आजच्या लेखात आपण भावनांसंबंधी झालेल्या अभ्यासाचा आढावा घेणार आहोत. तसेच, या अभ्यासातून उगम पावलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा प्रशासकीय सेवांमध्ये कोणता मोलाचा वाटा आहे, हे पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भावनांचे महत्त्व

डार्विनने म्हटल्याप्रमाणे, शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, भावनांमागे जीवशास्त्रीय कारण असते. भावना एकप्रकारे हे निदर्शित करत असतात की, एखादी गोष्ट मानवाच्या गरजेनुसार पूर्ण होत आहे अथवा नाही. जेव्हा आपल्याला हवी असणारी गोष्ट/वस्तू आपल्याला मिळत नाही किंवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही तेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. यामध्ये राग, भिती, निराशा या आणि यांसारख्या भावनांचा समावेश होतो. जसे की भूक लागली की चिडचिड होणे. व्यक्तीच्या त्याच्या भावनांवर असलेल्या नियंत्रणामधून किंवा त्याच्या अभावातून व्यक्तीला अनेकविध परिणामांना सामोरे जावे लागते. हे परिणाम सामाजिक, मानसिक किंवा शारीरिक देखील असू शकतात.

भावना हे शरीराचे संवादी माध्यम मानले जाते. त्याकडे दुर्लक्ष करणे हे शरीरासाठी विघातक ठरू शकते. उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती ज्याप्रमाणे अधिक यशस्वी असतात, त्याचप्रमाणे त्या अधिक निरोगी, आनंदी व इतरांबरोबरील नातेसंबंधात अधिक सुखी असतात.

उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक भावनांचा निरोगी समतोल आढळतो. जसे की –

हेही वाचा >>> नोकरीची संधी : ‘सारथी’च्या साथीने कौशल्य विकास प्रशिक्षण

स्व-नियंत्रण, मैत्री, जागरुकता, समाधान, आनंद, परिपूर्णता, स्वायत्तता, स्वातंत्र्य, इच्छा, प्रशंसा, मानसिक शांतता इ.

या उलट ज्या व्यक्तींचा भावनिक बुद्ध्यांक कमी असतो, त्यांना खालील भावनांच्या मिश्रणाला सामोरे जावे लागते.

एकटेपणा, भीती, रिकामपण, दडपण, निराशा, बांधिलकी, अवलंबित्व, राग, चिडचिड, आळस, अस्थिरता इ.

म्हणूनच आपल्या एकंदर आनंदी व गुणावत्तापूर्ण आयुष्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता निर्माण करणे आवश्यक आहे. या सगळ्यातून भावनिक बुद्धिमत्तेची एक व्याख्या खालीलप्रमाणे केली जाऊ शकते –

व्यक्तीची भावनांचा वापर करून घेऊन संवाद साधण्याची, लक्षात ठेवण्याची, वर्णन करण्याची, बोध घेण्याची, समजून घेण्याची, ओळखण्याची, भावना समजावून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.

भावना व मेंदू

हे समजून घेणे अतिशय आवश्यक आहे की, भावनिक बुद्धिमत्ता हे सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विरुद्ध क्षमता मोजणारे मापक नाही. भावनिक बुद्धिमत्ता व सर्वसामान्य बुद्धिमत्ता यांचा अनोखा मिलाफ व्यक्तीची एकूण बुद्धिमत्ता ठरवत असतो.

आपल्या सर्वांनाच कधी ना कधी स्वत:च्या भावनांवर ताबा नसल्याचा अनुभव आला आहे. यामागील एक कारणमीमांसा म्हणजे भावनांचा आणि मेंदूचा गुंतागुंतीचा असलेला संबंध. पंचेद्रियांकडून मिळालेला कोणताही संदेश हा मेंदूतील thalamus (थॅलॅमस) कडे पाठविला जातो व तेथून त्याचे रासायनिक संदेशात ‘भाषांतर’ केले जाते. अशाप्रकारे बहुतेक सर्व संदेश मेंदूच्या वस्तुनिष्ठपणे विचारप्रक्रिया करणाऱ्या केंद्रकाकडे पाठविले जातात. मात्र अशा संदेशांमध्ये भावनांचे मिश्रण असल्यास हे संदेश amygdala (अमिग्डेला) या मेंदूमधील भावनिक केंद्राकडे पाठविले जातात. याचवेळेस संदेशातील बहुतेक भाग हा मेंदूतील वस्तुनिष्ठपणे विचार करणाऱ्या केंद्रकाकडे पाठविला जातो व काही भाग सरळ अमिग्डेलाकडे जातो. म्हणजेच काही संदेशांसाठी प्रतिसाद हा केवळ लगेचच मिळणारा भावनिक प्रतिसादच असतो.

मेंदू आणि भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो व मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर बदलत असतो. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या भावनांना दूर लोटण्याचा किंवा त्यांकडे दुर्लक्ष करण्याचा अथवा त्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. आपल्या भावना या सतत आपल्या बरोबर असतात. आपल्या भावनांची मुळे आपल्या उत्क्रांतीमध्ये व जीवशास्त्रामध्ये दडलेली आहेत. आपल्या भावनांविषयी माहिती करून घेणे व त्यावर योग्य नियंत्रण मिळवणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.

प्रशासनातील महत्त्व

अनेक संस्थांना व प्रशासकांना हे उत्तमरित्या उमजले आहे की, केवळ IQ (Intelligence Quotient) व्यक्तीच्या यशाची अथवा गुणवत्तेची हमी देऊ शकत नाही. भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात घेणे प्रशासकांसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी अधिक प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने काम करणारी व्यक्ती केवळ उच्च बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू शकत नाही. तसेच अधिकाऱ्यांनीदेखील आपल्या सहकर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करत असताना त्यांच्याकडे असलेल्या भावनिक बुद्धिमत्तेला पुरेसे महत्त्व दिले पाहिजे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70