Best Government Boarding School : देशभरात असे लाखो कुटुंब आहेत, ज्यात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगले पैसे खर्च करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमुळे आज अनेक हुशार मुलं चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांनी कितीही विचार केला तरी पैशांअभावी ते चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत अनेक शाळा चालवल्या जातात. अशा शाळांमध्ये तुमच्या पाल्याला राहण्याची, खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेबरोबर वर्षभर मोफत शिक्षण दिले जाते. इतकेच नाही तर या शाळांमध्ये मुलांना लागणारे अभ्यासाचे साहित्यही मोफत दिले जाते.
इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये मिळू शकतो प्रवेश
देशभरातील नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी आणि ९ वीमध्ये प्रवेश दिला जातो. याशिवाय इयत्ता ११ वीलाही प्रवेश दिला जातो. या सर्व शाळा बोर्डिंग असून त्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मात्र, इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत या शाळा विकास निधीच्या नावाखाली अत्यंत कमी शुल्क आकारतात.
प्रवेश कसा मिळेल?
नवोदय विद्यालयात (एनव्हीएस) प्रवेश हा परीक्षेद्वारे होतो. दरवर्षी नवोदय विद्यालय समिती जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) आयोजित करते. या प्रवेश परीक्षेतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश देण्यात येतो.
वय काय असावे?
बोर्डिंग स्कूलमध्ये इयत्ता ६ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ५ वी उत्तीर्ण असण्याबरोबर त्याचे वय १० ते १२ वर्षे असावे, इयत्ता ९ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ८ वी उत्तीर्ण असण्याबरोबर त्याचे वय १३ ते १५ वर्षांच्या दरम्यान असावे. यानंतर इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय १५ ते १७ वर्षे असणे आवश्यक आहे. याबरोबरच तो विद्यार्थी १० वी उत्तीर्ण असणेही तितकेच गरजेचे आहे.