Success Story: शालेय जीवनापासून ते ऑफिसच्या अनेक कामांमधील तुमच्या तुटलेल्या अनेक गोष्टींना जोडण्यात हातभार लावणारा एक प्रसिद्ध ब्रॅण्ड म्हणजे ‘फेविकॉल’. अगदी लग्नाला आहेराचे पाकीट चिकटवण्यात, एखादा फोटो फॉर्मवर लावण्यात, तर शाळकरी मुलांना कार्यानुभव विषयात मदत करणारा त्यांचा साथीदार म्हणजे हा फेविकॉल. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का या फेविकॉलचा शोध कोणी लावला असेल? नाही… मग आज आपण त्याच्याबद्दल या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.
भारतातील फेविकॉल मॅन बलवंत पारेख यांनी अनेक अडचणींवर मात करीत यशाच्या शिखरावर पोहोचून व्यावसायिक जगतात स्वतःचे नाव कमावले. बलवंत पारेख यांचा जन्म गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा या छोट्याशा गावात झाला. त्यांना व्यवसायात नेहमीच रस होता; पण त्यांनी कायद्याची पदवी मिळवावी, अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती. त्यामुळे कौटुंबिक दबावामुळे ते सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्या वेळेस मुंबईला गेले.
मुंबईतील विधी महाविद्यालयात शिकत असताना संपूर्ण देश महात्मा गांधींच्या प्रभावाखाली होता. बलवंत पारेखही त्यांच्या पिढीतील इतर लोकांप्रमाणेच त्यांचा अभ्यास सोडून भारत छोडो आंदोलनात सामील झाले. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन, पदवी पूर्ण करण्यासाठी ते मुंबईला परतले. पण, कायद्याचा अभ्यास करूनही त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. कारण- त्यांना नेहमीच व्यावसायिक व्हायचे होते. म्हणून त्यांनी बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुढे सराव न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बलवंत पारेख यांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे नोकरी नव्हती. म्हणून ते कारखान्यात शिपायाचे काम करायचे आणि कारखान्याच्या तळघरात पत्नीसोबत राहायचे. त्या काळात विविध कर्जांमुळे त्यांना खूप आर्थिक बोजादेखील सहन करावा लागला.
पण, अनेक वर्षांच्या कष्टानंतर अखेर बलवंत पारेख यांना जर्मनीला भेट देण्याची संधी मिळाली. तेथून ते व्यवसायातील विविध क्लृप्त्या आणि युक्त्या शिकले. भारतात Hoechst चे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपनीत काम करताना बलवंत पारेख यांना पहिले यश मिळाले. पुढे १९५४ मध्ये ते मुंबईच्या जेकब सर्कलमधील पारेख डायकेम इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले. जर्मनीहून परतल्यावर त्यांनी भावासोबत डायकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली. त्यांची कंपनी मुंबईच्या जेकब सर्कलमध्ये रंग, औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन युनिटचे उत्पादन व व्यापार करायची.
त्यानंतर १९५९ मध्ये पिडिलाइट कंपनीची स्थापना भारतात झाली. लाकूड चिकटविण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे बलवंत पारेख यांनी पाहिले होते म्हणून त्यांनी ‘गम’ बनवायला सुरुवात केली. ‘फेविकॉल’मुळे लाकडाचे काम करणाऱ्या कारागिरांचे काम सोपे झाले आणि तो देशातील सुतारांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘गम’पैकी एक बनला. एकेकाळी शिपाई म्हणून काम केलेल्या व्यक्तीने त्या काळी हजार कोटींची कंपनी उभारली.
यशाची व्याख्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय, भरपूर आत्मविश्वास आदी गोष्टींनी ठरवली जाते. यश ही इतरांकडून कॉपी करता येण्यासारखी गोष्ट नाही. यश हे असे काहीतरी आहे; जे फक्त आणि फक्त तुमच्या नावानेच ओळखले गेले पाहिजे. अशा अनेक यशोगाथा आहेत; जिथे लोकांनी अगदी छोट्याशा दुकानापासून सुरुवात करून, नंतर लाखोंचा व्यवसाय सुरू केला आहे. अशीच भारतातील फेविकॉल मॅन बलवंत पारेख यांची यशोगाथा आहे; जी ‘फेविकॉल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं…’ या जाहिरातीप्रमाणे आजही देशात अनेकांना प्रेरणा देत स्वत:चे आगळे स्थान दाखवून देत आहे.