Career Options After 10th : प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील दहावीचे वर्ष हे कलाटणी देणारे असते. दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, हे काही विद्यार्थ्यांचे ठरलेले असते पण काही विद्यार्थ्यांना दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जावे, हे कळत नसेल तर टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला दहावीनंतर करिअर करण्यासाठी काही सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत त्यापूर्वी काही खालील गोष्टी समजून घ्या
तुमच्यातील चांगले गुण आणि आवड तपासा
तुमच्या गुणांचे आणि आवडीचे मूल्यांकन करणे हे करिअर निवडीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करिअर निवडू शकता. जर तुमच्याकडे संबंधित क्षेत्राबाबत योग्य कौशल्य आणि क्षमता असेल तुम्ही त्यात चांगले करिअर करू शकता. त्यामुळे दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, हे जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी कोणते क्षेत्र चांगले आहे, हे जाणून घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या पालकांचे किंवा शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
करिअरबाबत समुपदेशन घ्या
आपल्यातील कौशल्य आणि क्षमता जाणून घेण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. तुमचे चांगले गुण आणि तुमच्यातील कमकुवतता यांचे मुल्यमापन करण्यासाठी तुम्ही समुपदेशकांकडे जाऊ शकता. करिअरबाबत समुपदेशन घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. यशस्वी करिअरसाठी योग्यरित्या नियोजन करणे आवश्यक असते. यासाठी व्यावसायिक समुपदेशक चांगले मार्गदर्शन करू शकता. यामुळे दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे, हे समजून घेणे तुम्हाला सोपी जाईल.
कोणता विषय किंवा शाखा निवडावी?
दहावीनंतर विषय निवडताना भविष्याचा विचार करा. आपण कोणत्या क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतो,याचा विचार करून विषय किंवा शाखा निवडा.
१. विज्ञान
विज्ञान शाखामध्ये बरेच पर्याय दिसून येतात. दहावीनंतर जर तुम्ही विज्ञान घेतले तर तुम्हाला कोणत्या करिअरच्या संधी आहेत जाणून घ्या.
जर तुम्ही पीसीएम (PCM) घेतले तर तुम्ही इंजिनिअरींग, कप्युटर सायन्स, डिफेन्स सर्व्हिस, मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करू शकता आणि जर तुम्ही पीसीबी (PCB) घेतले तुम्हाला मेडिसीन , फिजिओथेरेपी, अॅग्रीकल्चर, न्युट्रिशन आणि डायटेटिक्स, इत्यादी मध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.
२.वाणिज्य
जर तुम्हाला इकॉनॉमिक्स आवडत असेल गणित प्रिय असेल तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वाणिज्य शाखा निवडू शकता.
वाणिज्य शाखेतील मुख्य विषय आहेत अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि बिझनेस स्टडीज. तुम्हाला अनिवार्य भाषा विषयांचा अभ्यास करावा लागेल, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर चार्टर्ड अकाउंटन्सी, बँकिंग आणि विमा, वित्त, स्टॉकब्रोकिंग सारखे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत.
३. कला
जर तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात आणि तुमचे संभाषण कौशल्य उत्तम आहे तर तुम्ही कला शाखेत करिअर करू शकता.या शाखेत तु्म्हाला समाजशास्त्र इतिहास, साहित्य, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, ललित कला इत्यादी विषयांमध्ये करिअर करता येते. दहावी नंतर विद्यार्थ्यांना करिअरचे पर्याय म्हणून माध्यम/पत्रकारिता, साहित्य, सामाजिक कार्य, डिझाइनिंग, लेखन, अध्यापन क्षेत्रात चांगले करिअर करता येते.
याशिवाय दहावीनंतर विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा, पॅरामेडिकल आणि व्यावसायिक क्षेत्रात पण करिअर करू शकतात.