मागील काही लेखांमध्ये आपण यूपीएससीच्या नीतिशास्त्र विषयासंबंधी माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने नीतिशास्त्र म्हणजे काय, विविध नैतिक चौकटी, त्यासाठी पाश्चात्य विचारवंतांनी दिलेले योगदान याचा आढावा आपण घेतला. याचबरोबर युती आणि वर्तन, भावनिक बुद्धिमत्ता या सगळ्याचा देखील विचार आपण केला.
प्रशासकीय सेवांमध्ये वरील घटकांच्या अभ्यासाची काय गरज आहे, हे सुद्धा आपण वेळोवेळी पाहिले. आजच्या लेखात आपण पेपरमधील ‘ब’ विभागाकडे वळणार आहोत. हा विभाग पूर्णत: केस स्टडीजना वाहिलेला आहे. केस स्टडीज प्रभावीपणे कशा लिहायच्या हा स्वतंत्र आणि सखोल चर्चेचा मुद्दा आहे आणि पुढील काही लेखांमधून आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम केस स्टडीज सोडवत असताना दिलेल्या केसमधील नैतिक द्विधा कोणती हे ओळखता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण काही नैतिक द्विधा अभ्यासणार आहोत.
सार्वजनिक मालकीच्या वस्तू वैयक्तिक गरजेसाठी वापरणे
यामध्ये कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या लिफाफ्यांचा वैयक्तिक पत्र व्यवहारासाठी वापर करण्यापासून कार्यालयाचा पैसा स्वार्थासाठी खर्च करणे इथपर्यंत सर्वांचा समावेश होतो.
ज्या वस्तूंवर आपला मालकी हक्क नाही त्यांचा अनावश्यक वापर करणे अथवा वैयक्तिक कामासाठी वापर करणे या दोन्ही गोष्टी नैतिक आचरणाचा भाग होऊ शकत नाहीत. तसेच असा वापर करण्यामुळे झालेले आर्थिक नुकसान किंवा हेतू हे मुद्दे जरी काही परिस्थितीमध्ये गैर लागू असतील तरीदेखील इतरांच्या (सरकारच्या) मालकीच्या गोष्टींवर वैयक्तिक गोष्टींप्रमाणे हक्क बजावणे हे अनैतिक आचरणच आहे.
चुकीचे चित्र निर्माण करणे
खोटे बोलणे व चुकीच्या किंवा असत्य गोष्टी असल्याचा निर्वाळा देणे या दोन्हीत सूक्ष्म फरक आहे. या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणा या मुद्यावर आधारित व्यक्तींच्या वागणुकीचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ, अपघातात सापडलेल्या कारची दुरुस्ती व रंगरंगोटी करून तुम्ही ती विकू इच्छिता. जेव्हा एखाद्या संभाव्य ग्राहकाकडून कारच्या परिस्थितीविषयी विचारणा केली जाते, तेव्हा तुम्ही अपघाताबद्दल कोणतीही माहिती देत नाही. येथे तुम्ही एक प्रकारचे खोटे बोलत आहात, ते म्हणजे खरी माहिती दडवून ठेवणे तसेच खोटी माहिती खरी म्हणून मांडणे. या प्रकारच्या आचरणामध्ये वरती उल्लेख केलेल्या गोष्टींसारख्या इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो. जसे की, इतरांच्या कामाचे श्रेय घेणे, इतरांना त्यांनी न केलेल्या कामाचे फायदे मिळवण्यासाठी मदत करणे. या सगळ्यामध्ये खोटे बोलण्याबरोबरच तुम्ही समोरच्या व्यक्तीची एकप्रकारे दिशाभूल करत आहात.
हेही वाचा >>> Success Story: १६ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी विकले दूध, आता आहेत दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
अनैतिक कृती होत असताना शांत बसणे
येथे चुकीचे वागणे म्हणजे इतरांनी केलेल्या अनैतिक कृतींचे जाहीर खंडन न करणे होय. जर तुम्ही आपल्या सहकाऱ्याला लाखो रुपयांची, सरकारी पैशांची अफरातफर करताना पाहिले असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कृतीची संबंधितांकडे तक्रार कराल काय? जर एखादी अधिकारी व्यक्ती चुकीची माहिती एखाद्या चर्चेमध्ये अथवा खटल्यामध्ये देत असेल तर तुम्ही निर्णय घेणाऱ्यांना किंवा न्याय मंडळाला खरी परिस्थिती सांगाल काय? इतरांच्या अनैतिक कृत्यांबद्दल कोणतीही सकारात्मक क्रिया न करणे हेच मुळात अनैतिक आहे. अशा अनैतिक वागणुकींचे दाखले आपल्याला समाजात सर्वत्र कायम पाहावयास मिळतात. परंतु याचा अर्थ या गोष्टी नैतिक असतात असा होत नाही. जसे की, परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार इतर विद्यार्थी करताना आढळत नाहीत, असे म्हणणे म्हणजे त्या प्रकारच्या कृतीला दिलेली एक प्रकारची मूक संमतीच होय.
नियमांचे उल्लंघन करणे
अनेकदा मोठ्या संस्थांमध्ये अथवा सरकारी यंत्रणांमध्ये लागू करण्यात आलेले नियम हे अंतर्गत नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक व लोकशाहीचा पुरस्कार करणारे असतात. मात्र हे नियम पाळणे अनेकांना बंधनकारक व जाचक वाटू शकते. तसेच संस्थेतील ज्या व्यक्ती ग्राहकांना अथवा जनतेला उत्तरे देण्यास बांधील आहेत त्यांच्यासाठी तर हे नियम पाळणे वेळेचा अपव्यय वाटू शकते.
या सर्व परिस्थितीत जरी नियम बदलणे व त्यात सुधारणा करणे शक्य असले तरीदेखील कर्मचारी म्हणून त्या नियमांचा आदर राखणे नैतिक आचरणाचा भाग आहे. जोपर्यंत हे नियम बदलले जात नाहीत तोपर्यंत त्या नियमांची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांकडून होणे अपेक्षित असते. नियम जाचक वाटण्यामागे एक सोपा युक्तिवाद म्हणजे कोणत्याही चांगल्या सवयी ज्यात व्यक्तीचे एकंदर हित सामावले आहे, त्या आपणास कायमच कष्टप्रद वाटतात.