या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आंतरराष्ट्रीय घडामोडी हा विषय समजून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे घेतले जाणारे निर्णय, आंतरराष्ट्रीय करार, चर्चेतील देश, विविध देशांतील प्रदेश व स्थळे, आंतरराष्ट्रीय अहवाल व निर्देशांक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प; पायाभूत सुविधा इ.चा अभ्यास यात करणे अपेक्षित आहे.
यातील घटक आपण यूपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नातून समजून घेऊया –
प्र. खालील जोड्या विचारात घ्या: (२०२४)
देश – चर्चेत असण्याची कारणे
१. अर्जेंटिना – गंभीर आर्थिक संकट
२. सुदान – देशाच्या नियमित सैन्य आणि पॅरामिलिट्री दलांमध्ये युद्ध
३. तुर्की – नाटोच्या सदस्यत्वातून बाहेर पडले
वरील दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर किती जोड्या जुळतात?
(अ) फक्त एक जोडी
(ब) फक्त दोन जोड्या
(क) सर्व तीन जोड्या
(ड) यापैकी नाही
या प्रकारचे प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले दिसून येतात. एखादा देश चर्चेत असण्याची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. सध्या चर्चेतील युक्रेन, इस्रायल, रशिया असे देश आपण अभ्यासायला हवेत. मध्य पूर्व आशिया व आफ्रिकन देशांवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ‘गोलन हाइट’ या प्रदेशावर जसा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे; त्याप्रमाणे आफ्रिकेतील साहेल प्रदेशावर आयोगाने २०२४ पूर्व परीक्षेत विचारलेला आहे. पुढील प्रश्न बघा-
प्र. खालील विधानांचा विचार करा:
विधान-१: साहेल प्रदेशात अस्थिरता आणि सुरक्षेची परिस्थिती भयानक होत चालली आहे.
विधान-२: साहेल प्रदेशाच्या अनेक देशांमध्ये अलीकडच्या काळात लष्करी उठाव झाले आहेत.
यासंबंधी कोणते विधान योग्य आहे?
(अ) विधान-१ आणि विधान-२ दोन्ही योग्य आहेत आणि विधान-२ विधान-१चे स्पष्टीकरण करते.
(ब) विधान-१ आणि विधान-२ दोन्ही योग्य आहेत, परंतु विधान-२ विधान-१चे स्पष्टीकरण करत नाही.
(क) विधान-१ योग्य आहे, परंतु विधान-२ चुकीचे आहे.
(ड) विधान-१ चुकीचे आहे, परंतु विधान-२ योग्य आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे वा करार यावरही आयोगाद्वारे प्रश्न विचारले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे व त्यांची वैशिष्टे आपण अभ्यासायला हवीत. हे करताना असेच कायदे अभ्यासायचे आहेत ज्याने जगावर वा भारतावर विशेष परिणाम होईल. खालील प्रश्न हा युरोपियन संसदने केलेल्या नेट-झिरो उद्योग कायद्यावर विचारलेला आहे.
प्र. खालील विधानांचा विचार करा: (२०२४)
विधान-१: युरोपियन संसदेने नुकतेच नेट-झिरो उद्याोग कायदा मंजूर केला.
विधान-२: युरोपियन संघ २०४० पर्यंत कार्बन तटस्थता साधण्याचा उद्देश ठेवतो आणि त्यामुळे त्या वेळेस स्वत:ची सर्व स्वच्छ तंत्रज्ञान विकसित करण्याचे लक्ष्य ठेवतो.
वरील विधानांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे?
(अ) विधान-१ आणि विधान-२ दोन्ही योग्य आहेत आणि विधान-२ विधान-१चे स्पष्टीकरण करते.
(ब) विधान-१ आणि विधान-२ दोन्ही योग्य आहेत, परंतु विधान-२ विधान-१चे स्पष्टीकरण करत नाही.
(क) विधान-१ योग्य आहे, परंतु विधान-२ चुकीचे आहे.
