लोकेश थोरात

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागरी सेवा मुख्य परीक्षेतील भूगोल विषयाच्या तयारीसंदर्भात आतापर्यंतच्या लेखात आपण भूगोलाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, महत्त्व, सविस्तर अभ्यासक्रम व संदर्भ साहित्याबाबत चर्चा केली. आजच्या लेखात आपण अभ्यासाची रणनीती व उत्तरलेखनाबद्दल चर्चा करूया.

मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे वाचन व मागील वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण ही आपल्या तयारीची पहिली पायरी आहे. अभ्यासक्रमामुळे काय वाचावे हे लक्षात येते तर जुन्या प्रश्नांमुळे दिलेला अभ्यासक्रम कसा वाचावा, महत्त्वाचे घटक कोणते हे लक्षात येते. यानंतर भूगोलाची मूलभूत पुस्तके म्हणजेच ठउएफळ ची पुस्तके वाचावीत. ठउएफळ ची पुस्तके इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. हिंदी भाषेपेक्षा ती इंग्रजीत वाचण्याचा प्रयत्न करावा. जर इंग्रजी भाषेत वाचन अवघड वाटत असल्यास द युनिक अॅकॅडमीचे NCERT सिरीजचे पुस्तक वाचावे.

NCERT ची पुस्तके पाचवी, सहावी, सातवी अशा इयत्तांवर क्रमाने वाचावीत किंवा प्राकृतिक, मानवी भूगोल किंवा भारताचा भूगोल अशा घटकांनुसार वाचावीत. ही पुस्तके वाचल्यानंतर लगेचच त्याची टिपणे काढण्याची गरज नाही. टिपणे संदर्भ पुस्तकांच्या वाचनानंतर काढू शकता.

NCERT ची पुस्तके वाचून झाल्यावर सखोल अभ्यासासाठी संदर्भ साहित्य वाचावे. संदर्भ साहित्य वाचताना महत्त्वाच्या संकल्पना, नकाशे, आकृत्या, तक्ता इत्यादी समजून घेणे गरजेचे आहे. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना वेगवेगळी भौगोलिक वैशिष्ट्ये जसे पर्वतरांगा, मैदाने, पठारे, घटना जसे भूकंप, ज्वालामुखी, आवर्त यांचे वितरण, त्यांचा हवामानावर, पर्यावरणावर, व्यापारावर या व अशा इतर घटकांवर होणारा परिणाम, त्यांचा सहसंबंध अभ्यासणे महत्त्वाचे आहे. कोणतेही घटनादृश्य समजून घेताना त्याचा चालू घडामोडींशी असणारा संबंध अभ्यासणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> कर्मचारी निवड आयोगाद्वारे १७,७२७ रिक्त जागांसाठी होणार भरती! अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता निकष अन् महत्त्वाच्या तारखा

भारताचा भूगोल किंवा जगाचा प्रादेशिक भूगोल अभ्यासताना नकाशाची मदत घ्यावी. कोणतेही भौगोलिक वैशिष्ट्य जसे पर्वतरांग, नद्या, पठार, मैदाने, मृदेचे व वनांचे व खनिजांचे वितरण अशा गोष्टी नकाशात पाहणे गरजेचे आहे. पुस्तके वाचतानाच त्या पाठातील नकाशे, आकृत्या, तक्ते यांचाही सराव करावा. अभ्यासक्रमातील स्थिर घटकांना चालू घडामोडींसोबत जोडावे. शक्य असल्यास चर्चेमध्ये असणाऱ्या संभाव्य प्रश्नांसाठी केस स्टडीज् तयार कराव्यात. नकाशे किंवा आकृत्यांचा विचार करावा. संदर्भ पुस्तके कमीत कमी दोन ते तीन वेळा वाचून झाल्यावर आता त्याची सूक्ष्म टिपणे तयार करावीत. टिपणे तयार करण्यापूर्वी व कोणताही पाठ वाचण्यापूर्वी त्या पाठावरील जुने प्रश्न आवर्जून पाहावेत. टिपणे तयार करताना संदर्भ साहित्य व NCERT ची पुस्तके या दोन्हीही स्त्रोतांची एकत्रित टिपणे काढावीत. म्हणजे, एखादा पाठ उदा. भूविवर्तनीकी सिद्धांत या पाठासंदर्भात जे काही संदर्भ पुस्तकांमध्ये व NCERT च्या पुस्तकांमध्ये असेल ते एकाच पानावर टिपण स्वरूपात घ्यावे. असे केल्याने वेळेचीही बचत होते व अभ्यास करणे सोपे जाते. त्या पाठाबद्दल चालू घडामोडींमध्ये मिळालेली एखादी अधिकची माहितीही याच टिपणांशी जोडावी. अभ्यासक्रमातील सर्वच घटकांची टिपणे तयार न करता परीक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या घटकांचीच टिपणे तयार करावीत. टिपणे तयार झाल्यावर त्यांची वारंवार उजळणी करणे व त्यासोबतच उत्तरलेखनाचा सराव करणे गरजेचे आहे.

नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी उत्तरलेखनाचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. बहुतांश विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचा बराचसा वेळ फक्त वाचनावर घालवतात व लिखाणाकडे दुर्लक्ष करतात. नागरी सेवा पूर्व परीक्षा झाल्यावर दररोज किमान एक ते दोन प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे. शक्य असल्यास मुख्य परीक्षेसाठी टेस्ट सिरीज लावल्यास फायदा होतो. सुरुवातीस उत्तरलेखनाचा सराव करताना ३-४ पाठ अभ्यासून त्यावरील जुन्या परीक्षेतील प्रश्न लिहून पाहावेत व ते शिक्षकांकडून तपासून घ्यावेत. शिक्षकांनी सुचविलेल्या सुधारणांवर काम करणे व त्याचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे आहे.

कोणतेही उत्तर लिहिताना त्याचे प्रस्तावना, मुख्य मजकूर, समारोप, प्रवाह व मांडणी असे घटक असतात. प्रस्तावनेमध्ये प्रश्नातील मुख्य मुद्द्याची ओळख करायची असते. प्रस्तावनेची सुरुवात व्याख्येने, चालू घडामोडीने करता येते व एकूण शब्द मर्यादेच्या १० ते १५ टक्के शब्द प्रस्तावनेत वापरावेत. उत्तराचा मुख्य मजकूर हा त्याचा गाभा असतो. मुख्य मजकुरात ठळक मुद्दयांना सुयोग्य शीर्षक देणे, बहुआयामी पद्धतीने लेखन करणे, तार्किक मांडणी करून शक्य असल्यास उदाहरणासहित स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. उत्तर लेखनात भाषा ही साधी व संक्षिप्त असावी. उत्तर लेखन हे परिच्छेदानुसार, मुद्द्यांनुसार किंवा दोन्ही पद्धतीने केने जाऊ शकते. उत्तराचा समारोप करताना मुख्य मजकुरातील सर्व मुद्द्यांचा सारांश लिहावा. उत्तराचा समारोप हा सकारात्मक, भविष्यवादी व सर्वसमावेशक असावा. उत्तर लेखन करताना उत्तराची प्रस्तावना, मुख्य मजकूर व समारोपामध्ये एकसंधपणा किंवा प्रवाहीपणा टिकवणे महत्त्वाचे आहे.

उत्तराची मांडणी चांगली होण्यासाठी प्रवाह आलेखन (flow chart), आकृत्या, तक्ते, नकाशे यांचा वापर आवर्जून करावा. भूगोलाची उत्तरे लिहिताना शक्यतो प्रत्येक उत्तरामध्ये त्यांचा वापर करावा. उत्तरलेखन करताना अक्षर स्वच्छ व सुवाच्य असावे, शब्द मर्यादा पाळावी. व्याकरणातील चुका टाळाव्यात या व अशा गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने भूगोल विषयाच्या या लेखमालिकेमध्ये आपण भूगोलाचे महत्त्व, स्वरूप, व्याप्ती, तयारीची रणनीती, सविस्तर अभ्यासक्रम, संदर्भ साहित्याची यादी व उत्तर लेखन या सर्व विषयांवर चर्चा केली आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.

प्रभावी उत्तरलेखनासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवावेत :

उत्तर लेखनापूर्वी प्रश्नाची गरज ओळखणे व उत्तराची रचना व श्रेणी तयार करणे.

मुद्द्यास धरून उत्तरलेखन करणे व सुसंगत व अचूक माहितीचा वापर उत्तरात करणे.

उत्तरातील संकल्पनांचे सुस्पष्ट व सुसंगत विवेचन करणे.

अभ्यास करताना वाचन व लिखाण यांचा समतोल राखणे.

सुरुवातीस उत्तर लेखनात येणारा कंटाळा, संकोच, स्वत:वरील अविश्वास या गोष्टी टाळाव्यात.

परीक्षेमध्ये परिपूर्ण उत्तराकडे न धावता सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिण्यावर भर द्यावा.

परीक्षेप्रमाणेच वेळ लावून दिलेल्या वेळेत व शब्द मर्यादेत उत्तर लेखनाचा सराव करावा.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com