मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. शोध पत्रकारितेबद्दल खुद्द पत्रकारिता करणाऱ्यांसह समाजाचाही दृष्टिकोन आणि समज-गैरसमज आहेत. ते नक्की काय याचा उलगडा…

शिकणाऱ्या मुलांमध्येनोकरी करणाऱ्यांमध्ये आणि करिअर मध्ये आगळे वेगळे शोधणाऱ्यांकडून तीन अत्यंत आकर्षक शब्द कायम समोर येतात व माझ्याकडे चौकशी केली जाते. पहिला मला हॅकर बनायचे आहे, दुसरा फॉरेन्सिक सायन्स आणि तिसरा येतो शोध पत्रकार बनायचे आहे. थोडाफार संगणक वापरता यायला व त्यात काहीतरी करता यायला लागले की हॅकर बनण्याची स्वप्न पडणारी मुलं मुली बारावी सायन्सच फिजिक्स शिकताना हळूहळू वास्तवाकडे येऊ लागतात. पीसीएममध्ये उत्तम मार्क मिळवून सीईटीत यशस्वी झाल्याशिवाय हा रस्ता सुरू होत नाही हे नंतर कळते. तर सीआयडी बघून त्यासारख काहीतरी करण्याची सुरसुरी येणारे मला फॉरेन्सिक सायंटिस्ट बनायचे असे म्हणू लागतात. त्यांनाही हा रस्ता कठीण आहे हे बारावी सायन्स करताना उलगडते. मात्र शोध पत्रकारितेबद्दलचे गैरसमज वयाच्या तिशीत सुद्धा अनेकांच्या मनात कायम असतात. एखादी पदवी मिळाली की पत्रकारितेतील अभ्यासक्रम पूर्ण करता येतो हे सर्वांना माहिती आहे. मग त्यानंतर शोध पत्रकार बनायचे असेल तर सहज बनता येईल असा एक भ्रम काही पत्रकारांच्या मनातही येतो. सनसनाटी बातमी, खळबळजनक घटनेचा उलगडा, एखादा राजकीय भूकंप, नीट सारख्या परीक्षेतल्या चुकांचा गोंधळ, एखाद्या दुर्घटनेचा रिपोर्टाज म्हणजे शोध पत्रकारिता असा एक गैरसमज समाजाच्या, काही नव -पत्रकारांच्या मनात असतो. पत्रकारितेचे विविध अभ्यासक्रम आता सहज उपलब्ध झाले आहेत. सहा महिन्याच्या सर्टिफिकेट कोर्स पासून मास्टर्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत यांचा विस्तार झाला आहे.सर्व भारतीय भाषांतून पत्रकारिता प्रत्येक विद्यापीठात अभ्यासक्रमातून शिकता येते. मात्र अस्सल शोध पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली व त्यानंतर त्यात काम करणारी मंडळी आजतरी अभावानेच सापडतात.

संशोधनाचा रस्ता

पत्रकाराला बातमी दिसते. त्या बातमीचे नेमक्या शब्दात वार्तांकन करणे हे त्याचे काम. बातमी ही निखळ बातमी असावी असे त्या मागील गृहीतक. बातमी लिहिणाऱ्याचे, देणाऱ्याचे मन वा मत त्यात गुंतता कामा नये असे समजले जाते. मत द्यायचे असेल, टिप्पणी करायची असेल, टीका करायची असेल तर त्याची जागा वृत्तपत्रात वेगळ्या ठिकाणी असते. पण एखाद्या घटनेमागील, वरवर घडलेल्या बातमी मागील सर्वांगाने अभ्यासपूर्ण माहिती द्यायला काही काळ जावा लागतो व त्याचा सखोल अभ्यास लागतो. ही वृत्ती प्रत्येकात असतेच असे नाही. या रस्त्याने जाताना काही गोष्टींचे भान हे अभ्यासातूनच शिकावे लागते. उदाहरणार्थ एखाद्या घटनेशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखतीतून ती घटना उलगडतेच असं नाही. त्यातून घटनेबद्दलची विविध मतमतांतरे तुम्हाला वाचायला मिळतील. पण ही घटना का घडली, त्याची कारणे, त्याचा इतिहास, त्याबद्दलची कागदपत्रे वाचायला लागल्यानंतर काही वेगळेच निष्कर्ष निघू लागतात. अशा अभ्यासपूर्ण गोष्टी करण्याकरता शांतपणा, भरपूर वेळ, सखोल निरीक्षण व यासाठी येणारा मोठा खर्च तर लागतोच, पण तौलनिक अभ्यास करून स्वत:च्या मतांना पूर्णपणे बाजूला ठेवून मांडणी करण्याची शिस्त आत्मसात करावी लागते. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर त्यामागे लागणारी चिकाटी येथे ओघानी येते.

