गेम बनतो कसा?
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर या चारीचे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. या लेखात गेमिंगमधील करिअरबद्दल…
● सुरुवात असते ती स्टोरी बोर्ड पासून, म्हणजे पुढे सरकणारी कथा. त्यासाठी लागतो लेखक. कल्पनाशक्ती ज्याची छान, ज्याचे आसपासच्या गोष्टींबद्दलचे निरीक्षण सतत जागृत, असा कोणीही लेखक बनू शकतो. इथे ललित लेखन अपेक्षित नाही. हे नीट लक्षात घ्या. कथेची मांडणी एखाद्या चलत् चित्रपटासारखी हवी.
● यानंतरचा टप्पा अॅनिमेशन मधून गेम तयार करायचा का व्हर्चुअल रियालिटी मधून यात ठरवला जातो. काही वेळा या दोन्हीचे मिक्सिंग सुद्धा वापरले जाते. अॅनिमेशनमध्ये उत्कृष्ट काम करणारा आणि त्याच वेळेला चित्रकलेची किमान जाण असणारी व्यक्ती येथे सहज सामावून जाते.
● व्हर्च्युअल रियालिटीमध्ये काम करण्यासाठी काही प्रोग्रामिंगचे प्रकार शिकावे लागतात. मात्र ते सारे कोडींग शिकण्याइतके कठीण नक्कीच नसते.
● एकदा पात्रे ठरली की त्या पात्रांचा आकार, चेहरेपट्टी, हावभाव हे प्रत्यक्ष चित्रकलेतून उतरवावे लागते. त्यांना हालचाल देण्याचे काम अॅनिमेटर करतो. म्हणजे गेम तयार करताना एखाद्या उत्तम आर्टिस्टची सुद्धा गरज लागते. रंगसंगतीचे भान असणे महत्त्वाचे.
● व्हॉइस ओव्हर नावाचा एक प्रकार प्रत्येक पात्राला आवाज देण्यासाठी वापरला जातो. त्याचे तांत्रिक ज्ञान सोप्या प्रशिक्षणातून घेता येते. मात्र, व्हॉइस ओव्हरसाठी विविध आवाज देणाऱ्या व्यक्ती त्या मानाने खूप कमी असतात. एका गेम मध्ये समजा तेरा पात्रे असतील तर तेरा व्यक्तींना आवाज देण्याकरिता बोलावणे परवडणारे नसते. तेव्हा एक किंवा दोन व्यक्तीच विविध पात्रांचे आवाज काढतात. हे लक्षात घ्या…
● आता सुरुवात असते ती शूटिंगची. सगळ्यात कंटाळवाणा व कठीण भाग हाच. जेमतेम सात आठ मिनिटांचा गेम तयार करायला शूटिंगसाठी किमान पंधरा दिवस लागू शकतात. या करता कॅमेराचे व व्हिडिओग्राफीचे उत्तम कौशल्य असलेली माणसे वापरली जातात.
● यांच्या जोडीला प्रकाश योजनाकाराची गरज असते. त्याचेही ट्रेनिंग लागते. त्यानंतर हे तयार झालेले सगळे एडिटिंग टेबलवर जाते. प्रोड्यूसर, डायरेक्टर व एडिटर या तिघांच्या सहमतीने कच्चा गेम असा तयार होतो.
● नंतर व्यावसायिक गेमरना तो खेळण्यासाठी दिला जातो. किती सेकंदांत, मिनिटांत किती पॉईंट्स कमावले जातात, कोण कसे जिंकते, खेळताना त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, याची संगणकावर निरीक्षणे नोंदवली जातात.
● आता सर्वात कंटाळवाणे काम सुरू होते ते म्हणजे टेस्टिंगचे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गेम खेळत असताना कोणती चूक राहिली आहे? सलगपणे गेम पुढे सरकताना त्यात काही त्रुटी आहेत काय? हे जवळपास आठ ते दहा हजार वेळा तपासले जाते. कधी व्यक्तींकडून, तर कधी मशीनवर.
