अजित देशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजच्या लेखामध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांची नमुना उत्तरे पाहू. या आधारे आपण मुख्य परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिताना कोणत्या प्रकारची रणनीती अंमलात आणायची हे समजून घेऊ शकतो.
प्र. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शिक्षण आणि राष्ट्रवादविषयक विचारांमधील फरक स्पष्ट करा.
महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या शिक्षण आणि राष्ट्रवादविषयक विचारांचे सखोल आकलन झाल्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर लिहिता येणार नाही.
शिक्षणाबाबतचे विचार
महात्मा गांधी : महात्मा गांधी यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन पायाभूत शिक्षणास महत्त्व देणारा होता. यालाच ‘बुनियादी तालीम’ असेही म्हटले जाते. स्वत: कृती करून आत्मसात करणे म्हणजे शिक्षण हा गांधीजींचा शिक्षणाचा मूलमंत्र होता. श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणे हा त्यांच्या शिक्षणविषयक विचाराचा गाभा होता. विद्यार्थ्यांनी उत्पादक काम करून, हस्तकाम करून कौशल्ये साध्य करावीत असे ते म्हणत. शिक्षण मातृभाषेतून दिले जावे यासाठी गांधीजी आग्रही होते. त्यांच्या मते मातृभाषेतून शिक्षण घेणे हाच शिक्षण घेण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. ग्रामीण जीवनाबाबत गांधीजींचे असणारे विचार त्यांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये प्रतिबिंबित झालेले पाहायला मिळतात. शिक्षणाचे मूळ साधेपणात असावे असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीबाबत त्यांचे मत अनुकूल नव्हते. तंत्रज्ञानाच्या अतिरेकास त्यांचा विरोध होता. नैतिकदृष्ट्या उन्नत मानव घडवणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असावे असे गांधीजी मानत.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
रवींद्रनाथ टागोर : टागोर यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यास प्राधान्य देणारा होता. शिक्षणामुळे व्यक्तीची सर्जनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि आंतरिक चैतन्य यांचा विकास व्हावा, असे टागोर यांचे मत होते. टागोर यांनी मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना मान्य केली असली तरी ज्ञानाची वैश्विकता कवेत घेणारे शिक्षण असावे असेही त्यांचे मत होते. तसेच विद्यार्थ्यांनी इतर भाषादेखील अवगत केल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. निसर्गाचे सानिध्य हा टागोर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा गाभा होता. त्यांनी शांतीनिकेतन विश्वविद्यालय उभारले. या संस्थेत शिक्षण हे निसर्गाच्या सानिध्यात दिले जाईल याची काळजी घेतली जात असे. पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक वैज्ञानिक दृष्टी विकसित करणारे शिक्षण दिले जावे असे त्यांचे मत होते. व्यक्तीचा आध्यात्मिक विकास करणे, त्याची/ तिची सौंदर्यदृष्टी घडवणे आणि सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असावे असे टागोर यांचे मत होते. पाश्चात्त्य देशांमधील सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती भारतात अंमलात आणाव्यात असे त्यांचे मत होते.
राष्ट्रवाद
महात्मा गांधी : महात्मा गांधी यांच्या मते ब्रिटिशांविरोधातील राजकीय संघर्ष हा अहिंसात्मक मार्गाने करायला हवा. गांधीजी यांचा राष्ट्रवाद भारतीय जनतेमध्ये रुजलेला होता. त्यांनी ब्रिटिश वस्तू, ब्रिटिश संस्था इ.चा बहिष्कार केला. त्यांच्या मते राष्ट्रवाद म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि न्याय्य जग घडविण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहणे. सशस्त्र राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादाच्या नावाखालील हिंसेला त्यांनी विरोध केला.
रवींद्रनाथ टागोर : टागोर यांचा राष्ट्रवाद मानवतेच्या अध्यात्मिक एकतेवर आधारलेला होता. त्यांचा राष्ट्रवाद हा आक्रमक स्वरूपाचा नव्हता. त्यांचा राष्ट्रवाद वैश्विक मानवतावादाशी जोडलेला होता. संस्थांमध्ये सुधारणा करण्यास त्यांचे प्राधान्य होते. पूर्णपणे बहिष्कार करण्यास त्यांचा विरोध होता. त्यांनी राष्ट्रवादाची कोती व्याख्या अमान्य केली. राष्ट्रवाद ही सत्तेची किल्ली आहे असे मानण्यास त्यांचा विरोध होता. राष्ट्रवादाच्या नावाखाली जगाला राजकीय सीमांमध्ये विघटित करण्यास त्यांनी विरोध केला.
हेही वाचा >>> करीअर मंत्र
गांधी आणि टागोर या व्यक्तिमत्वांचा शिक्षण आणि राष्ट्रवादाविषयी दृष्टिकोन आणि विचार भिन्न होता. दोहोंचे विचार भारतीय आणि पाश्चात्त्य शिक्षणपद्धती तसेच राष्ट्रवादाची युरोपीय संकल्पना यांनी प्रभावित झाला होते. दोघांवर भारतीय तत्वविचार, भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि धार्मिक सहिष्णुता यांचा प्रभाव पडला होता. युरोपीय राष्ट्रावादाच्या कोत्या संकल्पनेपेक्षा राष्ट्रवादाची व्यापक संकल्पना निर्माण करण्यावर दोघांनीही आपापल्या पद्धतीने भर दिला. दोन्ही नेत्यांच्या दृष्टिकोनात फरक असला, त्यांच्यामध्ये मतभेद असले तरी हे दोन्ही नेते भारताच्या उज्वल भविष्यासाठी समर्पित होते. आधुनिक भारताची प्रतिमा घडविण्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मुख्य परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिताना उत्तरांचा कच्चा आराखडा बनवणे आवश्यक असते. कच्चा आराखडा बनवल्यास उत्तराची सुव्यवस्थित मांडणी करणे शक्य होते. प्रस्तावना, मुख्य गाभा आणि निष्कर्ष/ सारांश या क्रमाने उत्तराची मांडणी केल्यास उत्तर प्रभावी बनते आणि जास्तीत जास्त गुण मिळण्याची शक्यता वाढते. मुख्य मुद्द्यांची जास्त महत्त्वाचे ते कमी महत्त्वाचे या क्रमाने मांडणी करावी. तसेच प्रश्नाच्या स्वरूपानुसार निष्कर्ष/ सारांश/ भविष्यातील वाटचाल या उपशीर्षकाखाली उत्तरचा शेवट करावा. आपली उत्तरपत्रिका आपले प्रतिनिधित्व करते हे लक्षात घेऊन उत्तराची प्रभावी मांडणी करणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त गुण मिळवण्याच्या दृष्टीने प्रश्नातील प्रत्येक शब्दांला न्याय द्यावा. पुढच्या लेखामध्ये आपण याचप्रकारे मुख्य परीक्षेत विचारल्या गेलेल्या अन्य काही प्रश्नांची नमुना उत्तरे पाहू, जेणेकरून आपली परीक्षेची तयारी अजून सोपी होईल.