भारतातील वास्तव

भारतात या क्षेत्रात सुरुवात रुसी करंजियानी केली. अरुण शौरी, नलिनी सिंग ही भावंडे नंतरची. तरुण तेजपाल या तेहलका संपादकांचे नाव सहज आठवते. चित्रा सुब्रमण्यम हिंदूकरता स्वीडनहून काम करत असत. मधू त्रेहान, ज्योतिर्मय डे, हुसेन झैदी, किंगशुक नाग, सुचेता दलाल, शंकर अय्यर ही नावे पाठोपाठ घेतली जातात. निळू दामले, अनिल अवचट यांचे मराठी संशोधन पर लेखन गाजलेले आहे. एखाद्या संशोधकाने एखाद्या विषयाला वाहून घेतलेले लेखन करून पुस्तक करणे वेगळे आणि एखाद्या विषयावर विस्ताराने लेख लिहिणे, चर्चा करणे, चर्चेत विविध मते मांडून पत्रकार म्हणून वाटचाल कशी करावी याचे अभ्यासक्रम अजून आपलेकडे आणले गेलेले नाहीत. यावर चर्चा नक्कीच होते. या आदर्शांचा अनुभव सांगितला जातो. पण पूर्णपणे या पद्धतीला वाहून घेतलेले वेगळे अभ्यासक्रम अमेरिकेत अनेक वर्षे चालवले जातात. तेथील परंपरा सुमारे ६० ते ७० वर्षांची आहे. अध्यक्ष निक्सन यांचे वॉटर गेट प्रकरण, किंवा अगदी अलीकडचे हिंडेनबर्गचे संशोधन ही काही राजकीय व आर्थिक उदाहरणे. व्हिएतनाम किंवा इराकमध्ये घडलेल्या लष्करी अत्याचारांचा शोध घेण्यासाठी वर्षभर काम कसे केले गेले, अशा वास्तवातील व इतिहासातील घटनांचा अभ्यासक्रम यात शिकवला जातो. व्यवस्थेतून होणारा अन्याय, कोर्टापर्यंत न्यायासाठी न गेलेल्या अनेक तक्रारी, राज्यकर्त्यांनी घेतलेले मनमानी निर्णय, पैशाने दडपला गेलेला न्याय उघडकीस आणणे, एखाद्याच्या रास्त मागण्या फाईलीत दडपल्या जाणे, निसर्ग, पर्यावरण, नामशेष जमाती वा भाषा यांचा शास्त्रोक्त कागदोपत्री अभ्यास करून, चिकाटीने पाठपुरावा केल्यानंतर होणारी निष्पत्ती समाजाच्या दृष्टीने कायमची महत्त्वाची ठरते. तिला पहिल्या पानावरील बातमीची किंवा मोठ्या मथळ्याची सर कधीच येत नाही. पण राजकीय धुरीण, व्यवस्थेतले बाबू, आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम करणाऱ्या दडवलेल्या गोष्टी यांचे दृष्टीने अशी शोध पत्रकारिता धक्कादायक ठरते किंवा मार्गदर्शक होते. नेमके पुरावे गोळा कसे करायचे, कुठे शोधायचे, त्यांचे धागेदोरे कसे लावायचे याचे प्रशिक्षण देणारा हा अभ्यासक्रम जेव्हा नीना पाटीलने पूर्ण केला तोही वकिली शिक्षण घेतल्यानंतर त्यावेळी तिला या क्षेत्रातील यश लवकर प्राप्त झाले. तिच्यासारखे असे मोजकेच पत्रकार समाजासाठी जागल्याची भूमिका बजावण्याकरता अत्यंत गरजेचे असतात. भारतात व्यक्तिगत बदनामी करणारी शोध पत्रकारिता कायदेशीर नाही. (समाप्त)

Story img Loader