डॉ. महेश शिरापूरकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थी मित्रांनोमागील लेखात आपण सामान्य अध्ययन पेपर २ मधील अभ्यासघटक आणि २०२३ च्या मुख्य परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहिले होते. आजच्या लेखात या पेपरची तयारी कशी करावी, यासंदर्भात काही मुद्दे जाणून घेणार आहोत.

सामान्य अध्ययन पेपर २ हा थोडासा चकमा देणारा किंवा बुचकळ्यात टाकणार पेपर आहे. या पेपरचे संदर्भ साहित्य इंग्रजी आणि मराठी माध्यमातून सहज आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हा पेपर सोपा असेल असा बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समज होतो. पण प्रत्यक्षात परीक्षा दिल्यानंतर या पेपरमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण मिळत नसल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करतात.

असे होण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे विद्यार्थी या पेपरमधील जो स्थायी/ न बदलणारा (स्टॅटिक) भाग आहे त्यावर समान भर देण्याऐवजी या पेपरमधील घटकांशी संबंधित चालू घडामोडींवर अधिक भर देतात. या पेपरमधील संकल्पनात्मक आणि स्थायी भागाचा अभ्यास अधिक चांगला असेल आणि त्याला जोडून अल्प प्रमाणात चालू घडामोडींचे संदर्भ दिले तर उत्तर अधिक भरीव ठरते. दुसरा मुद्दा, या पेपरमधील बरेचसे प्रश्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यघटनेतील कोणत्या ना कोणत्या तरतुदींशी संबंधित असतात. त्यामुळे उत्तराच्या प्रस्तावनेत राज्यघटनेतील संबंधित कलमांचा उल्लेख केला जाणे अपेक्षित असते. बरेच विद्यार्थी ही बाब परीक्षकांना माहीत असल्यामुळे तिचा उल्लेख न करता युक्तिवादाला किंवा उत्तराच्या मुख्य मुद्द्यांना सुरुवात करतात. अशा तांत्रिक बाबींकडे थोडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. राज्यघटनेतील विषय लक्षात आला तर कलमे पाठ करावी लागत नाहीत तर ती संबंधित विषयाचा भाग म्हणून लक्षात राहतात.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

या पेपरमधील बरेचसे प्रश्न हे एखाद्या विवादास्पद विषयाशी संबंधित असतात. एखाद्या प्रश्नाच्या/विषयाच्या एकापेक्षा अधिक बाजू असतील तेव्हा तो मुद्दा विवादास्पद बनतो. अशा प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाच्या जास्तीत जास्त आणि योग्य युक्तिवादाच्या बाजू माहीत असणे आवश्यक आहे. चर्चा करा, स्पष्ट करा, तुमचे मत मांडा किंवा तुमच्या मताची पुष्टी करा इत्यादी सारखे उपप्रश्न जेव्हा असतात तेव्हा उत्तरामध्ये संबंधित प्रश्नाच्या अधिकाधिक बाजू मांडल्या गेल्या पाहिजेत. विद्यार्थी अगदी उत्तराच्या सुरुवातीपासूनच कोणती तरी एक बाजू/ युक्तिवाद मांडतात आणि पुढे पूर्ण उत्तरात तोच युक्तिवाद योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. असे न करता उत्तर लिहिण्यात संतुलन ठेवावे.

प्रश्नाच्या उत्तरात शक्य आणि आवश्यक तिथे उप-शीर्षकांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. कारण यामुळे तुम्हाला प्रश्नाचे तुकडे पाडून त्यावर लक्ष केंद्रित करता येते आणि त्या मुद्द्याचेच अधिक चांगल्या रितीने स्पष्टीकरण लिहिता येते. आणखी एक कारण म्हणजे, तुमचे उत्तर लेखन मूळ मुद्द्यापासून भरकटत नाही. तुम्ही अगदी मोजकेपणाने उत्तर लिहिले आहे, हे यामुळे परीक्षकाच्या लक्षात येते. तुम्हाला विचारलेला प्रश्न आणि आणि तुम्ही लिहिलेले उप-शीर्षक यांमध्ये शब्द रचनेच्या, अर्थाच्या दृष्टीने साम्य किंवा सुसंगती असेल तर असे उप-शीर्षक परीक्षकाला ‘अपील’ होऊ शकते.