● असा हा तयार झालेला गेम नंतर मार्केटिंगच्या माणसांकडे सोपवला जातो. हा गेम कोणासाठी, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या देशात खपेल याचे रिसर्च ते करतात.
● त्यानंतर सेल्सटीम कामाला लागते आणि तुमचा मुलगा काउंटरला त्यांच्याकडून गेम विकत घेतो. पैसे मात्र तुमच्या खिशातील गेलेले असतात.
काय शिकायचे?
आता तुम्हीच विचार करा गेमिंग कंपनीमध्ये आपल्याला शिरकाव करून घ्यायचा असेल तर यातील कोणते काम आपल्याला जमू शकते? ते जमणारे काम किमान पाच वर्षे करून उत्तम कौशल्य मिळवल्यावरच सहसा मोठी गेमिंग कंपनी आपल्याला प्रवेश देते. मला गेमर बनायचे किंवा गेमिंग कंपनीत काम करायचे आहे असे म्हणणाऱ्या मुलांच्या पालकांनी हे समजून घ्यावे. प्रशिक्षण अनुभव व नंतरच प्रवेश याला आज तरी पर्याय नाही. भोपाळच्या एकाच संस्थेत यातली बी.टेक ची पदवी मिळते.
नीती सोल्युशन्सचा ‘रियल लाईफ गेम’
डॉ.पराग माणकीकर यांची नीती सोल्युशन्स ही कंपनी पुण्यात आहे. ‘रियल लाईफ’, नावाचा एक सोशल, सिरीयस गेम ती अक्षरश: जगभर विकते. साऊथ कोरियापासून अमेरिका व दक्षिण अमेरिकेपर्यंत अनेक देशातील शाळा व विद्यापीठांनी हा गेम विकत घेतला आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणे हा त्यातील सगळ्यात पहिला महत्त्वाचा उद्देश साध्य होतो. हा गेम खेळताना जगातील १९३ देशांपैकी आपल्याला हवा तो देश निवडून प्रत्येक विद्यार्थी तिथे आभासी जन्म घेतो. जन्मल्यानंतर तेथील एखाद्या फॅमिलीत वाढल्यासारखे तिथल्या वातावरणाचा संपूर्ण अनुभव घेतल्यासारखे आभासी जग या खेळात तयार होते. कोणत्याही देशातील विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण घेतो. प्रत्यक्ष आयुष्यातील प्रश्न व त्यांना तोंड कसे द्यायचे हे कुठेही शिकायला मिळत नाही. जसे पोहणे पाण्यात पडल्याशिवाय शिकता येत नाही तसाच काही तसा प्रकार येथे आहे. ही आभासी वाटचाल खेळणारा अनुभवतो.
युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक, ऑक्सफॅम, युनिसेफ, अशा जागतिक संस्थांकडून उपलब्ध असलेला दर वर्षी तयार होणारा प्रचंड डेटा इथे यासाठी वापरला गेला आहे. त्यातून अतिशय प्रगत अशा सॉफ्टवेअरच्या अल्गोरिदमने तिथले आयुष्य कसे असू शकते याची व्हर्चुअल रियॅलिटीने या खेळामध्ये निर्मिती केली गेली आहे. भावनिक प्रगती होण्यासाठी सहवेदना किंवा एम्पथी अत्यंत गरजेची असते. ती हा खेळ खेळताना विद्यार्थ्यांमधे जागृत होते असा संशोधनाचा निष्कर्ष आहे.
मात्र जगातील विविध शाळातील, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना असे आयुष्य कसे जगावे याचे व्यावहारिक व भावनिक प्रशिक्षण देणारा खेळ उपयुक्त आहे असे भारतातील संस्थांना वाटलेले नाही. हा सुद्धा एक विचार करण्याजोगा प्रश्न…