अॅड. प्रवीण निकम
नमस्कार मित्रांनो, अनेकांचे नव्या कॉलेज विश्वात पदार्पण झाले असेल. अनेक जण त्या नव्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतील, काही जण या नव्या प्रवासात धडपडत असतील, तर काहींचा तर हा प्रवास सुरू ही झाला नसेल. जीवनातील या सगळ्यात महत्त्वाच्या वर्षात भविष्यातील वाटचालींचा आलेख खऱ्या अर्थाने तयार होणाऱ्या या वर्षात अनेकजण आपापल्यापरीने स्वत:चा प्रवास करत राहणार आहेत. या प्रवासात आर्थिक सहाय्य करत पुढे शिकण्यासाठी मदत करणाऱ्या एका शिष्यवृत्तीबद्दल आज जाणून घेऊ या, ज्या शिष्यवृत्तीचे म्हणजेच स्कॉलरशिपचे नाव आहे ‘यंग इंडिया फेलोशिप’.

अशोका विद्यापीठ हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (भारत) मध्ये स्थित एक खासगी संशोधन विद्यापीठ आहे, जे मानविकी, सामाजिक विज्ञान आणि नैसर्गिक विज्ञानांमध्ये उदारमतवादी शिक्षण प्रदान करते. या अशोका विद्यापीठाचा यंग इंडिया फेलोशिप (YIF) हा प्रमुख कार्यक्रम आहे. लिबरल स्टडीजमध्ये वर्षभराचा निवासी पदव्युत्तर डिप्लोमा म्हणून ऑफर केलेले, १०० जिज्ञासू आणि प्रेरित व्यक्तींना एकत्र बहु-विषय आणि बहुआयामी शिक्षण देण्याचा यात प्रयत्न केला जातो. वर्षभराच्या या काळात आघाडीच्या विचारवंत आणि विद्वानांनी सक्षम केलेल्या अभ्यास, संशोधन आणि सरावाच्या विविध क्षेत्रांमध्ये या फेलोजना काम करण्याची संधी मिळते. या फेलोशिप अंतर्गत विविध शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक-आर्थिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असणारे अनेक विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांच्या विविध आकांक्षा आणि भविष्यातील करिअरविषयक मार्ग निवडतात. या शिष्यवृत्तीमार्फतच २०११ पासून, YIF ने २१ व्या शतकासाठी २२०० हून अधिक सामाजिक जागरूक नेते आणि बदल घडवणारे विचारवंत तयार केले आहेत.

हेही वाचा : UPSC ची तयारी: पंचायती राज व्यवस्था

‘यंग इंडिया फेलोशिप’ ही प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञाना आकर्षित करणारी शिष्यवृत्ती असून या शिष्यवृत्तीमधील अभ्यासक्रमातील वैविध्य हे त्यांच्या शिकवण्याच्या आणि मूल्यांकनाच्या विविध शैलींमध्ये देखील दिसून येते. ज्यामध्ये चर्चा, परिसंवाद, क्षेत्र भेटी, सादरीकरणे आणि गट कार्य यांचा समावेश होतो. याच अशोका युनिव्हर्सिटीच्या तीन स्वतंत्र शिष्यवृतींविषयी देखील यानिमित्ताने आपण थोडक्यात जाणून घेऊ या.

‘फ्लॅगशिप रेसिडेन्शिअल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लिबरल स्टडीज’ या शिष्यवृत्ती मध्ये ऑफर केलेला, YIF इतर कोणत्याही पदवीधर शैक्षणिक कार्यक्रमापेक्षा वेगळा आहे. फेलोजला एका वर्षाच्या आत अभ्यास, संशोधन आणि सरावाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश आणि एक्सपोजर मिळते. हे फेलो प्रख्यात शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात. वास्तविक-जगातील समस्या सोडवण्यासाठी, संघ-आधारित प्रकल्पावर काम करण्यासाठी प्रेरणादायी व्यक्तींचे फेलोजला यानिमित्ताने मार्गदर्शन मिळते.

‘चान्सलरची गुणवत्ता शिष्यवृत्ती’ ही अशी एक शिष्यवृत्ती आहे जी फेलोशिपमध्ये एकापेक्षा जास्त क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १० फेलोना दिली जाते. ही फेलोशिप २०२५ च्या युवा वर्गासाठी प्रवेश घेतलेल्यांसाठी आहे. या शिष्यवृत्तीमध्ये ट्यूशन फी आणि राहण्याचा खर्च याबाबत १०० टक्के सूट असते. या शिष्यवृत्तीसाठी कोणतीही स्वतंत्र अर्ज प्रक्रिया नाही तर यंग इंडिया फेलोशिप मधील उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतात. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक समितीकडून मुलाखतीसाठी बोलावले जाते.

हेही वाचा : नोकरीची संधी: भारतीय वायुसेनेतील भरती

Need Based Financial Aid Program ही शिष्यवृत्ती आर्थिक सहाय्य या मुद्द्याला विचारात घेऊन सुरू झाली आहे. जी मुख्यत्वे करून विद्यार्थ्यांना ट्युशन फी भरण्यासाठी मदत करते. ही शिष्यवृत्ती वरील दोन्ही शिष्यवृत्तींपेक्षा वेगळी आहे.

या सर्व शिष्यवृत्तींसाठी पदवी झालेला कोणताही विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहे. किंवा असे विद्यार्थी जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत ते देखील यासाठी अर्ज करू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, फ्रीलान्सर्स हे देखील यासाठी पात्र आहे. या शिष्यवृत्तीसाठी सगळ्या वयोगटातील व विषय भिन्नता असणारे सर्वच विद्यार्थी जे विविध प्रांताचे प्रतिनिधित्व करतात व आर्थिक, सामाजिक विविधतेचे प्रतीक आहेत असे सर्वच विद्यार्थी अर्ज करू शकतात. सर्व वयोगटातील पदवी झालेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. खूप पात्रता, निकष या शिष्यवृत्तीसाठी नसले तरी विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी जिज्ञासू वृत्ती, ज्ञान मिळविण्यासाठीची तळमळ आणि शिक्षणाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास या मुद्द्याचा या शिष्यवृत्ती निवडीत विचार नक्की केला जातो. https:// www. ashoka. edu. in/ academic- programme/ young- india- fellowship/ अधिक माहितीसाठी तुम्ही या संकेतस्थळाचा वापर करू शकता.