विक्रांत भोसले
विद्यार्थी मित्रहो, आज आपण नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता वा अभियोग्यता या केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या सामान्य अध्ययन ४ च्या पेपरची रणनीती आणि तिचे टप्पे यांची चर्चा करणार आहोत.
या विषयाची रणनीती ही खरेतर अभ्यास सुरू व्हायच्या आधी तयार असायला हवी, मात्र ती बऱ्याचदा तयारी करणाऱ्या उमेदवारांकडे तयार असलेली दिसून येत नाही. ही रणनीती काय असावी हे जाणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मदत करणारे दोन मुलभूत स्राोत आहेत: अभ्यासक्रम आणि परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न. एकदा का या दोन घटकांचे व्यवस्थित विश्लेषण झाले की पुढील चार टप्पे ही रणनीती आखताना सहाय्यभूत ठरतात:
१) अभ्यासक्रमातील संकल्पनांचे स्पष्ट आकलन आणि सुसंगत उदाहरणे, तसेच महत्त्वाच्या विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास आणि त्याचे उपयोजन दाखवणारी उदाहरणे गोळा करून ठेवणे.
२) अभ्यासक्रमातील विविध संकल्पना आणि विषय यांवर संक्षिप्त टिपा लिहून अभ्याससाहित्य तयार करणे. म्हणजेच नोट्स मेकिंग.
३) परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न सोडवणे आणि तज्ञ शिक्षकांकडून ते तपासून घेणे.
४) पुरेशा सराव चाचण्या सोडवून त्यांचे मूल्यमापन करून घेणे.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान नेमके काय? या अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या इतर उपयोजना कोणत्या?
पहिला टप्पा योग्य पद्धतीने पार करण्यासाठी योग्य संदर्भ साहित्य वापरण्याची आवश्यकता असते. या विषयाच्या अभ्यासक्रमाची तुलना केली तर असे लक्षात येते की, तो इतर सामान्य अध्ययनाच्या पेपरच्या तुलनेने कमी आहे. परंतु याउलट बाजारामध्ये असलेली पुस्तके गरजेपेक्षा जास्तच लिखाण देतात. यामुळे उमेदवार गोंधळू शकतात. दुसरीकडे सहजपणे उपलब्ध असलेल्या आणि यशस्वी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संक्षित नोटस उमेदवारांना गाफील बनवू शकतात. या ऐवजी चांगले आणि दर्जेदार संदर्भ ग्रंथ वाचणे अपरिहार्य आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाची अकरावी आणि बारावीची तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांची पाठ्यपुस्तके अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा चौथा अहवाल ‘Ethics in Governance’ हा स्राोतदेखील अचूक आणि योग्य मुद्दे उपलब्ध करून देतो. इंटरनेटवरील काही स्राोत जसे की नामांकित परराष्ट्रीय विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय संस्था, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांच्या संकेत स्थळांवर उपलब्ध असलेले अभ्यास साहित्य, अहवाल देखील उपयुक्त ठरतात.
अभ्यास साहित्य जमा झाले की परीक्षेला समोर ठेवून संक्षिप्त टिपा तयार करण्याची सुरुवात करावी. संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. कारण हा विषय शाळा, महाविद्यालयांमध्ये अनिवार्यपणे शिकवला जात नाही. त्यामुळे या पेपरमधील भाषा आणि संकल्पना अनोळखी वाटू शकतात.
यानंतर परीक्षेची मागणी लक्षात घेण्यासाठी वारंवार अगोदर येऊन गेलेले प्रश्न सतत वाचावेत आणि अभ्यास साहित्याची मदत कशी करून घेता येईल याचा सतत विचार करावा. किंबहुना पुरेसा अभ्यास केल्यानंतर उमदेवारांच्या असे लक्षात येईल की, काही प्रकारचे प्रश्न हे परत परत पण वेगळ्या शब्दांत विचारले गेले आहेत. तसेच केस स्टडीज पण तशाच प्रकारच्या वारंवार येतात, फक्त थोडासा परिस्थिती आणि भागधारकांमध्ये बदल केला जातो. जेव्हा ही बाब लक्षात येऊ लागते तेव्हा अगोदरच तसे अभ्यास साहित्य लिहून ठेवणे आणि मग त्याला सुसंगत चालू घडामोडीं आणि उदाहरणे शोधणे सोपे होते. म्हणूनच आयोगाने प्रकाशित केलेला अभ्यासक्रम, येऊन गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करणे हे फार महत्त्वाचे आहे.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतात कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?
परंतु फक्त अभ्यास साहित्य तयार होणे पुरेसे नाही. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विविध संकल्पनांसोबत सुपरिचित होणे म्हणजेच त्यांच्यातील आंतरसंबंध ओळखणे आणि त्यावर मनन चिंतन करून त्याबाबत दृष्टिकोन विकसित करणे. आणि हे सर्व करत असताना आयोग अशा प्रकारचे प्रश्न कसे वा का विचारते हे समजून घेणे. जसे की. Explain the term Social Capital. How does it enhance good governance? (२०२३, १० marks, १५० words) म्हणजे सामाजिक भांडवल ही संकल्पना स्पष्ट करा. ते सुशासन कसे वाढीस लावते? या प्रश्नामध्ये फक्त ‘सामाजिक भांडवल’ आणि ‘सुशासन’ या दोन संकल्पना माहिती असून चालत नाही. तर त्यांमधील नेमका आणि अचूक संबंध माहिती असावा लागतो. हे कुठल्याही अभ्यास साहित्यात तयार उत्तर भेटणार नाही. यासाठी सखोल अभ्यास करून एक चौफेर आकलन निर्माण करणे गरजेचे असते. आणि हे करायला वेळ लागतो. तर या पेपरच्या तयारीमध्ये गडबड न करता एक व्यवस्थित रणनीती आखणे आणि तिचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पुढील लेखामध्ये आपण २०२३ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये म्हणजेच UPSC Main Examination 2023 मध्ये आलेल्या या विषयांच्या काही प्रश्नांची आणि केस स्टडीजची उत्तरांसहित सविस्तर चर्चा करणार आहोत.