‘चालू घडामोडी’ हा स्पर्धा परीक्षेचा ‘आत्मा’ आहे. यूपीएससी पूर्वपरीक्षेत २०१५ व २०१६ या दोन वर्षात चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारले गेले. हाच ट्रेंड गेल्या तीन वर्षात म्हणजेच २०२२, २०२३ व २०२४ मध्ये आपणास बघावयास मिळतो. इतर विषयांशी संबंधित काही प्रश्न हे चालू घडामोडींशी निगडीत असतात; त्यामुळे प्रश्नसंख्या त्यानुसार लक्षात घ्यावी लागते. या विषयावर प्रभुत्व मिळविण्यासाठी नियमित वृत्तपत्राचा आढावा आपण घ्यायला हवा. वृत्तपत्राचा आढावा घेताना तुम्हाला युपीएससीपूर्वपरीक्षेतील गतवर्षीचे प्रश्न समजून घेणे अपेक्षित असते. गतवर्षीच्या प्रश्नांमुळे तुम्हाला वृत्तपत्रातील कोणत्या बातम्या महत्त्वाच्या आहेत हे समजण्यास मदत होते.

चालू घडामोडी या विषयात इतर विषयांप्रमाणे अभ्यासक्रम नसतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक घडामोडींचा अभ्यास कसा करावा ते आपण या लेखात समजून घेऊ. २०२३ पासून ‘संरक्षण’ या घटकांवर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल दिसून येतो. याआधी या घटकावर प्रश्न विचारण्याचे प्रमाण तेवढेसे नव्हते. ‘आंतरराष्ट्रीय संस्था व त्यासंबंधीचे करार’ हा घटकही इथे खूप महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावर आज ‘संयुक्त राष्ट्रे’, ‘युरोपियन युनियन’, ‘जी७’, ‘ब्रिक्स’, ‘आसियान’ इ. आंतरराष्ट्रीय संस्था, गट यांचे सध्या काय सुरू आहे? त्यांनी काही करार वा घोषणापत्रे जारी केल्यास ते आपणास माहीत हवे. यावर एक लेख मी आगामी काळात या लेखमालेत देईन. या विषयाचा अभ्यास करताना खालीलप्रमाणे घटकांचा विचार करा-
संरक्षण : यात संरक्षणाशी संबंधित शस्त्रास्त्रे, करार, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, सैन्य दलातील पदानुक्रम, अतिविशिष्ट पदाचे कर्तव्य व त्यासाठीचे निकष, सैन्य दलांच्या लष्करी कवायती, सैन्य दलांच्या विविध मोहिमा इ. चा अभ्यास करणे अपेक्षित आहे. यावर आयोगाने विचारलेले प्रश्न बघा झ्र
प्र. खालील विमानांचा विचार करा: [२०२४]
१. राफेल २. मिग-२९
३. तेजस एमके-वन
वरीलपैकी किती पाचव्या पिढीचे लढाऊ विमान मानले जाते?
अ) फक्त एक ब) फक्त दोन
क) तीनही ड) एकही नाही
या प्रश्नावरून लढाऊ विमाने आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासायला हवीत हे कळते. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात समाविष्ट स्वदेशीअर्जुन युद्ध रणगाडा, तेजस लढाऊ विमान, सी-१३०जे सुपरहर्क्युलिस, सी-२९५, सी-१७ ग्लोबमास्टर, पी-८ आय, मिग-२९ आणि एसयू-३० इ. बाबत तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. पुढील पदानुक्रमाचा प्रश्न बघा –
प्र. भारतीय संरक्षण दलांच्या तीन सेवांमध्ये समकक्ष पदवीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते योग्य आहेत? [२०२४]
सेना – वायुसेना – नौसेना
१. ब्रिगेडीयर – एयर कमोडोर – कमांडर
२. मेजर जनरल – एयर व्हाइस मार्शल – व्हाइस अॅडमीरल
३. मेजर – स्क्वाड्रन लीडर – लिअफ्टनंट कमांडर
४. लेफ्टनंट कर्नल – ग्रुप कॅप्टन – कॅप्टन
खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:
अ) १ आणि ४ ब) १ आणि ३
क) २, ३ आणि ४ ड) ३ फक्त
असे प्रश्न आपण चालू घडामोडींपेक्षा ‘जीके’ या घटकाच्या संदर्भात बघतो. असा डेटा आपण एकदाच अभ्यासले तर नंतर फक्त रिवीजन केली तरी चालते.
अण्वस्त्र व त्यासंबंधीचे करार: यात अणूऊर्जा व त्याचा संरक्षण क्षेत्रातील वापर अभ्यासताना अण्वस्त्र व त्यासंबंधीचे करार, आंतरराष्ट्रीय संस्था जसे की आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी याबद्दलची माहिती घ्यायला हवी. खालील प्रश्न हा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीशी संबंधित आहे.
प्र.भारताने काही अणुऊर्जास्थाने ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी संरक्षण’ अंतर्गत ठेवलेली असून काहींचा समावेश त्यात केलेला नाही याचे कारण खालीलपैकी कोणते आहे? [२०२०]
अ) काही युरेनियम वापरतात आणि काही थोरियम वापरतात
ब) काही आयात केलेले युरेनियम वापरतात आणि काही स्थानिक युरेनियम वापरतात.
क) काही परकीय उपक्रमांद्वारे चालविले जाते आणि काही स्थानिक उपक्रमांद्वारे चालविले जाते.
ड) काही शासकीय आणि काही खाजगी आहेत.
आंतरराष्ट्रीय संस्था व करार : वर सांगितल्याप्रमाणे या घटकाबाबत पुढील लेखात माहिती घेवूयात.
सामान्य ज्ञान : यात राजकीय, आर्थिक, पर्यावरण, व्यक्ती, पुस्तके, विज्ञान तंत्रज्ञान, पुरस्कार, क्रीडा यातील चालू घडामोडींचा अभ्यास अपेक्षित आहे. खालील प्रश्न बघा –
प्र. या खालीलपैकी कोण ‘दि इंडिया वे’ आणि ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचा लेखक आहे? [२०२४]
अ) भूपेंद्र यादव ब) नलिन मेहता
क) शशी थरूर ड ) सुब्रह्मण्यं जैशंकर
असे प्रश्न आयोगाने अलीकडच्या काळात विचारायला सुरुवात केलेली आहे. यामुळे आयोगाच्या धक्कातंत्रासाठी आपण तयार रहायला हवे
२०११ ते २०२४ या वर्षात या विषयातील विचारलेल्या प्रश्नांचे ४ घटकात वर्गीकरण केलेले आहे.

या लेखातील विश्लेषणासह काही वृत्तपत्रे, इंटरनेटवरील संदर्भ अभ्यासल्यास या विषयाचा अभ्यास नक्कीच सुकर होईल.
sushilbari10 @gmail.com