Success Story: आजकाल अनेक जण ओलाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण- रिक्षा, बस, ट्रेन यांच्या तुलनेत ओलाने प्रवास करणे सोपे जाते. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ओला बुक करायची आणि एसीच्या थंडगार हवेसह आरामदायी प्रवास करायचा. त्यामुळे ओलाचा प्रवास हा सुरक्षितही मानला जातो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? ओला कंपनीची सुरुवात कोणी केली? ही कल्पना पहिल्यांदा का व कोणाच्या डोक्यात आली? तर याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाविश अग्रवाल ओलाच्या संस्थापकांपैकी एक आहे. लुधियाना येथे १९८७ मध्ये भाविश अग्रवाल याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची आवड होती. त्यामुळे असलेल्या आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळविल्यानंतर ते ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये रुजू झाले. पण, ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या उद्योजक होण्याच्या इच्छेने त्यांनी २०१०-२०११ मध्ये ‘ओला’ची सह-संस्थापना करण्याच्या दिशेने वाटचाल केली आणि भारतातील वाहतूक उद्योगात क्रांती घडली. या पार्श्वभूमीवर भाविश अग्रवाल यांच्या प्रवासाबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

हेही वाचा…BOB Recruitment 2024 : बँकेत काम करायचेय? ‘बँक ऑफ बडोदा’ अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; अर्ज करण्यासाठी काही दिवस बाकी

मित्रांबरोबर वीकेंडला जाण्यासाठी भाविश अग्रवाल यांनी बंगळुरूहून बांदीपूरला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली. यादरम्यान टॅक्सीचालक म्हैसूरला थांबला. मग तो ठरलेल्या पैशांव्यतिरिक्त जास्त पैसे मागू लागला. टॅक्सीचालकाच्या वाईट वागणुकीमुळे भविश आणि त्यांच्या मित्रांना बसने प्रवास करावा लागला. तेव्हाच त्यांच्या डोक्यात परवडणाऱ्या किमती व उत्तम ग्राहक अनुभव असलेली टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार आला आणि त्यांनी पुढे जाऊन ओला या कंपनीची स्थापना केली.

भाविश अग्रवाल यांना सह-संस्थापक अंकित भाटी यांच्यासह ओलाच्या स्थापनेदरम्यान अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. टॅक्सी अॅग्रीगेटर म्हणून सुरुवात करून, त्यांना पारंपरिक टॅक्सीचालकांच्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. पण, त्यांचा दृढनिश्चय, अनोखा दृष्टिकोन आदी गोष्टींमुळे त्यांना या अडथळ्यांवर सहज मात करता आली आणि ‘ओला’ने त्वरित बदलत्या बाजारातील गतिशीलतेशी जुळवून घेतले. नंतर ‘ओला’ने ऑटोरिक्षा, टॅक्सींच्या पलीकडे आपल्या सेवांचा विस्तार केला आदी सर्व गोष्टींमुळे ओलाच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आणि ही सेवा ग्राहकांसाठी सोईस्कर व परवडणारी वाहतूक ठरली.

‘ओला’च्या यशाचे श्रेय तांत्रिक नवकल्पनांना दिले जाऊ शकते. कारण- यामध्ये मोबाईल ॲप, कॅशलेस व्यवहार, रिअल-टाइम ट्रॅकिंगचा परिचय आदी अनेक गोष्टी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फायदेशीर ठरल्या. ‘ओला’च्या विस्ताराला चालना देण्यासाठी ‘ओला’ने प्रमुख गुंतवणूकदारांकडून भरीव निधी मिळवला. ऑटोमेकर्स, वित्तीय संस्था व सरकारी संस्थांबरोबरची धोरणात्मक भागीदारी यांमुळे ‘ओला’ची बाजारपेठ अधिक मजबूत झाली. त्यामुळे ‘ओला’ला इलेक्ट्रिक वाहनांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली आणि मग भाविश अग्रवाल यांच्या ‘ओला’ने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये (EVs) पाऊल टाकले. ओला इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर व इलेक्ट्रिक टू-व्हीलरवर लक्ष केंद्रित केले. तसेच ओलाने जागतिक स्पर्धकांना आव्हान देत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा विस्तार केला. भाविश अग्रवाल यांच्या ओला कंपनीला बाजारातील चढ-उतार, COVID-19 ची महामारी यांचा सामना करावा लागला. पण, आपल्या सेवांमधील विविधता, किफायतशीर पर्याय यांचा अवलंब करून, ओला कंपनीने बाजारात आपले स्थान कायम ठेवले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavish aggarwal success story journey from a middle class upbringing to the co founder of ola company must read start up story asp