या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडीतील ‘क्रीडा’ हा घटक समजून घेणार आहोत. यूपीएससी पूर्वपरीक्षेत ‘क्रीडा’ या घटकांवर नियमितपणे प्रश्न विचारले जात नव्हते परंतु २०२१ व २०२३ च्या पूर्वपरीक्षेत या घटकावर आयोगाने प्रश्न विचारले. २०२४ च्या पूर्वपरीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले गेले नाहीत. यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेत अशा पद्धतीने परंपरागत बाबींना शह देणे ही काही नवीन बाब नाही. २०२१ व २०२३ या वर्षातील क्रीडा या घटकावरील प्रश्न हे क्रिकेट, बुद्धिबळ, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार यावर विचारले आहेत. हे सर्व प्रश्न चालू घडामोडींनुसार विचारलेले आहेत. त्यामुळे २०२५ च्या पूर्वपरीक्षेसाठी २०२४ मधील क्रीडा संबंधी चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
यूपीएससी पूर्वपरीक्षेतील क्रीडा पुरस्कारासंबंधी विचारलेले खालील प्रश्न बघा-
प्र. क्रीडा पुरस्कारांबाबत खालील जोड्या विचारात घ्या: [२०२३]
१. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार – गेल्या चार वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने केलेल्या सर्वात नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी
२. अर्जुन पुरस्कार – एखाद्या खेळाडूने केलेल्या जीवनगौरव कामगिरीसाठी
३. द्रोणाचार्य पुरस्कार – खेळाडू किंवा संघांना यशस्वीरित्या प्रशिक्षण देणाऱ्या प्रख्यात प्रशिक्षकांचा सन्मान करण्यासाठी
४. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार – निवृत्तीनंतरही खेळाडूंनी दिलेल्या योगदानाची ओळख पटवण्यासाठी
वरीलपैकी किती जोड्या योग्यरित्या जुळतात?
अ) फक्त एक ब) फक्त दोन
क) फक्त तीन ड) चारही
२०२५ युपीएससी पूर्वपरीक्षेत ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकेर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार (उंच उडी) या चार क्रीडापटूंवर प्रश्न विचारला जाऊ शकतो; कारण त्यांना २०२४ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.
प्र. २००० मध्ये सुरू झालेल्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: [२०२१]
१) अमेरिकन गोल्फर टायगर वुड्स हा या पुरस्काराचा पहिला विजेता होता.
२) आतापर्यंत हा पुरस्कार बहुतेकदा ‘फॉर्म्युला वन’ खेळाडूंना मिळाला आहे.
३) रॉजर फेडररला इतरांच्या तुलनेत हा पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळाला.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) फक्त १ आणि २
ब) फक्त २ आणि ३
क) फक्त १ आणि ३
ड) १, २ आणि ३
२०२० मध्ये सचिन तेंडुलकरला सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षणासाठी लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार मिळाला होता. २०११ चा क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन जातानाच्या क्षणासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळेच या पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आला.
२०२४ व २०२५ मधील चालू घडामोडीतील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे स्वरूप व पुरस्कार मिळालेल्या क्रीडापटूंबाबतची माहिती तुम्हाला माहीत असायला हवी.
२०२३ व २०२१ मधील विविध क्रीडाप्रकारांबाबत विचारलेले खालील प्रश्न बघा –
प्र. ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड, २०२२ च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: [२०२३]
१. भारतात पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाड आयोजित करण्यात आला होता.
२. अधिकृत शुभंकर ‘थंबी’ असे नाव देण्यात आले.
३. खुल्या विभागात विजेत्या संघासाठी ट्रॉफी म्हणजे वेरा मेनचिक कप होय.
४. महिला विभागात विजेत्या संघासाठी ट्रॉफी म्हणजे हॅमिल्टन-रसेल कप होय.
वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत?
अ) फक्त एक ब) फक्त दोन
क) फक्त तीन ड) सर्व चार
सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद २०२४ मध्ये चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. तसेच बुडापेस्ट येथे झालेल्या ४५ व्या फिडे बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताने खुल्या आणि महिला दोन्ही विभागात ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे २०२५ च्या पूर्वपरीक्षेत यासंबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो.
प्र. ३२ व्या उन्हाळी ऑलिम्पिकच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: [२०२१]
१) या ऑलिम्पिकचे अधिकृत ब्रीदवाक्य ‘एक नवीन जग’ आहे.
२) या ऑलिम्पिकमध्ये क्रीडा क्लाइंबिंग, सर्फिंग, स्केटबोर्डिंग, कराटे आणि बेसबॉल यांचा समावेश आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
अ) फक्त १ ब) फक्त २
क) दोन्ही १ आणि २
ड) दोन्ही १ किंवा २ नाही
२०२४ चे ऑलिम्पिक पॅरिस, फ्रान्स येथे संपन्न झाले. यात भारताला १ रौप्य व ५ कांस्य पदके मिळलीत. तसेच येथे पॅरा ऑलिम्पिक सुद्धा संपन्न झाले. जसा २०२० च्या ऑलिम्पिकवर २०२१ मध्ये प्रश्न विचारण्यात आला तसा प्रश्न २०२४ च्या ऑलिम्पिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
प्र. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: [२०२१]
१) अंतिम फेरीतील संघ जिंकलेल्या सामन्यांच्या संख्येवरून ठरवले गेले.
२) न्यूझीलंड इंग्लंडपेक्षा जास्त सामने जिंकल्यामुळे इंग्लंडपेक्षा पुढे होता.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
अ) फक्त १ ब) फक्त २
क) दोन्ही १ आणि २
ड) दोन्ही १ किंवा २ नाही
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आयसीसी ‘टी २० विश्वचषक’ व ‘चॅम्पियन ट्रॉफी’ जिंकली असून त्यानुषंगाने २०२५ क्रिकेटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
यूपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेले प्रश्न लक्षात घेऊन आगामी २०२५ पूर्वपरीक्षेसाठी आपण अपेक्षित प्रश्नांवर काम करायला हवे. २०२४ व २०२५ मधील क्रीडा घडामोडी बघता या घटकावर प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या घटकाचा अभ्यास चांगला करा. sushilbari10@gmail.com