(ड) विधान-१ चुकीचे आहे, परंतु विधान-२ योग्य आहे.
आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये जी-७, जी-२०, डब्ल्यूटीओ, डब्ल्यूचओ, आसियान इ. बरोबर इतरही चर्चेतील संस्थांचाही अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०२४ पूर्वपरीक्षेत ‘जागतिक शौचालय संस्था’ व ‘आंतरराष्ट्रीय धान्य परिषदे’बद्दल प्रश्न विचारलेला आहे. यात संस्थांची स्थापना, कार्ये, पहिली व अलीकडची परिषद, परिषदेतील घोषणपत्रे यांचा अभ्यास करायला हवा. आंतरराष्ट्रीय संघटनांबाबत पूर्वपरीक्षेत विचारलेले प्रश्न बघा –
प्र. ‘जी-२०’बद्दलच्या खालील विधानांचा विचार करा: (२०२४)
१. ‘जी-२०’ समूहाची स्थापना मूळत: वित्त मंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांसाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून करण्यात आली.
२. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही भारताची जी-२० प्राथमिकता आहे.
उपरोक्त कोणते विधान/विधाने योग्य आहेत?
(अ) फक्त १ (ब) फक्त २
(क) १ आणि २ दोन्ही (ड) यापैकी नाही
प्र. जागतिक शौचालय संस्थेबद्दल खालील विधानांचा विचार करा: (२०२४)
१. हे युनायटेड नेशन्सच्या एजन्सींपैकी एक आहे.
२. जागतिक शौचालय शिखर परिषद, जागतिक शौचालय दिवस आणि जागतिक शौचालय महाविद्यालय हे या संस्थेचे उपक्रम आहेत, जे जागतिक स्वच्छता संकटावर कार्य करण्यास प्रेरित करतात.
३. या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे कमी विकसित देश आणि विकासशील देशांना खुल्यावर शौच समाप्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
वरील दिलेली विधाने बरोबर आहेत?
(अ) फक्त २ (ब) फक्त ३
(क) १ आणि २ (ड) २ आणि ३
प्र. खालील विधानांचा विचार करा:
१. भारत आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेचा सदस्य आहे.
२. धान्य (तांदूळ आणि गहू) निर्यात किंवा आयात करण्यासाठी एखाद्या देशाला आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेचा सदस्य असणे आवश्यक आहे.
वरील दिलेल्या विधानांपैकी कोणती/कोणती योग्य आहे/आहेत?
(अ) फक्त १ (ब) फक्त २
(क) १ आणि २ दोन्ही (ड) यापैकी नाही
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिशन, चळवळी, पुढाकार यांचाही अभ्यास आपण करायला हवा. उदा.
’१०० मिलियन शेतकरी’ ही संकल्पना २०२४ च्या पूर्वपरीक्षेत विचारली होती. या संकल्पनेत अन्न आणि पाण्याची प्रणाली, जी कार्बन शून्य, नैसर्गिकरित्या सकारात्मक आहेत त्यासाठी प्रयत्न करण्याचे एक व्यासपीठ आहे आणि शेतकऱ्यांची शाश्वतता वाढवण्याचा उद्देश यात आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर पूर्व परीक्षेत मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात तेव्हा या घटकाचा अभ्यास करताना मागील दोन वर्षांतील घडामोडींचा अभ्यास करा.
sushilbari10@gmail. com
बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट (बीईटी) ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत घेण्यात येते. जैव प्रौद्याोगिकी क्षेत्रातील संशोधन शिष्यवृत्तीसाठी ही परीक्षा दिली जाते. या परीक्षेची नोंदणी सुरू झाली असून २८ मार्च २०२५ पर्यंत अर्जांची मुदत आहे. परीक्षा १३ मे २०२५ रोजी होणार आहे. अधिक माहिती – nta.ac.in वर मिळेल. आयआयटी मुंबईने डिझाइनची सामायिक प्रवेश परीक्षा CEED 2025 चा निकाल जाहीर केला आहे. ceed.iitb.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.