शिवाजी काळे
भारतीय समाजात महिलांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक दृष्टिकोनातून महिलांना कुटुंबाच्या व्यवस्थापनाचे मुख्य आधार मानले जाते, परंतु आधुनिक काळात त्यांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांतही मोठे योगदान दिले आहे. महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक मानले जाते. सामाजिक सक्षमीकरण म्हणजे महिलांच्या अधिकारांचे रक्षण, स्वातंत्र्याची वृद्धी, आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणाची हमी.
भारतीय समाजातील महिलांची भूमिका आणि स्थान :
महिलांनी विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कुटुंब व्यवस्थापनात त्यांनी पारंपरिक भूमिका निभावली आहे, जसे की मुलांचे संगोपन, वृद्धांचे पालनपोषण आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे. आर्थिक क्षेत्रात महिलांनी कृषी, उद्याोग, सेवा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील महिला बँकांच्या उपक्रमांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात आले आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिलांनी नेतृत्वाच्या भूमिकेत येऊन सामाजिक परिवर्तन घडवून आणले आहे.
महिलांना भेडसावणाऱ्या लिंगभावात्मक समस्या:
भारतीय महिलांना विविध लिंगभावात्मक समस्यांचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या बाबतीत अजूनही ग्रामीण भागात आणि काही सामाजिक गटांमध्ये मुलींच्या शिक्षणाला कमी महत्त्व दिले जाते. यामुळे मुलींना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये अडचणी येतात. आरोग्याच्या समस्यांमध्ये माता मृत्यू दर, अल्पवयीन मातृत्व, पोषणाची कमतरता यांचा समावेश होतो. महिलांना कौटुंबिक हिंसा, लैंगिक शोषण आणि छळाचा सामना करावा लागतो. कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळ, वेतन विषमता आणि असुरक्षित कामकाजाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : ऑर्डनन्स फॅक्टरीमधील संधी
समस्यांचे निराकरण:
महिलांच्या समस्यांच्या निराकरणासाठी विविध शासकीय योजना, कायदे आणि न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना मुलींच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या संरक्षणाचा प्रचार करण्यासाठी लागू करण्यात आली आहे. ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’ गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते. कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा, २००५ महिलांच्या घरगुती हिंसेपासून संरक्षणासाठी तयार करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, २०१३ हा महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला आहे.
सामाजिक सक्षमीकरणाचे पैलू आणि समकालीन उपक्रम :
महिलांचे सामाजिक सक्षमीकरण हे अनेक पैलूंवर आधारित असते. शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच महिलांना उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण मिळवून देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येते. महिलांना स्वयंसहायता गट, सूक्ष्म वित्तपोषण, आणि उद्याोजकता यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मुद्रा योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी वित्तपुरवठा केला जातो. महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी अधिक आरक्षण, प्रशिक्षण, आणि प्रेरणा देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाचे कायदे लागू करण्यात आले आहेत.
समकालीन उपक्रमांमध्ये ‘महिला सक्षमीकरण अभियान’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या अभियानाद्वारे महिलांना नेतृत्वगुणांचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत नेतृत्वाची संधी दिली जाते. तसेच, महिला स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळते.
हेही वाचा >>> करिअर मंत्र
निष्कर्ष :
यूपीएससी मुख्य परीक्षेत महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. यासाठी पुढील रणनीती उपयुक्त ठरू शकते- विविध घटकांचा अभ्यास करणे, महिलांचे सक्षमीकरण, सरकारच्या योजना, न्यायालयीन निर्णय, सामाजिक चळवळी यांचा सखोल अभ्यास करणे. समकालीन घटनांचे विश्लेषण करून चालू घडामोडी, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचा अभ्यास करून अद्यायावत माहिती मिळवणे. उत्तरात उदाहरणे देऊन आपल्या मुद्द्यांची स्पष्टता वाढवणे हे महत्त्वाचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्व ओळखून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना समान संधी देण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. महिलांच्या सहभागाशिवाय समाजाचा विकास आणि प्रगती साधता येणार नाही. त्यांच्या सक्षमीकरणानेच एक सशक्त आणि समृद्ध समाज घडवला जाऊ शकतो.
आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com