Bank of India PO 2023 examination date: गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्राकडे तरुणाईंचा कल वळला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक तरुण-तरुणी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या बॅंकिंगमध्ये सध्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॅंकेमध्ये काम करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेद्वारे JMGS-I प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती होणार आहे. या भरतीसाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या सूचनेनुसार, १९ मार्च २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. इच्छुक उमेदवार परीक्षेसंबंधित सविस्तर माहिती बॅंकेच्या bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवरुन मिळवू शकतात.
१ मार्च २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या सूचनापत्रकामध्ये, उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती देण्यात आली आहे. त्यात Junior Management Grade Scale – I ऑफिसर्सच्या घेतली जाणारी भरती परीक्षा देण्यासाठी इच्छुक उमेदवाराने बँकिंग अँड फायनान्स या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे असे म्हटले आहे. तसेच ही परीक्षा १९ मार्च रोजी होणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज केलेल्या उमेदवारांना लवकरच परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड्स (परीक्षेसाठीचे ओळखपत्र) दिले जाणार आहे. हे कार्ड बॅंकेच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील. बॅंक ऑफ इंडियामधील JMGS-I प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ५०० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच परीक्षेसंबंधित सूचनापत्रक वेबसाइटवरुन मिळवू शकता.