‘उमेदवाराला केडर निवडण्याचा अधिकार नाही’ – सर्वोच्च न्यायालय
ए. शैनामोल खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. यूपीएसीच्या उमेदवारांमध्ये ‘केडर व सेवा’ याबाबत कमालीची उत्सुकता तर असतेच, पण त्याचबरोबर एका भावी प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी या दोन्ही बाबी तेवढय़ाच महत्त्वाच्याही असतात.
या लेखात आपण यूपीएससीतील विविध पदांच्या पसंतीक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
पदांचा पसंतीक्रम हा उमेदवारानुसार बदलू शकतो. यात त्या उमेदवाराच्या आवडी-निवडी, कौशल्ये व पदासंबंधीची जाण इ. बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे एकच पसंतीक्रम सर्वाना लागू होत नाही हे लक्षात घ्या. उदा. परराष्ट्र सेवेत काम करण्यास इच्छुक उमेदवार ‘आयएफएस’ या सेवेला प्राधान्य देतील. तर भारतातच काम करण्याची ईच्छा असलेले उमेदवार ‘आयएएस’, ‘आयपीएस’ या सेवांची निवड करतील.
सेवांचा पसंती क्रम ठरविताना खालील घटकांचा विचार करणे अपेक्षित आहे –
सनदी सेवांचे स्वरूप जाणून घेणे
एकूण २३ पदे यूपीएससीद्वारे भरली जातात. या पदांचे कामाचे स्वरूप जाणून घ्या. तुम्हाला स्वत:ला त्यानुसार कोणती सेवा करायला आवडेल ते आपण ठरवू शकतो. या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांशीही तुम्ही चर्चा करू शकता, परंतु त्यांचे पदाबद्दलचे मत हे वैयक्तिक असू शकते हेही तुम्हाला समजून घ्यावे लागेल.
काहींना आपल्याला मिळालेली सेवा हीच कशी चांगली आहे इतरांना पटवून देण्यात रस असतो तर काहींच्या बाबतीत ‘पदरात पडले सोने झाले’ ही स्थिती असते. त्यामुळे एका सेवेबाबत किमान २-३ अधिकाऱ्यांशी बोलून तुम्ही निर्णय घेणे अपेक्षित असते.यात मतमतांतरे असण्याची शक्यता अधिक असल्याने तुमचे स्वत:चे याबाबतचे मत अधिक महत्त्वाचे असते.यासाठी अनुभवी मार्गदर्शकांचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता.
स्वत:ची कौशल्ये (स्किल सेट) जाणून घेणे
तुमच्याकडील कौशल्ये व या विविध सेवांसाठी आवश्यक कौशल्ये याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. उदा.‘धैर्य’ सर्व पदांसाठी गरजेचे आहे. परंतु ‘भारतीय पोलीस सेवे’त त्याचे एक वेगळेच महत्त्व आहे ते बासवान समितीने स्पष्ट केले होते.
पगार, भत्ते, सेवेतील संधी
सेवा निवडताना हा एक महत्त्वाचा घटक असून सेवेतील तुमचा पगार, भत्ते तसेच त्या सेवेतील संधी समजून घ्यायला हव्यात.
सेवेतील नियुक्तीच्या शक्यता
यात तुम्हाला तुमच्या ‘होम केडरमध्ये’ म्हणजे स्वत:च्या राज्यात काम करायला मिळेल का? तसेच ‘नियुक्तीतील स्थिरता’ मिळणे अपेक्षित असते. अन्यथा वारंवार बदली झाल्यास तुम्हाला कामही करता येत नाही व कामाचे समाधानही मिळत नाही.
सामाजिक प्रतिष्ठा
यूपीएससीतील या सेवा प्रामुख्याने ‘सामाजिक प्रतिष्ठे’साठी ओळखल्या जातात. नागरिकांशी येणारा तुमचा थेट संबंध तसेच भारतीय समाजात ‘शासकीय नोकरी’,‘निश्चित वेतन’ याबाबत सध्याची सकारात्मक स्थिती या सेवांना इतर नोकऱ्यापेक्षा वेगळे ठरवितात.
बढती मिळण्याची संधी
कोणत्याही सेवेत जेव्हा व्यक्ती कार्यरतअसते, तेव्हा त्या व्यक्तीला कामाच्या गुणवत्तेनुसार वा सेवाज्येष्ठेतेनुसार बढती मिळणे अपेक्षित असते. तसेच बढतीच्या संधी कोणत्या सेवेत किती आहेत कशा आहेत हे समजून घ्यायला हव्यात. बहुतेकदा नव्याने आलेल्या ‘आयसीएलएस’ सारख्या सेवेत अशी संधी लवकर मिळू शकते.
काम व वैयक्तिक आयुष्याचा समतोल
‘वर्क लाईफ बॅलन्स’ हा कोणत्याही व्यक्तीसाठी एक चांगले आयुष्य जगण्याकरिता आवश्यक आहे. जर तुम्हाला हा समतोल साधता आला नाही तर तुमचे आयुष्य तुम्हा ओझे वाटू शकते. यामुळे नैराश्यसुध्दा येवू शकते. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण काळानुरूप बदलतो. हे लक्षात घेवूनच सेवांचा पसंतीक्रम हवा.
सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे सेवांना उमेदवारांद्वारे पसंती दिली जाते –
सर्वाधिक पसंती : आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस-आयटी, आयआरएस-कस्टम.
मध्यम पसंती : आयएएएस, आयसीएएस, आयसीएलएस, आयडीएएस, आयडीईएस, आयआयएस, आयपीओएस, आयपीटीएएफ,आयआरएमएस(टी), आयआरएमएस(पी), आयआरएमएस(ए), आयटीएस, आयआरपीएफ.
सर्वात कमी पसंती : डीएएनआयसीएस, डीएएनआयपीएस, पीओएनडीआयसीएस, पीओएनडीआयपीएस, एएफएचक्यू
यूपीएससीतील सेवांचा पसंतीक्रम हा तुमच्या प्रशासकीय सेवेतील करिअरमधील पाया आहे. यावर तुमचे प्रशासकीय आयुष्य अवलंबून असल्यामुळे सारासार विचार करूनच निर्णय घ्या!
sushilbari10@gmail.com