सामान्य अध्ययन पेपर २ हा मुख्यत: विश्लेषणाधारित पेपर आहे. यामध्ये अनेक प्रश्नांमध्ये तुमचे मत मांडा, तुम्ही या मताशी सहमत आहात का, किंवा तुमच्या मताची पुष्टी करा असे उप-प्रश्न विचारले जातात. अशा वेळी उत्तरात तात्त्विक/ सैद्धांतिक चर्चा किंवा युक्तिवाद करण्याबरोबरच अनुरूप, सुयोग्य तथ्यांचा आणि आकडेवारीचा वापर केला तर ती अधिक प्रभावी आणि भरीव वाटतात. तुमच्या मताची पुष्टी समर्पक तथ्यांच्या किंवा आकडेवारीच्या साहायाने करता येणे ही उत्तर लेखन शैलीची एक कला आहे. उत्तरांचा लेखन सराव करताना याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. यासाठी तुम्ही प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध अहवालांचा, संशोधनाचा संदर्भ देऊ शकता.

हेही वाचा >>> स्पर्धेत धावण्यापूर्वी : नैतिकता

या पेपरची तयारी करताना चर्चेत किंवा प्रकाशझोतात असणारी प्रत्येक समिती, संस्था वा आयोग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यूपीएससीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण केल्यास आयोग या घटकावर कशाप्रकारे प्रश्न विचारू शकते, याचा अंदाज बांधता येतो आणि त्या दिशेने उत्तराची तयारी करता येते. तसेच उत्तरे लिहिताना शक्य असल्यास माहिती-नकाशा, माहिती-तक्त्यांचा (इन्फो-ग्राफिक) वापर करावा. यामुळे जास्तीत जास्त मुद्दे कमीत कमी जागेत आणि प्रभावीपणे मांडता येतात. त्यावर तुम्हाला आणखी भाष्य करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते.

या पेपरमधील तयारीचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय. या घटकाची तयारी करताना स्टॅटिक अधिक चालू घडामोडी असा एकत्रितपणे करावा. भारत आणि शेजारील देश किंवा भारत आणि प्रमुख महासत्ता या उपघटकाचा अभ्यास करताना सोबत राजकीय नकाशा तर हवाच पण अशा दोन देशांमधील वादाचे मुद्दे, दोन्ही देशांमध्ये आजपर्यंत झालेले करार-वाटाघाटी आणि संभाव्य उपाययोजना किंवा दोन्ही राष्ट्रांकडून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरून केले जाणारे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांच्या मर्यादा माहीत असाव्यात किंवा त्यासंबंधी शॉर्ट नोट्स आपल्याकडे असाव्यात. अशा संबंधातील भू-राजकीय, भू-आर्थिक, भू-सामरिक, भू-सांस्कृतिक, राजनयिक असे विविध आयाम अभ्यासावेत. द्विपक्षीय संबंधाविषयी उत्तराचा समारोप भविष्यकाळाचा वेध घेत सकारात्मक किंवा तथ्यांच्या आधारावर आशादायी असा करावा. या घटकाची तयारी करताना वर्ल्ड फोकस, फ्रंटलाईन यांसारखी नियतकालिके तर पाहावीत पण सर्वाधिक भर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीवर द्यावा. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना या घटकाची तयारी करताना इंग्रजीतील संदर्भ पाहावी लागतील. कालच्या लेखात आपण २०२३ सालच्या मुख्य परीक्षेत या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न पाहिले. पुढील लेखात यापैकी काही प्रश्नांची नमुना उत्तरे कशी असावीत किंवा या प्रश्नांच्या उत्तरामध्ये किमान कोण-कोणत्या मुद्द्यांचा समावेश असणे अपेक्षित आहे, याचा उहापोह करणार आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना विचार करण्यास चालना मिळेल आणि उत्तर लेखनाची रणनीती ठरविता येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70