रिटिशांचे धोरण याबाबत २०१८ सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नामध्ये या मजुरांच्या सांस्कृतिक ओळखीबद्दल विचारले होते. २०२० सालच्या मुख्य परीक्षेमध्ये लॉर्ड कर्झनच्या धोरणाबाबत प्रश्न विचारला होता.
अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना सूक्ष्म तपशील आणि सर्व आयामांचा अभ्यास करावा. या लेखामध्ये आपण यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले याचा थोडक्यात आढावा घेतला यावरून उपरोक्त मुद्दा स्पष्ट होतो.
आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com
(अनुवाद : अजित देशमुख)