डॉ.श्रीराम गीत
दोन मुलांची माझी नुकतीच भेट झाली.एक होता सोळाचा तर दुसरा सत्तावीसचा. त्यातील सोळाबद्दल आधी. त्याला दहावीला ९७ टक्के मार्क मिळाले होते. त्याने कॉमर्सला प्रवेश घ्यायचं नक्की केलेलं होतं. आई आणि वडील दोघेही सीए झालेले होते. आई नोकरी करत होती, तर वडिलांची स्वत:ची छान प्रॅक्टिस होती. गेल्या पंचवीस वर्षांचा कॉमर्स क्षेत्रातील उत्तम अनुभव त्या दोघांना होता. विविध कंपन्या, विविध इंडस्ट्रीज, अनेक नामवंत व्यावसायिक या साऱ्यांशी दोघांचा सातत्याने कामानिमित्त संपर्क येत होता. खरे तर त्याच्या आईचा फोन मला आला त्याच वेळेला मी प्रश्न विचारला की माझ्याकडे तुम्ही याला का घेऊन येत आहात? त्याला उत्तम पद्धतीत मार्गदर्शन करणारे तुम्हीच नाहीत का? आईने थोडक्यात उत्तर दिले मुलाला भेटलात की तुमच्या लक्षात येईल आम्ही तुमच्याकडे का आलो ते. यावर फारसे काही बोलण्याजोगे नव्हते.पुण्यातील एका उत्तम इंटरनॅशनल स्कूल आणि सीबीएससी पूर्ण केलेला तो माझ्यासमोर आला. ९७ टक्के मार्क असले तरीही शाळेत तो तिसरा आला होता. पुण्यातील नामवंत कॉलेजात प्रवेश मिळणार हेही नक्की होते. आल्यावर मुलाने त्याची सुरेखशी नवी कोरी डायरी उघडली आणि माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू करण्याची तयारी दाखवली. काय करायचय तुला? यावर त्याचे उत्तर होते.
‘‘मला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे आहे. सीए व्हायला माझी हरकत नाही. पण मला ऑडिटचे काम नको आहे. आयआयएममधून एमबीए पण करायची इच्छा आहे. मात्र त्यानंतर मिळणारी नोकरी माझ्या मनाजोगती हवी. इकॉनॉमिक्समध्ये पॉलिसी मेकिंग नावाचा प्रकार काय असतो? आणि त्यात पॅकेज कितीचे मिळते? ‘इकॉनॉमिक अॅडव्हायझर’ला पैसे जास्त मिळतात का एखाद्या ‘सीएफओ’ला? सीए,सीएफए आणि सीपीए या तीनामध्ये जास्त चांगले काय?’’
ही सारी त्याची प्रश्नांची सरबत्ती ऐकल्यानंतर मी आई-वडिलांकडे प्रश्नचिन्हात्मक पाहिले तर त्यांनी द्या याला उत्तरे तुम्हीच असा चेहरा केला होता.
शिकायची हौस न संपणारी आता दुसऱ्याची अनोखी नाही तर आई-वडिलांना दमवणारी कथा. ती बघायला गेले तर तशी अगदी साधी सरळ. दहावीत ८५, बारावीत ८५, बीकॉम ८५, एमकॉम ८०, डीटीएल ८५ व नंतर लॉ ला प्रवेश घेऊन तीन वर्षे फस्र्ट क्लासने पूर्ण अशी वाटचाल. आणि यंदा तो म्हणतो की आता मला एमबीएची प्रवेश परीक्षा द्यायची आहे. क्लास करता ७० हजार द्या. पुढच्या वर्षी प्रवेश मिळेल. कोर्सची फी आहे पाच लाख. मुलाचे आजचे वय २७ चालू. आई शिक्षिका, वडील सरकारी नोकरीत. एकटाच मुलगा. मागेल ते कायम मिळत गेलेला. आईचे म्हणणे त्याला हवे ते करू देत. तर वडिलांची इच्छा आता त्याने निदान पहिला रुपया तरी कमवावा. मुलाचे स्वप्न मी एमबीए झाल्यावर उत्तम नोकरी मला मिळेल. तशा स्वरूपाची नोकरी आधी घेतलेल्या कोणत्याही पदवीनंतर उपलब्ध नव्हती. हे आत्ता मला कळले त्याला मी तरी काय करणार?
ध्येयहीन धावाधाव निर्थकच
दोन्ही उदाहरणात मुले स्पर्धेमध्ये धाव धाव धावणार होती. मात्र स्पर्धा कशाची आहे? तिचा शेवट कुठे आहे? मुख्य म्हणजे आपण कशाकरिता धावत आहोत? स्वत:ला काय हवे आहे याची किमान माहिती घेण्याचे कष्ट दोघांनाही करण्याची इच्छाच नव्हती. उत्कृष्ट चॉकलेटच्या दुकानात गेल्यानंतर दिसणारी सुमारे पन्नास प्रकारची चॉकलेट घेण्याची इच्छा पहिला मुलगा व्यक्त करत होता. मिळालेल्या ९७ टक्के मार्कमुळे तो हरभऱ्याच्या झाडावर चढून आसपासचे जग बघत होता. सर्व बोर्डाची केवळ महाराष्ट्रात ९७ टक्के मार्क मिळालेली पाच हजार मुले आहेत. अशीच प्रत्येक राज्यात असणार आहेत. त्यांच्याशी त्याला स्पर्धा करून त्यांने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात होणार होती. इंटरनेटवर बसून शोधलेले शब्द किंवा डिक्शनरी वाचून गोळा केलेली शब्द संपत्ती यातून वाक्यरचना व अर्थ बोध कधीच होत नसतो. तेव्हा एकाच वाक्यात त्याला सांगितले अकरावी व बारावीला जिथे नामवंत कॉलेजात तू प्रवेश घेतला आहेस तिथे पहिला आलास तर तुला जे जे करावेसे वाटते ते करण्याची सुरुवात होईल. हे मात्र त्याला छान कळले, कारण त्या कॉलेजातील प्रवेशाच्या यादीमध्ये त्याचा नंबर ११७ वा होता.
दुसऱ्याच्या संदर्भात माझे काम त्या मनाने खूपच सोपे होते. तू एमबीए करशील, तुला कॉलेज मिळेल, आई वडील फी पण देतील. पण २९ वर्षांच्या एमबीए झालेल्या पदवीधराला कोणीही नोकरीवर ठेवायला तयार होणार नाही याची तुला कल्पना तरी आहे काय?
दोघांनाही स्पर्धेत धावायचे होते. पण स्पर्धेतील स्पर्धक कोण? स्पर्धेत भाग घेण्याचे वय व किमान क्षमता काय असते? याची चौकशी न करता दोघांनी सुरुवात केली होती. जाणकार वाचकांनी म्हणजेच पालकांनी यातून यंदाच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात करताना थोडासा बोध घेतला तर?